वाई:-जनता अर्बनचा ऐतिहासिक कौल; सुरेशराव कोरडे यांच्या नेतृत्वावर बहुमताची मोहोर,सहकार राजकारणात खळबळ!
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-जनता अर्बनचा ऐतिहासिक कौल; सुरेशराव कोरडे यांच्या नेतृत्वावर बहुमताची मोहोर,सहकार राजकारणात खळबळ!

सातारा| प्रतिनिधी
वाई दि.३०:
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाई येथील जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत संस्थापक तथा माजी अध्यक्ष सुरेशराव दिनकर कोरडे यांच्या नावाचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. या निर्णयामुळे वाई तालुक्यातील सहकार क्षेत्रात नव्या राजकीय व संघटनात्मक घडामोडींना वेग आला असून, या ठरावाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
जनता अर्बन बँकेच्या संचालकांनी सामूहिक राजीनामे दिल्यानंतर संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. त्यानंतर प्रशासक प्रीती काळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत मतदानाचा अधिकार असलेल्या प्रतिनिधीची निवड हा या सभेचा प्रमुख विषय होता.
सभेत झालेल्या चर्चेनंतर मतदान प्रक्रिया पार पडली. त्यामध्ये सुरेशराव दिनकर कोरडे यांच्या नावाला बहुमताचा कौल मिळाल्याने जनता अर्बन बँकेचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सभासदांनी व्यक्त केलेला हा विश्वास त्यांच्या प्रदीर्घ सहकारी अनुभवाचा, दूरदृष्टीचा आणि प्रभावी नेतृत्वाचा गौरव मानला जात आहे.
सहकार क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत राहून सुरेशराव कोरडे यांनी बँकेच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यामुळे सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी त्यांची झालेली निवड ही वाई तालुक्याच्या सहकार क्षेत्रासाठी महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.
विशेष म्हणजे, जनता अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची पंचवार्षिक निवडणूकही लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. अशा महत्त्वाच्या पार्श्वभूमीवर विशेष सर्वसाधारण सभेत सुरेशराव कोरडे यांच्या नावावर बहुमताने झालेली निवड ही केवळ जिल्हा बँकेच्या प्रतिनिधीची निवड नसून, जनता अर्बनच्या सभासदांनी त्यांच्या नेतृत्वावर व्यक्त केलेला ठाम विश्वास असल्याचे मानले जात आहे. आगामी काळातही बँकेची वाटचाल सक्षम, सुरक्षित आणि विकासाभिमुख नेतृत्वाखालीच व्हावी, अशी सभासदांची भावना या निर्णयातून स्पष्टपणे अधोरेखित झाली असल्याची चर्चा सहकार वर्तुळात आहे.
या ठरावामुळे आगामी जनता अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वातावरण अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत. विशेष सर्वसाधारण सभेत बहुमताने झालेला हा निर्णय आगामी निवडणुकीची दिशा ठरवणारा ठरू शकतो, असा विश्वास सहकार क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत. त्यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीबरोबरच जनता अर्बन बँकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीकडेही आता संपूर्ण सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे.




