खटाव:-गारळेवाडीसाठी टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सुधारित आराखड्यास मंजुरी; सहा तलाव भरणार, सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ôराष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

खटाव:-गारळेवाडीसाठी टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सुधारित आराखड्यास मंजुरी; सहा तलाव भरणार, सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी.

मायणी प्रतिनिधी :
खटाव तालुक्यातील गारळेवाडी गावाच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गारळेवाडीसाठी टेंभू उपसा सिंचन योजनेच्या सुधारित आराखड्यास महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून तांत्रिक मान्यता मिळाली असून, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या योजनेला सुधारित वाढीव मंजुरी मिळाल्याने परिसरातील सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दि. १० जुलै २०२६ रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गारळेवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार या योजनेच्या सुधारित तांत्रिक आराखड्याला तत्त्वतः मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार पाईपलाईनचा व्यास वाढविणे तसेच आवश्यक तांत्रिक बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता त्या सुधारित आराखड्यास अधिकृत तांत्रिक मान्यता मिळाल्याने या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी वेगाने होणार आहे.
सुधारित आराखड्यामुळे गव्हाण तलाव, वाऱ्याचा तलाव, दर्याचा तलाव, मदने तलाव, झिरपी तलाव तसेच कलेढोण हद्दीतील एका तलावासह एकूण सहा तलाव भरले जाणार आहेत. या तलावांमध्ये मिळून २३.५ एमसीएफटी पाणी साठवण्याची क्षमता निर्माण होणार असून, त्यामुळे गारळेवाडीसह परिसरातील मोठ्या क्षेत्रातील शेती ओलिताखाली येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्यास मदत होणार आहे.
या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल ग्रामस्थांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून आभार व्यक्त केले. या कामासाठी गारळेवाडीचे सुपुत्र व सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. आर. गारळे यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांना मारुती गारळे व सरपंच अनिल गारळे यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच पोलीस पाटील धनाजी गारळे यांनीही या योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करून विशेष परिश्रम घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
गारळेवाडीच्या विकासासाठी हा निर्णय मैलाचा दगड ठरणार असून, सिंचन, शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने गावाच्या भविष्यास नवी दिशा देणारा ठरेल, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.




