यवतमाळ:-आमदारांच्या सूचनेला केराची टोपली! आर्णीच्या गटविकास अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार..!
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण - 8208717483

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

यवतमाळ:-आमदारांच्या सूचनेला केराची टोपली! आर्णीच्या गटविकास अधिकाऱ्यांवर निलंबनाची टांगती तलवार..!

ॲड.पंडित राठोड यांची ग्रामविकास मंत्र्यांकडे थेट तक्रार; जांब येथील देयके जाणीवपूर्वक अडवल्याचा गंभीर आरोप.
आर्णी
आर्णी तालुक्यातील जांब येथील विकासकामांची देयके जाणीवपूर्वक अडवून ठेवणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वरिष्ठ लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडेही सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करणाऱ्या गटविकास अधिकारी रमेश खारोडे यांची विभागीय चौकशी करून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी धडक मागणी ॲड. पंडित राठोड यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याकडे एका लेखी तक्रारीद्वारे केली आहे.
निधी उपलब्ध असूनही देयके प्रलंबित
ग्रामविकास मंत्र्यांना दिलेल्या निवेदनानुसार, ८ एप्रिल २०२६ रोजीच स्थानिक विकास निधीची रक्कम जांब ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा झाली आहे. मात्र, निधी उपलब्ध असूनही अद्याप देयके मंजूर करण्यात आलेली नाहीत. विशेषतः ‘संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजने’अंतर्गत जी विकासकामे पूर्ण झाली आहेत, त्यांचे एम.बी. (Measurement Book) आणि सी.सी. (Completion Certificate) हेतुपुरस्सर प्रलंबित ठेवण्यात आल्याचा अत्यंत गंभीर आरोप ॲड. राठोड यांनी केला आहे.

राजकीय व जातीय आकसापोटी दुजाभाव
ॲड. पंडित राठोड यांनी राज्यस्तरीय अशासकीय सदस्य या नात्याने स्वतः या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. शासनाच्या निकषांनुसार ही सर्व कामे अत्यंत दर्जेदार झाली असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला आहे. मात्र, इतर गावांमधील निकृष्ट दर्जाच्या कामांची देयके विनासायास मंजूर होत असताना, जांब येथील दर्जेदार कामांची देयके केवळ राजकीय आणि जातीय प्रेरित तक्रारींच्या आधारावर रोखली जात असल्याचा खळबळजनक दावा या तक्रारीत करण्यात आला आहे.
आमदारांच्या दूरध्वनीकडेही दुर्लक्ष
या प्रकरणातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे, मा. धर्मगुरू आमदार बाबुसिंगजी महाराज यांनी स्वतः गटविकास अधिकारी रमेश खारोडे यांना तीन वेळा दूरध्वनीवरून यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. मात्र, खारोडे यांनी या सूचनांना वाटाण्याच्या अक्षता लावत वरिष्ठ लोकप्रतिनिधींचा स्पष्ट अवमान केला आहे. अधिकाऱ्याच्या या अरेरावीच्या कार्यपद्धतीमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मंत्र्यांकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या:
तात्काळ देयके मंजुरी: मौजा जांब येथील प्रलंबित एम.बी., सी.सी. आणि अडवून ठेवलेली सर्व देयके विनाविलंब काढण्यात यावीत.
विभागीय चौकशी व निलंबन: गटविकास अधिकारी रमेश खारोडे यांच्या संशयास्पद कार्यपद्धतीची सखोल विभागीय चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर थेट निलंबनाची कारवाई करावी.
तत्काळ बदली: मनमानी कारभार करणाऱ्या या अधिकाऱ्याची आर्णी येथून तत्काळ उचलबांगडी (बदली) करण्यात यावी.
ग्रामविकास मंत्री या गंभीर प्रकरणाची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांवर नेमकी काय कारवाई करणार, याकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.




