फलटण:-कृषी दिनानिमित्त प्रगतशील शेतकरी अनिल कदम यांचा यथोचित सत्कार.
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कृषी दिनानिमित्त प्रगतशील शेतकरी अनिल कदम यांचा यथोचित सत्कार.

जिल्हास्तरीय बाजरी स्पर्धेत तृतीय क्रमांक; नैसर्गिक शेतीच्या कार्याची शासनाकडून दखल.
फलटण :- गिरवी (ता. फलटण, जि. सातारा) येथील भूमिपुत्र, प्रगतशील, प्रयोगशील तसेच सेंद्रिय, जैविक व नैसर्गिक शेतीचे अभ्यासक शेतकरी अनिल बुवासाहेब कदम यांचा कृषी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत आयोजित पिक बाजरी स्पर्धेत जिल्हास्तरावर तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासन कृषी विभाग, सातारा जिल्हा परिषद कृषी विभाग आणि फलटण पंचायत समिती कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी दिन कार्यक्रमात फलटण पंचायत समितीच्या सभागृहात हा गौरव सोहळा पार पडला.
यावेळी फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले, गटविकास अधिकारी अक्षय गव्हाटे, कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड तसेच उपविभागीय कृषी अधिकारी खलीद मोमीन यांच्या हस्ते अनिल कदम यांना सन्मानपत्र व जांभूळाचे रोप देऊन गौरविण्यात आले.
कृषी हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून शाश्वत शेती ही आजच्या काळाची गरज बनली आहे. रासायनिक शेतीबरोबरच सेंद्रिय व नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल पर्यावरण संरक्षण, जमिनीचे आरोग्य, पाण्याची बचत आणि विषमुक्त अन्ननिर्मितीसाठी महत्त्वाचा ठरत आहे. बाजरीसारखी भरडधान्ये ही पौष्टिक, कमी पाण्यावर येणारी व हवामान बदलाचा सामना करणारी पिके असल्याने त्यांचे उत्पादन वाढविणे ही काळाची गरज असल्याचे कृषी तज्ज्ञही सांगतात.
सत्काराला उत्तर देताना अनिल बुवासाहेब कदम यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी कृषी विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे योगदान कौतुकास्पद असल्याचे नमूद केले. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, हवामानाचा अचूक अंदाज, मृदा व्यवस्थापन आणि बाजारपेठेची माहिती वेळेवर मिळाल्यास उत्पादनवाढीसह उत्पन्नातही निश्चित वाढ होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
याचबरोबर फलटण तालुक्यात कृषी विज्ञान केंद्र आणि हवामान केंद्र सुरू करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच शेतकऱ्यांना दररोजचे अद्ययावत बाजारभाव उपलब्ध व्हावेत यासाठी फलटण पंचायत समितीमध्ये डिजिटल बाजारभाव फलक सुरू करण्याची मागणीही केली.
याबाबत सभापती शिवांजली भोसले यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त करत कृषी विज्ञान केंद्र, हवामान केंद्र तसेच डिजिटल बाजारभाव फलक उभारणीसाठी फलटण पंचायत समिती आगामी काळात आवश्यक पाठपुरावा करेल, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन कृषी अधिकारी नवनाथ फडतरे यांनी केले, तर सूत्रसंचालन सहायक कृषी अधिकारी नेवसे यांनी केले.
“शेतकरी समृद्ध तर देश समृद्ध” या विचाराला साजेसा हा सन्मान असून, अनिल कदम यांच्या कार्यातून आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड पारंपरिक ज्ञानाशी घालत नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्याची प्रेरणा इतर शेतकऱ्यांनाही मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




