वाई:-गरवारे टेक्निकल फायबर्सच्या CSR निधीतून वाईत अत्याधुनिक गणित प्रयोगशाळा; अनुभवाधारित शिक्षणाला नवी दिशा!
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-गरवारे टेक्निकल फायबर्सच्या CSR निधीतून वाईत अत्याधुनिक गणित प्रयोगशाळा; अनुभवाधारित शिक्षणाला नवी दिशा!

सातारा | वाई, दि. २४ :
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक, अनुभवाधारित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेडच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) निधीतून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, वाई प्रकल्पांतर्गत नवीन मराठी शाळेत अत्याधुनिक गणित प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली. या प्रयोगशाळेचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची गणिताची भीती दूर होऊन प्रयोग, कृती आणि विविध शैक्षणिक साधनांच्या माध्यमातून गणित अधिक सोपे, आनंददायी आणि प्रभावी पद्धतीने शिकता येणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. पी. व्ही. एस. शास्त्री होते, तर गरवारे टेक्निकल फायबर्सचे प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी व्हाईस प्रेसिडेंट अरविंद कुलकर्णी, जनरल मॅनेजर युवराज थोरात, असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट विवेक देशपांडे, वाई प्रकल्पाच्या अध्यक्षा उमा जोशी, संस्थेच्या आजन्म सेविका विद्या राव, नवीन मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका छाया लोखंडे, मनागेश मोने, सुधीर नारखेडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दीपप्रज्वलनानंतर विद्यार्थ्यांनी गणितावरील संवाद, विविध प्रयोग, गणिती खेळ, कृतीआधारित प्रात्यक्षिके आणि संकल्पनांचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि विषयावरील आकलन पाहून मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले.
यावेळी विवेक कुलकर्णी म्हणाले, “शिक्षण ही केवळ पुस्तकी ज्ञानाची प्रक्रिया नसून विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेला आणि नवसर्जनशीलतेला दिशा देणारी साधना आहे. गणित हा भीतीचा विषय नसून तर्कशक्ती विकसित करणारा आणि जीवनातील प्रत्येक निर्णयामागील विज्ञान समजावून सांगणारा विषय आहे. प्रयोगातून शिकलेले ज्ञान विद्यार्थ्यांच्या आयुष्यभर उपयोगी पडते.”
अध्यक्षीय भाषणात पी. व्ही. एस. शास्त्री यांनी सांगितले की, ग्रामीण व निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला आहे. प्रयोगशाळेत विविध गणितीय मॉडेल्स, कृतीआधारित उपकरणे, शैक्षणिक साहित्य आणि आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना गणिताचा प्रत्यक्ष अनुभव घेत शिकण्याची संधी मिळणार आहे. उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील हे सहकार्य ग्रामीण शिक्षणासाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्घाटनानंतर मान्यवरांनी गणित प्रयोगशाळेची पाहणी करून गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेडच्या सामाजिक बांधिलकीचे तसेच महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन वाई प्रकल्पातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्कृष्टरीत्या केले. कार्यक्रमास दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
2) जावळी:-दुर्गम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला मोलाची साथ; मर्ढेश्वर डोंगरावरील पाच शाळांना शैक्षणिक साहित्य भेट.

२० हजार रुपयांचे साहित्य वाटप; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलला आनंद.
सातारा | जावळी, दि. २४ : “शिक्षणाशिवाय प्रगती नाही” हा विचार कृतीत उतरवत जावळी तालुक्यातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. केंजळ (ता. वाई) येथील वैभव जगताप व नलिनी जगताप यांच्या सहकार्याने, तसेच नितीन मोहिते यांच्या माध्यमातून मर्ढेश्वर डोंगर परिसरातील पाच दुर्गम शाळांना सुमारे २० हजार रुपये किमतीचे शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.
या उपक्रमाचा लाभ मर्डमुरे, कुंभारगणी, रेंडिमूरा, धनगरवाडी आणि धनगरवस्ती येथील शाळांमधील विद्यार्थ्यांना झाला. आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले असून त्यांच्या शिक्षणाला नवी प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाला महाराष्ट्र शिक्षक समितीचे अध्यक्ष उदय शिंदे, प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे संचालक किरण यादव, दरे बुद्रुक केंद्राचे केंद्रप्रमुख हंबीरराव जगताप, भणंग केंद्राचे केंद्रप्रमुख विनायक करंजेकर आणि प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस संदीप किर्वे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी मर्डमुरे गावचे पोलीस पाटील अमित मर्ढेकर, कुंभारगणीचे अशोक भिलारे, विविध शाळांच्या शाळा व्यवस्थापन समित्यांचे अध्यक्ष, ग्रामस्थ, पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सागर राऊत यांच्या प्रास्ताविकाने झाली. गणेश जगताप यांनी सूत्रसंचालन केले, तर दिगंबर होले यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भास्कर मर्ढेकर, खंडू सरवदे, सिंधू जाधव, अस्मिता जाधव, सारिका चव्हाण, निलेश साठे, प्रसन्न दांडगे, महादेव बोरफळे तसेच ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी, शिक्षणाविषयीची संवेदनशीलता आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठीचा आदर्श उपक्रम म्हणून कौतुकास पात्र ठरत आहे.




