श्रीरामपूर:-दुर्दैवाने पोटची मुलगी गेली; अनाथ मुलीला आपली केली! अर्धी संपत्तीही तिच्या नावे करून ASP सोमनाथ वाघचौरे यांनी जपला माणुसकीचा आदर्श.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

श्रीरामपूर:-दुर्दैवाने पोटची मुलगी गेली; अनाथ मुलीला आपली केली! अर्धी संपत्तीही तिच्या नावे करून ASP सोमनाथ वाघचौरे यांनी जपला माणुसकीचा आदर्श.

श्रीरामपूर / माळेवाडी (RPS स्टार न्यूज प्रतिनिधी)
दुर्दैवाने पोटची मुलगी गमावली; पण एका अनाथ मुलीला मुलगी म्हणून स्वीकारून तिच्या आयुष्याला आधार दिला. एवढेच नव्हे तर आपल्या संपत्तीतील अर्धा हिस्सा तिच्या नावे करण्याचा निर्णय घेतला. श्रीरामपूर (उत्तर नगर) विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे यांच्या या संवेदनशील आणि माणुसकी जपणाऱ्या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे.
श्री. वाघचौरे यांनी यापूर्वी श्रीरामपूर येथे उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) म्हणून कर्तव्य बजावले आहे. त्यानंतर भुसावळ, जिल्हा जळगाव येथे ते DYSP म्हणून कार्यरत असताना त्यांच्या कुटुंबावर दुर्दैवी प्रसंग ओढवला. त्यांची कन्या अवनी ही दुर्धर आजारामुळे अवघ्या २१ दिवसांची असताना देवाघरी गेली. या घटनेने वाघचौरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.
या दुःखातून सावरताना वाघचौरे कुटुंबाने एका अनाथ मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. नियमानुसार दत्तक विधान पूर्ण करून त्यांनी त्या मुलीला आपल्या कुटुंबाचा अविभाज्य भाग बनवले आणि तिचे नावही ‘अवनी’ असेच ठेवले. पोटच्या मुलीच्या आठवणी जपतानाच एका अनाथ मुलीला प्रेम, माया आणि कुटुंब देण्याचे काम त्यांनी केले.
विशेष म्हणजे, या मुलीच्या भवितव्याची काळजी घेत आपल्या संपत्तीतील अर्धा हिस्सा तिच्या नावे करण्याचा निर्णय वाघचौरे यांनी घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हा केवळ दत्तक घेण्याचा निर्णय न राहता, एका मुलीला सुरक्षित आणि सन्मानाचे आयुष्य देण्याचा मानवतेचा आदर्श ठरला आहे.
मुलींच्या प्रश्नांबाबत विशेष संवेदनशीलता
या कौटुंबिक अनुभवाचा त्यांच्या पोलीस सेवेतही मोठा परिणाम झाल्याचे दिसून येते. कर्तव्य बजावत असताना घरातून निघून गेलेल्या किंवा अपहरण झालेल्या मुलींच्या प्रकरणांकडे ते विशेष संवेदनशीलतेने पाहतात. संबंधित मुलींना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत परत आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.
एका मुलीला गमावल्याचे दुःख स्वतः अनुभवलेले असल्याने कदाचित मुलींच्या सुरक्षेचा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या वेदनेचा ते अधिक संवेदनशीलतेने विचार करतात. पोलीस अधिकारी म्हणून कठोर कर्तव्य बजावत असतानाच माणुसकी, संवेदनशीलता आणि करुणा जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सोमनाथ वाघचौरे यांची ओळख निर्माण झाली आहे.
पोलीस खात्यातील जबाबदारी पार पाडताना कायद्याची अंमलबजावणी आणि दुसरीकडे माणुसकीची जपणूक, या दोन्हींचा सुंदर समतोल साधणाऱ्या वाघचौरे यांच्या या भूमिकेचे कौतुक होत आहे.





