आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-समाजकार्यातील आयुष्यभराच्या योगदानाचा सन्मान! दत्तात्रय महांगडे यांना ‘वसुंधरा पुरस्कार–२०२६’

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-समाजकार्यातील आयुष्यभराच्या योगदानाचा सन्मान! दत्तात्रय महांगडे यांना ‘वसुंधरा पुरस्कार–२०२६’

वाई, दि. ०३ :
वाई तालुक्यातील ज्येष्ठ समाजसेवक, राष्ट्रसेवा दलाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय महांगडे यांना सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दीर्घकालीन व उल्लेखनीय योगदानाची दखल घेत इचलकरंजी येथील वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्थेचा प्रतिष्ठेचा ‘वसुंधरा पुरस्कार–२०२६’ प्रदान करण्यात आला.
इचलकरंजी येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवन येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्यात माजी खासदार तथा कर्नाटक बँकेच्या संचालिका डॉ. निवेदिता माने यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय महासंचालक, भारतीय क्रीडा विकास निलेश राणे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, उदय धातुंडे, राजेंद्र काणे, रवींद्र माने, सत्यवान हाके, प्रशांत देवकर, विजय तोडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
महांगडे यांनी राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करताना वाई तालुका शिक्षकेत्तर संघटनेचे माजी उपाध्यक्ष म्हणून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने लढा दिला. शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संस्कार आणि जबाबदारीची भावना रुजविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध जबाबदारीच्या पदांवर कार्यरत आहेत.
सेवानिवृत्तीनंतरही महांगडे समाजकार्यात तितक्याच सक्रियतेने कार्यरत असून, “आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” या भावनेतून त्यांनी अनेक विवाह जुळवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. तसेच दूरदर्शन मालिका आणि चित्रपटांमधील अभिनयातून त्यांनी सांस्कृतिक क्षेत्रातही स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
या सन्मानानंतर सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांसह वाई तालुक्यातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले. महांगडे यांना मिळालेल्या या प्रतिष्ठेच्या पुरस्कारामुळे वाई तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

2) वाई:-भुईंजजवळ मध्यरात्रीचा भीषण अपघात; दुचाकी दुभाजकावर आदळली, चालकाचा जागीच मृत्यू.

सातारा | वाई, दि. ०३ : पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील भुईंजजवळ कृष्णा नदीवरील उड्डाणपुलावर बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. दुचाकीवरील ताबा सुटून वाहन दुभाजकावर जोरात आदळल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद बबनराव धुमाळ (वय ४२, रा. सोनके, ता. कोरेगाव) हे दुचाकीवरून पुण्याच्या दिशेने जात होते. भुईंजजवळील कृष्णा नदीवरील उड्डाणपुलावर आल्यानंतर त्यांच्या दुचाकीवरील ताबा सुटला आणि वाहन थेट रस्त्याच्या दुभाजकावर जोरात आदळले. धडक इतकी भीषण होती की प्रमोद धुमाळ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आला.
दरम्यान, पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील अनेक ठिकाणी अद्यापही दुरुस्ती व देखभालीची कामे अपूर्ण असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रस्त्यावर साचणारे पाणी, खड्डे आणि डबकी यामुळे अपघातांचा धोका वाढत असून संबंधित यंत्रणांनी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

3) भुईंज:-सहकाराच्या बळावर शेतकऱ्यांची भरारी! भुईंजमध्ये सातारा जिल्हा बँकेचा ‘सहकार मेळावा’ उत्साहात.

सातारा | भुईंज दि. ०३ : शेतकऱ्यांचा आर्थिक विकास, आधुनिक बँकिंगची माहिती आणि विविध शासकीय योजनांचा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या भुईंज शाखेत ‘सहकार सप्ताह’ अंतर्गत आयोजित सहकार मेळावा उत्साहात पार पडला.
यावेळी एफएलसी समन्वयक प्रणिता जाधव यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “महाराष्ट्राने देशाला सहकार चळवळीची दिशा दिली आहे. सहकाराच्या बळावर राज्य आणि जिल्ह्याने मोठी प्रगती साधली असून सातारा जिल्हा बँक ही शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मजबूत आधार आहे. बँकेच्या विविध योजना आणि सहकार क्षेत्रातील कल्याणकारी उपक्रमांचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.”
बँकेचे अध्यक्ष खा. नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, व्यवस्थापक राजेंद्र गाढवे, राजेंद्र भिलारे आणि विभागीय विकास अधिकारी संजय मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम राबविण्यात आला.
मेळाव्यात ठेवी व कर्ज योजना, युपीआय, रुपे कार्ड, सुरक्षित डिजिटल व्यवहार, केसीसी कार्ड, शेतीपूरक कर्ज योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, आर्थिक समावेशन योजना, सायबर सुरक्षा आणि विविध विमा योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित शेतकरी व ग्राहकांनी बँकिंग सेवा, डिजिटल व्यवहार आणि विविध योजनांबाबत अनेक प्रश्न विचारले. बँकेच्या अधिकाऱ्यांनी सर्व शंकांचे सविस्तर निरसन केल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी भुईंज शाखा प्रमुख मनोज सोनावणे, विकास अधिकारी सागर जाधव, परिसरातील नागरिक, प्रगतशील शेतकरी तसेच महिला बचत गटांच्या सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या उपक्रमाचे परिसरातील ग्राहकांनी विशेष स्वागत करत बँकेच्या जनजागृती उपक्रमाचे कौतुक केले.

4) वाई:-अमेरिकन सिनेटर जोशी विद्यालयात; राज्यात प्रथम आलेल्या स्वामी क्षीरसागरचा विशेष गौरव!
डॉ. मधुकर जोशी स्मृती शिष्यवृत्ती वितरण सोहळा उत्साहात; गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान.

वाई | प्रतिनिधी
वाई दी.१: वाई येथील तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी विद्यालयात डॉ. मधुकर जोशी यांच्या स्मरणार्थ आयोजित शिष्यवृत्ती वितरण व गुणगौरव सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला अमेरिकेचे सिनेट सदस्य सेनेटर व्हेन हार्पर, सेनेटर रॉन विंटरटन, अमेरिकेतील सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. अशोक जोशी तसेच हार्वर्ड विद्यापीठाची विद्यार्थिनी वामिनी जैन यांची प्रमुख उपस्थिती लाभल्याने कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले.
यावेळी दहावीच्या परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शंभर टक्के गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या स्वामी क्षीरसागरचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याच्या उल्लेखनीय यशाबद्दल उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले.
सेनेटर व्हेन हार्पर यांनी विद्यार्थ्यांनी सातत्य, चिकाटी आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर यश संपादन करावे, असा प्रेरणादायी संदेश दिला. त्यांनी विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचेही विशेष कौतुक केले.
डॉ. अशोक जोशी यांनी डॉ. मधुकर जोशी यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीची रक्कम वाढवून अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा मानस व्यक्त केला. हार्वर्ड विद्यापीठाची विद्यार्थिनी वामिनी जैन यांनी शिक्षण हेच यशाचे सर्वात प्रभावी साधन असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले.
राज्यात प्रथम आलेल्या स्वामी क्षीरसागर यांनी आपल्या यशाचे श्रेय विद्यालय, शिक्षक आणि पालकांना देत कठोर परिश्रम, शिस्त व सातत्य यांनाच यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले.
मुख्याध्यापक रवींद्र कांबळे यांनी प्रास्ताविकात विद्यालयाच्या उज्ज्वल निकालाचा आढावा घेत डॉ. अशोक जोशी यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष चौधरी यांनी केले. यादीवाचन योगिता पवार व आशिष कांबळे यांनी केले.
यावेळी यशवंत शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा वृषाली ललित चव्हाण, संचालक श्रीकांत चव्हाण, अनिल बाबर, नगरसेवक भारतदादा खामकर, गुळूब हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहन धायगुडे, उपमुख्याध्यापिका त्रिवेणी पुजारी, पर्यवेक्षक रवींद्र संकपाळ तसेच पालक, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

 

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button