पुणे:-सोनम वांगचुक व अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन.
पत्रकार विजय देवकुळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) पुणे:-सोनम वांगचुक व अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ पुण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आक्रमक आंदोलन.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी, काही काळ तणावाचे वातावरण.
पुणे : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि युवा आंदोलनाचे प्रमुख अभिजीत दिपके यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेस (शरदचंद्र पवार) पुणे शहराच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध करत मोठ्या संख्येने युवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी प्रशासनाकडे सादर केले.

या आंदोलनाचे विशेष आकर्षण म्हणजे आयोजित करण्यात आलेले स्वाक्षरी अभियान. आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने स्वाक्षऱ्या करून सोनम वांगचुक आणि अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाला आपला जाहीर पाठिंबा दर्शविला. या स्वाक्षऱ्यांच्या माध्यमातून जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आंदोलनादरम्यान परिसर घोषणांनी दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाचा आवाज दडपण्याचा कोणालाही अधिकार नसल्याचे सांगत, शांततापूर्ण आंदोलनांवर होणारी कारवाई थांबवावी आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
यावेळी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी हस्तक्षेप केल्याने काही काळ जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, आंदोलनकर्त्यांनी शांतता राखत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवले. अखेरीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले. जोशपूर्ण घोषणाबाजी, उत्स्फूर्त स्वाक्षरी अभियान आणि नागरिकांचा मोठा प्रतिसाद यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर काही काळ आंदोलनमय झाला आणि या आंदोलनाची शहरभर चर्चा रंगली.
2) पुणे: वारजे गोकुळनगर पठार, शिवशाही कॉलनी येथील धोकादायक वीज डीपींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.

पुणे : वारजे-माळवाडी येथील गोकुळनगर पठार परिसरातील शिवशाही कॉलनीमध्ये पावसाळ्यात नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण करणारी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर बसविण्यात आलेल्या काही वीज वितरणाच्या डीपी (Distribution Transformer) रस्त्याच्या अगदी मधोमध व पाण्याच्या साच्यात असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे या डीपींच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्यामुळे या ठिकाणी कधीही विजेचा प्रवाह (करंट) पाण्यात उतरून मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. या मार्गावरून दररोज लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने ये-जा करत असल्याने धोका अधिक गंभीर बनला आहे.
स्थानिक रहिवाशांनी अनेक वेळा संबंधित विभागाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले असून, अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. पावसाळा सुरू असताना अशा निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याची तीव्र भावना परिसरातून व्यक्त होत आहे.
शिवशाही कॉलनीतील नागरिकांनी महावितरण आणि पुणे महानगरपालिकेने तातडीने पाहणी करून धोकादायक ठिकाणी असलेल्या डीपी सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, तसेच पाणी साचणार नाही अशी व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा प्रशासनाने त्वरित कारवाई करून नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करावे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली आहे.




