शिर्डी:-साईचरणी तीन दिवसांत ७ कोटी ८१ लाखांची गुरुदक्षिणा.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिर्डी:-साईचरणी तीन दिवसांत ७ कोटी ८१ लाखांची गुरुदक्षिणा – गुरुपौर्णिमा उत्सवात तीन लाखांहून अधिक साईभक्तांनी घेतले दर्शन; प्रसाद, लाडू व देणगीतही विक्रमी प्रतिसाद.

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : श्री साईबाबा संस्थानच्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त देश-विदेशातून शिर्डीत आलेल्या लाखो साईभक्तांनी साईचरणी श्रद्धेची गुरुदक्षिणा अर्पण केली. बुधवार, २८ जुलै ते शुक्रवार, ३० जुलै या तीन दिवसांच्या गुरुपौर्णिमा उत्सवादरम्यान साईबाबांना रोख, ऑनलाइन, धनादेश, परकीय चलन, सोने व चांदीच्या स्वरूपात एकूण ७ कोटी ८१ लाख १३ हजार ३७७ रुपयांची देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख गाडीलकर यांनी दिली.
संस्थानकडे प्राप्त झालेल्या देणगीत दक्षिणा पेटीतून २ कोटी ४ लाख ३५ हजार ५५७ रुपये, तर देणगी काउंटर, पीआरओ कार्यालय, डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाइन देणगी, धनादेश, डीडी व मनीऑर्डरद्वारे एकूण २ कोटी ७ लाख ८४ हजार ७०१ रुपये प्राप्त झाले. तसेच परकीय चलनातून ५ लाख ६५ हजार ९९१ रुपयांची देणगी मिळाली.
याशिवाय साईभक्तांनी ११२५.५७० ग्रॅम सोने अर्पण केले असून त्याची अंदाजित किंमत १ कोटी ४६ लाख ७४ हजार ५४४ रुपये इतकी आहे. तसेच २३,७६५ ग्रॅम चांदी प्राप्त झाली असून तिचे मूल्य ३ लाख ९० हजार ६४९ रुपये असल्याचे संस्थानने स्पष्ट केले.
गुरुपौर्णिमा उत्सवाच्या तीन दिवसांच्या कालावधीत तीन लाखांहून अधिक साईभक्तांनी साईसमाधीचे दर्शन घेतले. संस्थानच्या साई प्रसादालयात १ लाख ९४ हजार २८४ भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, तर ३९ हजार ६११ अन्नप्रसाद पाकिटांचे वितरण करण्यात आले.
दर्शन रांगेतील १ लाख ६५ हजार २०० साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले. तसेच सशुल्क लाडू प्रसादाच्या विक्रीतून ७१ लाख ७ हजार ३६० रुपयांचे उत्पन्न संस्थानला प्राप्त झाले.
गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त देशभरातून तसेच परदेशातून आलेल्या साईभक्तांनी मोठ्या श्रद्धेने साईचरणी गुरुदक्षिणा अर्पण करत साईबाबांप्रती आपली भक्ती व्यक्त केली. उत्सवादरम्यान संस्थानच्या सर्व विभागांनी भाविकांना सुरळीत दर्शन व विविध सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे संपूर्ण उत्सव भक्तिमय वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.




