मुंबई:-“मविआत ठिणगी की भूकंप? पवारांच्या ‘त्या’ भेटीने ठाकरे गट संतप्त; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल!”
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) मुंबई:-“मविआत ठिणगी की भूकंप? पवारांच्या ‘त्या’ भेटीने ठाकरे गट संतप्त; संजय राऊतांचा थेट हल्लाबोल!”

शरद पवारांच्या शिंदे दालन भेटीवरून महाविकास आघाडीत धुसफूस; महायुतीने साधला राजकीय डाव
मुंबई | प्रतिनिधी
मुंबई दि. ११ : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नासारख्या महत्त्वाच्या विषयावरील बैठकीदरम्यान विधानभवनात घडलेल्या एका राजकीय घडामोडीने महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फोडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्ष कार्यालयाला दिलेल्या भेटीवरून ठाकरे गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, खासदार संजय राऊत यांनी या कृतीवर थेट हल्लाबोल केला आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, “शरद पवार हे मोठे आणि आदरणीय नेते आहेत. मात्र, ज्यांनी महाविकास आघाडीचे सरकार पाडले, त्या एकनाथ शिंदेंच्या दालनात जाऊन बैठक घेणे योग्य नाही. अशा कृतीमुळे मोठ्या नेत्याची विश्वासार्हता कमी होते. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून, गद्दारांना अशी प्रतिष्ठा दिली जाऊ नये.”
राऊतांच्या या आक्रमक भूमिकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून तातडीने खुलासा करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, “शरद पवार यांच्या तब्येतीचा विचार करून बैठक दुसऱ्या मजल्यावर आयोजित करण्यात आली होती. हा केवळ योगायोग होता. प्रत्येक गोष्टीत राजकारण शोधू नये. महाविकास आघाडी पूर्वीप्रमाणेच एकत्र आहे.”
दरम्यान, महायुतीने या वादावर प्रतिक्रिया देत मविआला लक्ष्य केले. मंत्री उदय सामंत म्हणाले, “शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे आले, ही महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आहे. यात राजकारण शोधण्याचे कारण नाही.”
राज्यमंत्री योगेश कदम यांनीही सूचक विधान करत, “येत्या काही दिवसांत चांगले निर्णय होतील आणि एनडीएची ताकद आणखी वाढेल,” असे म्हटल्याने राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे.
सीमाप्रश्नाच्या बैठकीदरम्यान झालेल्या या भेटीमुळे महाविकास आघाडीतील समन्वय आणि अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले असून, आगामी काळात या वादाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2) मलकापूर:-“स्मशानभूमीजवळ सांडपाण्याचा महासागर! प्रशासन झोपेत, मलकापूरकरांचा जीव धोक्यात”

कराड | दि. १०
मलकापूर येथील स्मशानभूमी परिसरात ड्रेनेज व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून मुख्य ड्रेनेज पाईप ओव्हरफ्लो झाल्याने दूषित सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. दुर्गंधी, अस्वच्छता आणि निसरड्या रस्त्यामुळे नागरिकांचे जगणे अक्षरशः असह्य झाले असून प्रशासनाच्या निष्क्रिय कारभाराविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याने वाहनचालकांसाठी हा मार्ग जीवघेणा ठरत आहे. दुचाकी घसरून किरकोळ अपघात होत असून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे साचलेल्या सांडपाण्यामुळे डासांची पैदास वाढून डेंग्यू, मलेरिया यांसारख्या साथीच्या रोगांचा धोका निर्माण झाला आहे.
स्मशानभूमीसारख्या पवित्र आणि संवेदनशील परिसरात सांडपाण्याचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. “वारंवार तक्रारी करूनही अधिकारी केवळ आश्वासने देत आहेत; प्रत्यक्षात कोणतीही कारवाई होत नाही. आता आंदोलनाशिवाय पर्याय उरणार नाही,” असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
संबंधित विभागाकडे अनेकदा पाठपुरावा करूनही प्रश्न कायम असल्याने प्रशासनाच्या ढिम्म भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ड्रेनेज लाईनची तातडीने दुरुस्ती करून रस्त्यावरील सांडपाणी थांबवावे, परिसराचे निर्जंतुकीकरण करावे आणि नागरिकांना या त्रासातून त्वरित मुक्त करावे, अशी जोरदार मागणी मलकापूरकरांनी केली आहे.
3) मुंबई:-“होता जीवा म्हणून वाचला शिवा”ला ऐतिहासिक सलाम!

प्रतापगडाच्या पायथ्याशी वीरजीवाजी महाले यांचे भव्य स्मारक; पहिल्या टप्प्यात १ कोटींचा निधी जाहीर.
मुंबई | दि. १० :
शिवकालीन इतिहासातील अद्वितीय शौर्याचे प्रतीक असलेल्या वीरजीवाजी महाले यांच्या पराक्रमाला अखेर भव्य स्मारकाच्या रूपाने मानवंदना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयानुसार प्रतापगडाच्या पायथ्याशी वीरजीवाजी महाले यांचे आकर्षक स्मारक उभारण्यात येणार असून, या प्रकल्पासाठी पहिल्या टप्प्यात १ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली.
मंत्री देसाई यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाबळेश्वर दौऱ्यावेळी विविध शिवप्रेमी संघटनांनी स्मारकाची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पर्यटन विभागामार्फत प्रतापगडाच्या पायथ्याशी हे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्रतापगडाच्या ऐतिहासिक लढाईत अफझलखानाच्या हल्ल्यावेळी आपल्या समयसूचकता, धाडस आणि अद्वितीय पराक्रमाने छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवणारे वीरजीवाजी महाले हे शिवकालीन इतिहासातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व मानले जाते. “होता जीवा म्हणून वाचला शिवा” ही अजरामर झालेली उक्ती त्यांच्या शौर्याची साक्ष देणारी असल्याचे मंत्री देसाई यांनी नमूद केले.
दरवर्षी १० नोव्हेंबर रोजी प्रतापगडावर साजऱ्या होणाऱ्या शिवप्रताप दिनानिमित्त लाखो शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक, विद्यार्थी आणि पर्यटक प्रतापगडाला भेट देतात. या स्मारकामुळे प्रतापगडाच्या ऐतिहासिक आणि पर्यटन महत्त्वात मोठी भर पडणार असून, शिवकालीन वारसा पर्यटनाला नवी चालना मिळणार आहे.
वीरजीवाजी महाले यांचे स्मारक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संस्था, इतिहास संशोधक, शिवप्रेमी संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून होत होती. शासनाने या मागणीची दखल घेतल्याने इतिहासप्रेमी आणि शिवभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या स्मारकामुळे प्रतापगड हे शिवकालीन वारशाचे अधिक प्रभावी केंद्र म्हणून विकसित होईल आणि वीरजीवाजी महाले यांच्या शौर्यगाथेतून भावी पिढ्यांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
4) सातारा:-पालखी सोहळ्यासाठी प्रशासन अलर्ट!; वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या कडक सूचना, १,४०० विशेष बससह सर्व यंत्रणा सज्ज.

सातारा | दि. ११ : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढी वारी पालखी सोहळा १५ ते १९ जुलैदरम्यान सातारा जिल्ह्यातून मार्गस्थ होणार असून, लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षित, स्वच्छ आणि सुरळीत प्रवासासाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून कोणतीही त्रुटी राहू नये, अशा स्पष्ट आणि कडक सूचना जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत पालखी मार्गावरील रस्ते, वाहतूक, वीज, पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य सेवा, सुरक्षा आणि पार्किंग व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पालखी रथ वेळेत मार्गस्थ होण्यासाठी वाहतूक नियोजन प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश पोलीस विभागाला देण्यात आले.
राव रामोशी पुलावरील बॅरिकेडिंगची तातडीने दुरुस्ती, निरा नदी ते लोणंद मार्गावरील दुकानांचे नियोजन, पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती आणि सुरू असलेल्या रस्ते कामांमुळे अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. लोणंद परिसरातील वाढत्या वाहनांच्या गर्दीचे प्रभावी नियोजन करण्यावरही विशेष भर देण्यात आला.
महावितरणला अखंड वीजपुरवठा राखण्यासह तुटलेल्या विद्युत तारा तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. मुक्कामस्थळी स्वच्छता मोहीम, दत्त घाट परिसराची स्वच्छता आणि रस्त्यालगतच्या विहिरींना सुरक्षिततेसाठी बॅरिकेडिंग करण्याचे निर्देशही देण्यात आले.
वारकऱ्यांसाठी टँकरद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी, फिरते दवाखाने, पुरेशा रुग्णवाहिका, औषधसाठा तसेच गंभीर रुग्णांसाठी निश्चित रुग्णालयांची व्यवस्था ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आले. पालखी मार्गावर आणि मुक्कामस्थळी मोठ्या प्रमाणात शौचालये उभारण्यावरही भर देण्यात आला.
पालखी काळात राज्य परिवहन महामंडळाच्या १,४०० विशेष बस फेऱ्या चालविण्यात येणार असून, त्या स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच दूरसंचार सेवा अखंड ठेवणे आणि अन्नपदार्थांच्या गुणवत्तेवर नियमित देखरेख ठेवण्याच्या सूचनाही संबंधित विभागांना देण्यात आल्या.
बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी विठ्ठल इनामदार, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
5) सातारा:-“अतिदुर्गम नाणेलची राज्यात दखल!; ‘ईएफ डिजिटायझेशन’मध्ये साताऱ्याचे पहिले १०० टक्के गाव”

बीएलओ आशाराणी यमकर यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष सन्मान; दुर्गम भागातून उभारला आदर्श.
सातारा | दि. ११ :
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेत पाटण विधानसभा मतदारसंघातील अतिदुर्गम नाणेल गावाने उल्लेखनीय कामगिरी करत सातारा जिल्ह्यात इतिहास रचला आहे. बीएलओ ॲपद्वारे गणना प्रपत्र (EF) चे शंभर टक्के डिजिटायझेशन पूर्ण करणारे नाणेल हे जिल्ह्यातील पहिले गाव ठरले आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल बीएलओ आशाराणी रामचंद्र यमकर यांचा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन विशेष सन्मान करण्यात आला.
३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत जिल्हाभर बीएलओमार्फत घरोघरी जाऊन गणना फॉर्म भरून घेणे आणि त्याचे डिजिटायझेशन करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अत्यंत दुर्गम व डोंगराळ भागात असलेल्या नाणेल गावातही आशाराणी यमकर यांनी अथक परिश्रम घेत हे काम वेळेत आणि यशस्वीरित्या पूर्ण केले.
नाणेल गावात एकूण २४७ मतदार असून त्यापैकी २४४ मतदारांचे डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. उर्वरित तीन मतदारांपैकी एक मतदार मयत असून दोन मतदार स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या गावाने १०० टक्के ‘ईएफ डिजिटायझेशन’ पूर्ण केल्याची नोंद झाली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी श्रीमती यमकर यांच्या कार्याचे कौतुक करत इतर गावांनीही नाणेलचा आदर्श घेऊन ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे तसेच उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण उपस्थित होते.
या यशामागे जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपविभागीय अधिकारी सोपान टोंपे आणि तहसीलदार अनंत गुरव यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगण्यात आले. दुर्गम भागातून साध्य झालेल्या या कामगिरीमुळे सातारा जिल्ह्याच्या निवडणूक विभागाचे राज्यभर कौतुक होत आहे.
6) मुंबई:-कोट्यवधींचे रस्ते, दर्जा मात्र सुमार! साताऱ्यातील ‘त्या’ कंत्राटदारांवर सरकारचा दणका; चौकशीचे आदेश, ब्लॅकलिस्टची कारवाई अटळ.

मुंबई दि. ११ : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात पंतप्रधान ग्रामसडक योजना आणि मुख्यमंत्री सडक योजना अंतर्गत सुरू असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या रस्ते कामांच्या निकृष्ट दर्जाबाबत राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. या कामांची एका महिन्याच्या आत सखोल चौकशी करून दोषी आढळणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करत फौजदारी व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी स्पष्ट ग्वाही ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी विधानसभेत दिली.
विधानसभेतील प्रश्नोत्तराच्या तासात आमदार राजेंद्र राऊत यांनी बनगरवाडी–वळई आणि रानणगोंदवले खुर्द येथील रस्ते कामांच्या कथित निकृष्ट दर्जाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना मंत्री गोरे यांनी रानणगोंदवले खुर्द रस्त्यासाठी सुमारे ५.७७ कोटी रुपये, तर वळई–बनगरवाडी रस्त्यासाठी १२ कोटी रुपये खर्चाची कामे सुरू असल्याची माहिती सभागृहात दिली.
कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही कामाच्या गुणवत्तेबाबत स्थानिक नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत असल्याने सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. चौकशी पूर्णपणे निष्पक्ष राहावी यासाठी विभागाबाहेरील अधिकाऱ्यांची स्वतंत्र समिती नियुक्त केली जाणार असून, या समितीचे नेतृत्व मुख्यमंत्री सडक योजनेचे सचिव करणार असल्याचेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय महेंद्र कन्स्ट्रक्शन आणि देसाई कन्स्ट्रक्शन यांनी सातारा जिल्ह्यात केलेल्या इतर सर्व रस्ते कामांचीही गुणवत्ता तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एका महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्यात येणार असून, दोषी आढळणाऱ्या कंत्राटदारांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचा इशारा मंत्री गोरे यांनी दिला.
सरकारच्या या आक्रमक भूमिकेमुळे निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांमध्ये खळबळ उडाली असून, सातारा जिल्ह्यातील रस्ते कामांच्या गुणवत्तेवर आता सरकारची करडी नजर राहणार आहे.
7) कराड:-“वीज विकासालाच चोरट्यांचा शॉक!”
डिचोलीत १९ खांबांवरील लाखो रुपयांची वीजतार लंपास; आरडीएसएस प्रकल्पालाच सुरुंग.

सातारा | कराड, दि. ११ :
कराड तालुक्यातील डिचोली परिसरात शासनाच्या आरडीएसएस (RDSS) वीज पायाभूत सुविधा प्रकल्पालाच चोरट्यांनी लक्ष्य करत धाडसी चोरी केली आहे. बाबरमाची ते डिचोली मार्गावरील तब्बल ३,१३५ मीटर लांबीची १०० स्क्वेअर एमएम ॲल्युमिनियम वीजतार अज्ञात चोरट्यांनी कापून लंपास केली. या चोरीमुळे शासनाचे १ लाख ४१ हजार ७५ रुपयांचे नुकसान झाले असून, कराड शहर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खटाव तालुक्यातील धोंडेवाडी येथील अजिंक्य ईश्वर शेळके (वय २६) हे महावितरणचे कंत्राटदार असून, त्यांच्या ‘शेळके इलेक्ट्रिक’ या फर्ममार्फत आरडीएसएस प्रकल्पांतर्गत ‘आरएमसी स्विच गिअर लिमिटेड’ कंपनीचे सब-कॉन्ट्रॅक्टर म्हणून या भागात वीजवाहिनी उभारणीचे काम सुरू आहे.
१ जुलै रोजी पाहणी केली असता सर्व वीजतारा सुरक्षित होत्या. मात्र, ५ जुलै रोजी डिचोलीचे सरपंच सुभाष कोळेकर यांनी वीजतारा गायब झाल्याची माहिती दिली. त्यानंतर ६ जुलै रोजी घटनास्थळी पाहणी केली असता १९ वीजखांबांमधील संपूर्ण वीजतार कापून चोरीला गेल्याचे उघड झाले.
परिसरात शोधमोहीम राबवूनही चोरीचा कोणताही मागमूस लागला नाही. अखेर कंत्राटदार अजिंक्य शेळके यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, एवढ्या मोठ्या प्रमाणावर वीजतार चोरी करणाऱ्या टोळीचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
8) सातारा:-“लग्नाच्या खोट्या आश्वासनाचा सापळा; चार वर्षे अत्याचार, व्हिडिओ काढून ब्लॅकमेलचा प्रयत्न — पाचगणीतील दोघांवर गुन्हा”

सातारा | दि. ११ :
लग्नाचे आमिष दाखवून ३१ वर्षीय महिलेवर तब्बल चार वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची, तिच्या संमतीशिवाय तिचे खासगी व्हिडिओ चित्रीत करून मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पाचगणी येथील दोन संशयितांविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य संशयिताने पीडित महिलेला लग्नाचे खोटे आश्वासन देत विश्वास संपादन केला. त्यानंतर गेल्या चार वर्षांपासून तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. तसेच जावळी तालुक्यातील करहर गावच्या हद्दीतील निर्जन ठिकाणी नेऊन तिच्या संमतीशिवाय तिचे खासगी व्हिडिओ मोबाईलवर चित्रीत केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या व्हिडिओंचा आधार घेत पीडितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न झाल्याचेही समोर आले आहे.
याच प्रकरणाचा गैरफायदा घेत दुसऱ्या संशयितानेही पीडित महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून अखेर पीडित महिलेने सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध संबंधित कायदेशीर कलमान्वये गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे सातारा आणि पाचगणी परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
9) कराड:-खाकीतील कर्तव्य आणि माणुसकीचा दुर्मिळ संगम!; दीड तासात मृताची ओळख, गरीब कुटुंबासाठी पोलिसांनीच केले अंत्यसंस्कार.

सातारा | कराड, दि. ११ :
कराड शहर पोलिसांनी कर्तव्यदक्षता आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून देणारी हृदयस्पर्शी कामगिरी केली आहे. कोयना नदीपात्रात आढळलेल्या अनोळखी पुरुषाच्या मृतदेहाची अवघ्या दीड तासात ओळख पटवत तपासातील तत्परता सिद्ध केली. त्यानंतर मृताच्या कुटुंबाची अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनीच पुढाकार घेत अंत्यसंस्काराची जबाबदारी स्वीकारली. या संवेदनशील कृतीमुळे कराड शहर पोलिसांवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
गुरुवारी कोयना नदीपात्रात एका पुरुषाचा मृतदेह तरंगताना नागरिकांच्या निदर्शनास आला. माहिती मिळताच कराड शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब असल्याने त्याची ओळख पटवणे मोठे आव्हान होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा आमले, पोलीस उपनिरीक्षक रेखा देशपांडे, कपिल आगलावे, भार्गव पवार आणि विक्रम भंडारे यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि मृताच्या अंगावरील विशिष्ट खुणेच्या आधारे पोलिसांनी अवघ्या दीड तासात मृताची ओळख रमेश भानुदास कोळेकर (रा. कार्वे, ता. कराड, जि. सातारा) अशी पटवली. त्यानंतर नातेवाईकांशी संपर्क साधून पंचनामा व शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
मात्र, यानंतर समोर आलेली वास्तवाची दुसरी बाजू अधिक वेदनादायी होती. रमेश कोळेकर यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने अंत्यसंस्काराचा खर्च उचलणेही त्यांना शक्य नव्हते. ही बाब लक्षात येताच खाकी वर्दीतील माणुसकी जागी झाली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, ‘बिईंग ह्युमन ग्रुप’ तसेच ‘न्यू नवहिंद गणेश मंडळ’चे गणेश प्रल्हाद पवार यांनी तातडीने पुढाकार घेत अंत्यसंस्काराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. सर्वांच्या सहकार्याने रमेश कोळेकर यांच्यावर धार्मिक विधीनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
गुन्ह्यांचा तपास, कायद्याची अंमलबजावणी आणि जनतेच्या सुरक्षेसोबतच सामाजिक संवेदनशीलताही जपणारे कराड शहर पोलीस पुन्हा एकदा समाजासमोर आदर्श ठरले आहेत. त्यांच्या या माणुसकीपूर्ण कृतीचे कराड परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.
10) कराड:-“दारू पिऊन स्टेअरिंग पकडलं तर थेट गुन्हा!” कराड पोलिसांचा कडक इशारा; दीड वर्षांत ३६९ मद्यधुंद चालकांवर कारवाई.

सातारा | कराड दि. ११ :
रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी कराड शहर वाहतूक शाखेने ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम उघडली असून, गेल्या दीड वर्षांत तब्बल ३६९ मद्यधुंद वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर आता केवळ दंड नाही, तर थेट गुन्हा आणि वाहन परवाना रद्द करण्याची कारवाईही सुरू करण्यात आली आहे.
वाहतूक शाखेच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये १९१, तर २०२६ च्या केवळ सहा महिन्यांतच १७८ चालकांवर कारवाई झाली आहे. यावरून मद्यधुंद वाहनचालकांची समस्या गंभीर असल्याचे स्पष्ट होत असले, तरी पोलिसांनी तपासणी अधिक प्रभावी केल्याचेही दिसून येत आहे.
पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
सैदापूर कॅनॉल, कृष्णा नाका, विजय दिवस चौक, दत्त चौक, कोल्हापूर नाका, ढेबेवाडी फाटा, मलकापूर फाटा, वारूंजी फाटा तसेच महामार्ग व सर्व्हिस रोडवर रात्री कडक नाकाबंदी करून ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी केली जात आहे.
नुकतेच वाहतूक शाखेचा कार्यभार स्वीकारलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांनी ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’बरोबरच बेदरकार आणि ‘धूम स्टाईल’ने वाहन चालविणाऱ्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र केली आहे. पोलिसांचा भर आता केवळ दंडावर नसून, कायदेशीर कारवाई आणि प्रतिबंधात्मक उपायांवर आहे.
याशिवाय, मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांचे वाहन परवाने निलंबित किंवा कायमचे रद्द करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविले जात आहेत. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांना मोठा कायदेशीर फटका बसणार आहे.
“मद्यधुंद वाहनचालकांमुळे अनेक गंभीर अपघात घडले आहेत. निष्पाप नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असून, नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.”
— राजश्री पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड
“मद्यप्राशनामुळे चालकाची निर्णयक्षमता कमी होते, वाहनावरील नियंत्रण सुटते आणि अपघाताचा धोका अनेकपटीने वाढतो. स्वतःच्या आणि इतरांच्या जिवाशी खेळू नका.”
— संदीप साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा कराड
11) कराड:-“जुळेवाडीच्या वर्षानुवर्षांच्या वेदनेला अखेर न्याय!; विधानसभेत आमदारांच्या पाठपुराव्याला यश, स्मशानभूमीसाठी निधीची मंत्र्यांची ग्वाही”

सातारा | कराड :
कराड दक्षिण मतदारसंघातील जुळेवाडी गावाचा अनेक वर्षांपासून रखडलेला स्वतंत्र स्मशानभूमीचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. पावसाळी अधिवेशनात कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी विधानसभेत हा प्रश्न ठामपणे मांडल्यानंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी स्मशानभूमीसाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.
प्रश्नोत्तराच्या तासात आ. डॉ. भोसले यांनी जुळेवाडी गावातील सुमारे ३ हजार ४४७ लोकसंख्येला आजही स्वतंत्र स्मशानभूमी नसल्याने अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. वाढती लोकसंख्या लक्षात घेता हा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी त्यांनी केली.
यावर उत्तर देताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी हा विषय अत्यंत संवेदनशील असल्याचे सांगत संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेण्यात येईल. जागा निश्चिती व आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून स्मशानभूमीसाठी लागणारा निधी प्राधान्याने उपलब्ध करून दिला जाईल, अशी स्पष्ट ग्वाही सभागृहात दिली.
जुळेवाडी ग्रामस्थांचा हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. स्वतंत्र स्मशानभूमीअभावी नागरिकांना अंत्यविधीसाठी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. आता विधानसभेतच मंत्र्यांनी निधीची हमी दिल्याने या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे.
आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाल्याने जुळेवाडी ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून, वर्षानुवर्षे भेडसावणारी ही मूलभूत समस्या लवकरच इतिहासजमा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




