आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-कचऱ्यावरून पालिका सभागृहात ‘महाभारत’!

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-कचऱ्यावरून पालिका सभागृहात ‘महाभारत’!

बांधकाम विभागावर नगराध्यक्षांचा हल्लाबोल; अधिकाऱ्यांची कानउघाडणी, सभागृह दणाणले.

सातारा | वाई, दि. ०१ :

वाई नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज कचरा व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून सभागृहात अक्षरशः महाभारत रंगले. घंटागाडीत ओला आणि सुका कचरा एकत्र उचलला जात असल्याचा मुद्दा सदस्यांनी आक्रमकपणे उपस्थित करत प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. स्वच्छतेच्या प्रश्नावर संतापाचा उद्रेक झाल्याने काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.

नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेला मुख्याधिकारी संजीवनी दळवी यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते. सभेच्या प्रारंभी नगराध्यक्षांनी झालेल्या विलंबाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर प्रश्नोत्तरांचा धडाका सुरू होताच अनेक प्रलंबित विषयांवर सदस्यांनी प्रशासनाला कोंडीत पकडले.

सभागृहातून “ओला आणि सुका कचरा वेगळाच द्या… अन्यथा दंडाला सामोरे जा!” असा स्पष्ट आणि कठोर इशारा देण्यात आला. यापुढे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेत नगरपालिकेने स्वच्छतेबाबत कठोर भूमिका जाहीर केली.

यावेळी शहरातील कचरा टाकण्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे, सूचना फलक उभारणे तसेच बाहेरून शहरात येणारा कचरा रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी सदस्यांनी लावून धरली. भाजी मंडई परिसरातील अस्वच्छतेवरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

दरम्यान, सभेतील एका विषयावरील चर्चेदरम्यान नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर थेट हल्लाबोल चढवला. कामातील दिरंगाई, निष्काळजीपणा आणि शिस्तीच्या अभावावर त्यांनी अधिकाऱ्यांची खरमरीत कानउघाडणी करत कामात पारदर्शकता, वेग आणि जबाबदारी आणण्याचे स्पष्ट निर्देश दिले. त्यामुळे काही काळ सभागृहातील वातावरण आणखी तापले.

सभेत ओपन स्पेस क्रमांक ६४८-बी च्या भाडेनिश्चितीचाही मुद्दा चांगलाच गाजला. संबंधित जागेचे प्रति चौरस फूट भाडे निश्चित करण्यावरून सदस्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व कायदेशीर आणि आर्थिक बाबींचा सखोल विचार करण्याची भूमिका मांडण्यात आली.

एकूणच, कचरा व्यवस्थापन, बांधकाम विभागाचा कारभार, ओपन स्पेस भाडेनिश्चिती आणि स्वच्छता या मुद्द्यांवरून आजची पालिका सभा चांगलीच गाजली. प्रशासनाने केलेल्या घोषणांची आणि कठोर निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत प्रभावी ठरते, याकडे आता वाईकरांचे लक्ष लागले आहे.

2) वाई:-धोम धरणाचा विसर्ग पुन्हा वाढला; महागणपती मंदिरात पुराचे पाणी, नाणी पूल जलमय!

सातारा | वाई दि. ३१ : धोम धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत असून धरण आता १२.१७ टीएमसी (९०.११ टक्के) क्षमतेपर्यंत भरले आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने आज रात्री १० वाजल्यापासून सांडव्यामधून ७,८४७ क्युसेक वेगाने कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी सायंकाळी ६ वाजल्यापासून ६,३३५ क्युसेक विसर्ग सुरू होता.
धरणातून वाढलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागली असून वाई शहरातील नदीकाठच्या सखल भागांमध्ये पाणी झपाट्याने वाढत आहे. वाढत्या पुराच्या पाण्याने वाईचे आराध्य दैवत असलेल्या श्री महागणपती मंदिराच्या परिसरात पाणी शिरले असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव मंदिर परिसर भाविकांसाठी बंद करण्यात आला आहे.
महापुराचा धोका लक्षात घेऊन मंदिर परिसरातील पूजा साहित्य व प्रसाद विक्रेत्यांनी आपापली दुकाने तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवली आहेत. तसेच मंदिरामागील ऐतिहासिक नाणी पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, वाढत्या पुराचे दृश्य पाहण्यासाठी महागणपती पुलावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने अनावश्यक गर्दी टाळण्याचे, पुलावर थांबू नये आणि सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन केले आहे.
सातारा सिंचन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकनुसार विसर्गात आवश्यकतेनुसार आणखी वाढ किंवा घट केली जाऊ शकते. त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या सर्व गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, नदीपात्रात उतरू नये तसेच नदीकाठच्या सखल भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महसूल विभाग, पोलीस प्रशासन, ग्रामपंचायती आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून नदीकाठच्या गावांमध्ये खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून स्वतःची व कुटुंबीयांची सुरक्षितता जपावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

3) वाई:-पावसात पसरणी घाट पुन्हा धोकादायक! गटारात घुसली कार; सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

सातारा | वाई, दि. १ :
पसरणी घाटातील धोकादायक वळणांवर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे. थाप्याच्या पुढील वळणावर आज दुपारी सुमारे चारच्या सुमारास मुसळधार पावसामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने एका हुंडाई कारने थेट रस्त्यालगतच्या गटारात प्रवेश केला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, पावसामुळे घाटातील रस्ता अत्यंत निसरडा झाला होता. धोकादायक वळणावर चालकाचा अंदाज चुकल्याने कारवरील नियंत्रण सुटले आणि वाहन थेट गटारात जाऊन आदळले. अपघातानंतर काही काळ घाटातील वाहतुकीवर परिणाम झाला.
घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या साहाय्याने गटारात अडकलेली कार बाहेर काढण्यात आली. त्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
दरम्यान, पावसाळ्यात पसरणी घाटातील वळणे अधिक धोकादायक ठरत असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून सावधगिरीने वाहन चालवावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे घाटातील धोकादायक वळणांवर अतिरिक्त सुरक्षा उपाययोजनांचीही गरज व्यक्त केली जात आहे.

4) कराड:-शिवरायांच्या पराक्रमाला सलाम! पन्हाळा–पावनखिंड स्मरणयात्रेत ७० मावळ्यांची ऐतिहासिक पाऊलवाट.

कराड | दि. ०१ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रमाची आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या अमर बलिदानाची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणाऱ्या शिवराय प्रतिष्ठान, कराड यांच्या वतीने आयोजित पन्हाळा–पावनखिंड स्मरणयात्रा यंदाही उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. दि. २५ व २६ जुलै २०२६ रोजी झालेली ही ऐतिहासिक मोहीम यंदा चौथ्या वर्षात पदार्पण करत शिवभक्तांसाठी प्रेरणादायी ठरली.
जुलै १६६० मध्ये पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटका करून छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे आणि मावळ्यांनी विशाळगडाकडे केलेल्या ऐतिहासिक प्रवासाच्या स्मरणार्थ, त्याच मार्गावर सुमारे ४५ ते ५० किलोमीटरची पदभ्रमंती आयोजित करण्यात आली होती. इतिहासातील त्या थरारक प्रसंगाला उजाळा देत सहभागी शिवप्रेमींनी शिवरायांच्या पराक्रमाला मानवंदना अर्पण केली.
या स्मरणयात्रेत कराड, वीटा, सांगली, पुणे, सातारा आणि कोल्हापूर येथील १९ ते ६४ वर्षे वयोगटातील सुमारे ७० मावळे आणि रणरागिणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रवासादरम्यान कळकेवाडी येथे मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती. स्थानिक नितीन खोत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सहभागींसाठी भोजन, नाश्ता व निवासाची उत्कृष्ट व्यवस्था करून आदरातिथ्याची परंपरा जपली.
स्मरणयात्रा यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने सर्व सहभागी मावळे आणि रणरागिणींना सहभाग प्रमाणपत्र तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती देऊन गौरविण्यात आले.
बाजीप्रभू देशपांडे यांच्या अद्वितीय शौर्य, निष्ठा आणि बलिदानाची प्रेरणा जिवंत ठेवणारी ही स्मरणयात्रा उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरली. इतिहासाचे संवर्धन करताना तरुण पिढीत राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि शिवचरित्राविषयी अभिमान जागविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या उपक्रमातून साध्य झाले.
या यशस्वी स्मरणयात्रेसाठी शिवराय प्रतिष्ठान, कराडचे सर्व आयोजक, संयोजक आणि सहकार्य करणाऱ्या नागरिकांवर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button