वाई:-“रस्ता की मृत्यूचा सापळा?” वाई–सुरूर–पोलादपूर मार्गावर टेम्पो रुतला; भ्रष्टाचाराच्या चिखलात विकास, ठेकेदार-प्रशासनावर संतापाचा स्फोट!
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-“रस्ता की मृत्यूचा सापळा?” वाई–सुरूर–पोलादपूर मार्गावर टेम्पो रुतला; भ्रष्टाचाराच्या चिखलात विकास, ठेकेदार-प्रशासनावर संतापाचा स्फोट!

वाई, दि. २ : वाई–सुरूर–पोलादपूर मार्गावरील निकृष्ट दर्जाच्या रस्तेबांधणीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाईतील भद्रेश्वर पूल परिसरात किरण हॉटेलजवळ मुख्य रस्ता अचानक खचल्याने एक अवजड टेम्पो रस्त्यातच रुतून बसला. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली; मात्र या घटनेने ठेकेदाराच्या कामाच्या दर्जावर आणि संबंधित यंत्रणांच्या निष्क्रियतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या मार्गावरील प्रवास हा आता अक्षरशः जीव धोक्यात घालून करण्याची वेळ आली आहे. ठिकठिकाणी पडलेले प्रचंड खड्डे, अर्धवट आणि संथ गतीने सुरू असलेले काम, तसेच निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे रोज अपघात घडत असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. काहींना जीवही गमवावा लागल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
शासनाने दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करण्यात ठेकेदार अपयशी ठरला. मुदतवाढ मिळाल्यानंतरही कामाचा वेग अत्यंत संथ असून दर्जाबाबत सातत्याने तक्रारी होत आहेत. हे सर्व सुरू असताना संबंधित अधिकारी आणि यंत्रणा मात्र मूकदर्शकाची भूमिका घेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
या रखडलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी नित्याची झाली असून व्यापारी, शेतकरी आणि वाहतूकदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. व्यवसाय ठप्प झाल्याने अनेकांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
आता संतप्त नागरिकांनी शासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि MSRDC यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. “जनतेच्या पैशांची उधळपट्टी आणि नागरिकांच्या जीवाशी होणारा खेळ यापुढे सहन केला जाणार नाही. तातडीने कारवाई झाली नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन उभारले जाईल,” असा इशारा नागरिक आणि व्यापाऱ्यांनी दिला आहे.
2) वाई:-सलग दुसऱ्या वर्षी राज्याचा मान! ‘किसन वीर’चा पारदर्शक कारभार पुन्हा ठरला आदर्श; शासनाकडून प्रशस्तीपत्राने गौरव.

सातारा | वाई, दि. ०२ : एकेकाळी आर्थिक संकटाच्या गर्तेत सापडलेल्या किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याने आज पारदर्शक प्रशासन आणि आर्थिक शिस्तीच्या जोरावर नवा विश्वास निर्माण केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या राज्य वस्तू व सेवा कर (GST) विभागाने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात जास्तीत जास्त व्हॅट भरणा आणि कर नियमांचे काटेकोर पालन केल्याबद्दल कारखान्याला सलग दुसऱ्या वर्षी ‘प्रशस्तीपत्र’ देऊन सन्मानित केले आहे.
राज्य कर सहआयुक्त श्रीमती प्रज्ञा पांडे यांच्या हस्ते आयोजित समारंभात कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, संचालक संदीप चव्हाण आणि चीफ अकाउंटंट आर. जी. उन्हाळे यांनी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार स्वीकारला.
वाई, खंडाळा, महाबळेश्वर, सातारा, जावली आणि कोरेगाव या सहा तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा असलेला हा कारखाना काही वर्षांपूर्वी आर्थिक अडचणीत होता. बँकांचे अर्थसहाय्य बंद झाल्याने कारखान्याचे अस्तित्वच धोक्यात आले होते. अशा वेळी मदत व पुनर्वसन मंत्री तथा कारखान्याचे चेअरमन ना. मकरंद पाटील आणि खा. नितीन पाटील यांनी नेतृत्व स्वीकारत कारखान्याची आर्थिक घडी पुन्हा बसवली.
गेल्या चार वर्षांत कोणत्याही बँकेचे कर्ज न घेता शेतकऱ्यांची ऊसबिले, वाहनधारकांची देयके आणि व्यापाऱ्यांची थकबाकी वेळेवर अदा करण्यात आली. त्याचबरोबर जीएसटी, इन्कम टॅक्स, व्हॅट, प्रॉव्हिडंट फंडसह सर्व शासकीय देयके नियमित भरून आर्थिक शिस्तीचा आदर्श निर्माण करण्यात आला.
यावेळी व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे म्हणाले, “ना. मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या हितासाठी कठोर निर्णय घेतले. आर्थिक शिस्त आणि पारदर्शकतेमुळे सलग दुसऱ्या वर्षी मिळालेला हा पुरस्कार म्हणजे ‘किसन वीर’च्या उज्ज्वल भविष्यास मिळालेली मोठी पावती आहे.”
या गौरवाबद्दल ना. मकरंद पाटील, खा. नितीन पाटील, व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, संचालक मंडळाने कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. कारखान्याच्या या यशाबद्दल सातारा जिल्हाभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
3) वाई:-संततधार पावसाचा तडाखा! पसरणीत घराची भिंत कोसळली; थोडक्यात टळली मोठी दुर्घटना.

रमेश सणस यांच्या घराचे मोठे आर्थिक नुकसान; स्वप्निल गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मदतीचे दिले आश्वासन.
सातारा | वाई, दि. ०२ :
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका आता ग्रामीण भागालाही बसू लागला असून, वाई तालुक्यातील पसरणी येथील माल्कमपेठ बाग परिसरात गुरुवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली. रमेश सणस यांच्या घराची भिंत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने भिंत कोसळली त्यावेळी त्या ठिकाणी कोणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र, घराचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य स्वप्निल गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी गावचे तलाठी यांना तत्काळ घटनास्थळी बोलावून नुकसानीचा पंचनामा करून घेतला.
यावेळी बोलताना स्वप्निल गायकवाड म्हणाले, “सणस कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. शासनाकडून त्यांना लवकरात लवकर योग्य ती आर्थिक मदत मिळावी यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.”
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सततच्या पावसामुळे जीर्ण व कमकुवत घरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
4) वाई:-“अंगणवाडीत ‘गंमत-जंमत’चा जल्लोष! बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी जिल्हाभर उपक्रमाची दमदार सुरुवात”

सातारा | वाई, दि. २ : सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आयोजित ‘गंमत-जंमत सप्ताह’ आज संपूर्ण जिल्ह्यात उत्साहात सुरू झाला. जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटात संबंधित सदस्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून ग्रामीण भागातील अंगणवाड्या आनंदाने फुलून गेल्या आहेत.
या सप्ताहाचे मुख्य उद्घाटन वाई तालुक्यातील उडतारे येथील अंगणवाडी केंद्रात महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ऋतुजा शिंदे यांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना ऋतुजा शिंदे म्हणाल्या, “अंगणवाडीची पटसंख्या वाढविणे आणि लहान वयापासूनच मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे हा या सप्ताहाचा प्रमुख उद्देश आहे. शून्य ते सहा वर्षे हा बालकांच्या सर्वांगीण विकासाचा पाया असतो. त्यामुळे हा सप्ताह त्यांच्या शारीरिक, बौद्धिक, सामाजिक आणि भावनिक विकासासाठी निश्चितच मैलाचा दगड ठरेल.”
बालकांच्या पोषणासाठी साखरेऐवजी गुळाचा वापर करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्याची माहिती देत त्यांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले. तसेच अंगणवाडी व्यवस्थापन अधिक सक्षम, पारदर्शक आणि आधुनिक करण्यासाठी ‘AI अंगणवाडी’ या नाविन्यपूर्ण संकल्पनेची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.
या उपक्रमात जास्तीत जास्त पालक आणि बालकांनी सहभागी व्हावे, तसेच लोकसहभागातून हा सप्ताह यशस्वी करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर, वाई पंचायत समितीच्या उपसभापती वर्षा जगताप, पंचायत समिती सदस्या सुरभी भोसले, राणी पवार, उडतारे ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना पवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी नागेश ठोंबरे, गटविकास अधिकारी नारायण घोलप, बालविकास प्रकल्प अधिकारी राहुल आदमुलवाड, अंगणवाडी पर्यवेक्षिका संगीता सावंत, अंगणवाडी सेविका, मदतनीस, पालक, ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येने चिमुकले उपस्थित होते.
5) वाईत अन्न व औषध प्रशासनाचा दुसऱ्या दिवशीही धडाका! अस्वच्छ हॉटेल्स, चायनीज सेंटर आणि हातगाड्यांवर कारवाई; नियम धाब्यावर बसवणाऱ्यांचे धाबे दणाणले!

सातारा | वाई, दि. ०२ :
बेकायदेशीर दूध वाहतुकीवर धडक कारवाई केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने सलग दुसऱ्या दिवशीही वाई शहरात कारवाईचा धडाका कायम ठेवला. यावेळी मोर्चा हॉटेल्स, चायनीज सेंटर आणि खाद्यपदार्थांच्या हातगाड्यांकडे वळवत ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या व्यावसायिकांवर प्रशासनाने कडक कारवाईचा बडगा उगारला. तपासणीत दोन हॉटेल्स आणि तीन हातगाड्यांमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्याने संबंधितांना नोटिसा बजावून आवश्यक प्रशासकीय कारवाई करण्यात आली.
वाई बसस्थानक परिसरातील हॉटेल सम्राट चायनीज, रेड चिली चायनीज आणि शोरमा हाऊस येथे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी अचानक धाड टाकली. तपासणीत ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याची अधिकृत तपासणीच करण्यात आली नसल्याचे उघड झाले. अन्न तयार करणाऱ्या आणि वाढणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय तपासणी अहवाल उपलब्ध नव्हते. किचनमध्ये पेस्ट कंट्रोल करण्यात आले नव्हते. खरेदी-विक्रीची अधिकृत बिलेही सादर करता आली नाहीत. एवढेच नव्हे तर स्वच्छतेसाठी आवश्यक असलेले एप्रोन व हेड कॅपचा वापरही कर्मचारी करत नसल्याचे निदर्शनास आले.
यानंतर प्रशासनाने वाई न्यायालय परिसरातील सम्राट चायनीज आणि मोमोज विला या हातगाड्यांची तपासणी केली. येथेही पिण्याच्या पाण्याची तपासणी नसणे, कर्मचाऱ्यांचे मेडिकल सर्टिफिकेट नसणे तसेच खरेदी-विक्रीची बिले उपलब्ध नसणे अशा गंभीर त्रुटी आढळल्याने संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात आली.
ही संपूर्ण मोहीम सातारा जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी अ. अ. गायकवाड, प्रि. ना. वाईकर आणि ओं. कि. शिंदे यांनी सहभाग घेतला.
वाई शहरात अनेक हॉटेल्स आणि हातगाड्यांमध्ये स्वच्छतेच्या नियमांची पायमल्ली होत असल्याची चर्चा यानिमित्ताने पुन्हा ऐरणीवर आली आहे. खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाणारे तेल, किचनची अस्वच्छ अवस्था आणि अन्न सुरक्षेच्या नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या या धडक मोहिमेचे वाईकर नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, “अशा कारवाया सातत्याने सुरू ठेवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कायमचा वचक बसवावा,” अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.




