ताज्या घडामोडी

वाई:-२४ तासांत तीन अल्पवयीन मुलांचा शोध; वाई पोलिसांची धडाकेबाज कामगिरी.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-२४ तासांत तीन अल्पवयीन मुलांचा शोध; वाई पोलिसांची धडाकेबाज कामगिरी.

 

सातारा | वाई, दि. ०४ : वाई पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागाने तत्परता, नियोजन आणि संवेदनशीलतेचा उत्कृष्ट नमुना सादर करत घरातून निघून गेलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा अवघ्या २४ तासांच्या आत सुखरूप शोध लावला. त्यानंतर मुलांचे समुपदेशन करून त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या वेगवान कारवाईमुळे पालकांसह नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असून वाई पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी तीन अल्पवयीन मुले घरातून निघून गेल्याची तक्रार वाई पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने शोधमोहीम हाती घेतली. सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर आणि वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन स्वतंत्र शोधपथके तयार करण्यात आली.
एक पथक वाई शहर व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत होते, तर दुसरे पथक मांढरदेव आणि तिसरे पथक पाचगणी परिसरात रवाना करण्यात आले. तपासादरम्यान पोलीस अंमलदार विक्रम धोत्रे यांना चांदणी चौक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन्ही मुले फिरताना दिसली. त्यानंतर बोपर्डी, धावडी, लोहारे, सुलतानपूर आणि शेलारवाडी परिसरात शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली.
दरम्यान, आयटीआय महाविद्यालयाजवळील डोंगराच्या दिशेने तीन्ही मुले पळताना दिसताच पोलिसांनी तत्काळ सापळा रचून पाठलाग केला. अखेर रेणुसे वस्ती परिसरात तीन्ही मुले सुखरूप आढळून आली.
प्राथमिक चौकशीत ही मुले परस्पर मित्र असून सायकलवर फिरण्यासाठी घराबाहेर पडल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचे समुपदेशन करून त्यांना सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात दिले.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक अमित सुर्वे, पोलीस अंमलदार नितीन कदम, विक्रम धोत्रे, हेमंत शिंदे, विशाल शिंदे, विशाल येवले तसेच होमगार्ड इंद्रजित लाखे यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पाडली. अल्पवयीन मुलांचा अवघ्या २४ तासांत शोध घेऊन दाखविलेल्या संवेदनशील, वेगवान आणि प्रभावी कारवाईबद्दल वाई पोलिसांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

2) वाई:-चार सूत्री भात लागवडीचे नागेवाडीत प्रात्यक्षिक; कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन.

सातारा | वाई, दि. ४ : अखेरच्या टप्प्यात आलेल्या पावसामुळे वाई तालुक्यात भात लागवडीची कामे अंतिम टप्प्यात सुरू असतानाच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना आधुनिक व शास्त्रोक्त शेतीकडे वळविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय, वाई यांच्या वतीने मौजे नागेवाडी येथे चार सूत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक आयोजित करून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले.
मौजे नागेवाडी येथील शेतकरी सुरेश जाधव यांच्या शेतात आयोजित या प्रात्यक्षिकामध्ये तालुका कृषी अधिकारी हरिश्चंद्र धुमाळ, मंडळ कृषी अधिकारी रवींद्र बेलदार तसेच कृषी विभागाच्या संपूर्ण पथकाने स्वतः शेतात उतरून चार सूत्री भात लागवडीचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी नियंत्रित भात लागवड, योग्य अंतरावर रोपांची लागवड, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, तसेच संतुलित खत व्यवस्थापनाबाबत उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धेचे मेंटॉर निखिल रायकर, पाणी फाउंडेशनच्या प्रतिनिधी कोमल देशमुख, उपकृषी अधिकारी निखिल मोरे तसेच वाई मंडळातील सर्व सहाय्यक कृषी अधिकारी उपस्थित होते. या प्रात्यक्षिकाचे नियोजन सहाय्यक कृषी अधिकारी प्रशांत सोनवणे यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांना अधिक उत्पादनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या युरिया ब्रिकेट्सचेही वितरण करण्यात आले.
वाई तालुक्याच्या पश्चिम भागात भात हे प्रमुख पीक असल्याने शेतकऱ्यांना उत्पादनवाढीसाठी शास्त्रोक्त लागवड पद्धती, तण नियंत्रण, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन आणि योग्य खत व्यवस्थापनाची माहिती देण्यावर कृषी विभागाने विशेष भर दिला आहे. या उपक्रमामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून भात उत्पादनात वाढ होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

3) वाई:-दिवसाढवळ्या २० तोळे सोन्यावर डल्ला; वर्ष उलटले तरी आरोपी मोकाट!

वाई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह; पीडित शिक्षक दांपत्याची न्यायासाठी आर्त हाक.

सातारा | वाई, दि. ०४ :

वाई शहरातील गंगापुरी परिसरातील लोकवस्तीमध्ये भरदिवसा घराचे कुलूप तोडून सुमारे २० तोळे सोन्याची धाडसी चोरी झाल्याच्या घटनेला तब्बल एक वर्ष पूर्ण झाले, मात्र या बहुचर्चित गुन्ह्याचा अद्यापही छडा लागलेला नाही. आरोपींचा मागमूसही न लागल्याने वाई पोलिसांच्या तपासाच्या गतीवर नागरिकांकडून तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या पीडित शिक्षक दांपत्याने अखेर प्रसारमाध्यमांतूनच न्यायाची आर्त हाक दिली आहे.
गंगापुरीसारख्या उच्चभ्रू आणि वर्दळीच्या परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या या घरफोडीने त्यावेळी संपूर्ण शहर हादरले होते. पीडित शिक्षक दांपत्य दररोज सकाळी नोकरीसाठी घराला कुलूप लावून बाहेर पडत असे. त्यांच्या हालचालींची अचूक माहिती चोरट्यांकडे होती का, असा संशय व्यक्त होत असून, नियोजनबद्ध पद्धतीने ही चोरी घडवून आणल्याची चर्चा आजही परिसरात सुरू आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू असल्याचे सांगितले होते. त्या काळात विविध चोरीचे गुन्हे उघडकीस आणून शेतकऱ्यांच्या मोटारी, केबल आणि इतर चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले; मात्र २० तोळे सोन्याच्या या गाजलेल्या चोरीच्या प्रकरणात मात्र तपास अद्यापही अंधारातच असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. संबंधित तपास अधिकारी बदली होऊन गेले, पण गुन्हा मात्र अद्याप प्रलंबितच आहे.
पीडित शिक्षक दांपत्याने सांगितले की, गेल्या वर्षभरात त्यांनी अनेकवेळा वाई पोलीस ठाण्यात जाऊन पाठपुरावा केला. मात्र, तपासात नेमकी किती प्रगती झाली, आरोपींचा काही धागादोरा लागला का, याबाबत समाधानकारक माहिती मिळालेली नाही. त्यामुळे न्याय मिळेल की नाही, अशी चिंता त्यांच्या कुटुंबाला सतावत आहे.
पीडितांनी वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून तपासाला गती द्यावी तसेच चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. अनेक वर्षांच्या कष्टाच्या कमाईतून जमवलेले सोनं एका दिवसात चोरट्यांनी लंपास केले. त्यामुळे ही केवळ चोरी नसून एका कुटुंबाच्या आयुष्यभराच्या कष्टांवर घात झाल्याची भावना वाईकर व्यक्त करत आहेत.
नागरिकांच्या मनातील अनुत्तरित प्रश्न
दिवसाढवळ्या झालेल्या या धाडसी चोरीचा तपास वर्षभरानंतरही पूर्ण का झालेला नाही?
सुमारे २० तोळे सोन्याचा अद्याप माग का लागलेला नाही?
सध्या या गुन्ह्याचा तपास नेमका कोणत्या अधिकाऱ्याकडे आहे?
तपासाला गती देण्यासाठी कोणती ठोस पावले उचलली जाणार?
पीडित शिक्षक दांपत्याला न्याय कधी आणि कसा मिळणार?
या प्रश्नांची उत्तरे केवळ पीडित कुटुंबालाच नव्हे, तर संपूर्ण वाई तालुक्याला अपेक्षित आहेत.
पोलीस अधीक्षकांनी वैयक्तिक लक्ष घालावे
सर्वसामान्यांना न्याय देणारे अधिकारी म्हणून ओळख असलेले पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी या प्रकरणाचा स्वतः आढावा घ्यावा, आवश्यक असल्यास विशेष तपास पथकाची नियुक्ती करून तपासाला गती द्यावी आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पीडित शिक्षकांनी प्रसारमाध्यमांतून केली आहे.
नव्या अधिकाऱ्यांकडून वाईकरांच्या अपेक्षा
वाई येथे नुकतेच रुजू झालेले पोलीस अधिकारी प्रदीप जाधव आणि प्रदीप सूर्यवंशी यांच्याकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत. शहर व तालुक्यात वाढत्या चोरी, घरफोड्या, शेतकऱ्यांच्या मोटारी आणि महागड्या केबल चोरीच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण आणत कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी ते ठोस आणि परिणामकारक पावले उचलतील, असा विश्वास वाईकर व्यक्त करत आहेत.

4) खंडाळा–लोणंद मार्ग बनला ‘अपघातांचा सापळा’! एका दिवसात चार दुचाकीस्वार घसरले; संतप्त नागरिकांचा आंदोलनाचा इशारा.

खंडाळा , दि. ०४ : खंडाळा–लोणंद मार्गावरील रस्त्याची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून पावसामुळे रस्त्यावर साचलेले पाणी, चिखल आणि खोल खड्डे यामुळे हा मार्ग अक्षरशः ‘अपघातांचा सापळा’ बनला आहे. सोमवारी सकाळपासूनच चार दुचाकीस्वार घसरून अपघातग्रस्त झाल्याच्या घटना घडल्या असून, दररोज किरकोळ अपघातांची मालिका सुरू असल्याने वाहनचालक आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.


मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकीस्वारांचे संतुलन बिघडून अपघात घडत आहेत. या मार्गावरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी आणि कामगार प्रवास करत असल्याने त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
विशेष म्हणजे, मागील महिन्यात केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी हा रस्ता अवघ्या एका दिवसात मुरूम टाकून तात्पुरता दुरुस्त करण्यात आला होता. मात्र, दौरा संपताच पुन्हा रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ झाली असून कायमस्वरूपी दुरुस्तीबाबत प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
“एखाद्या मोठ्या दुर्घटनेनंतरच प्रशासनाला जाग येणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने न पाहता ‘गांधारीची भूमिका’ घेतल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
रस्त्याची तातडीने आणि कायमस्वरूपी दुरुस्ती करून अपघातांची मालिका थांबवावी, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, या मार्गावरील वाढत्या अपघातांमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button