वाई:-कोट्यवधींचा विकास पाण्यात! पहिल्याच दमदार पावसात वाईचा मुख्य रस्ता जलमय.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

कोट्यवधींचा विकास पाण्यात! पहिल्याच दमदार पावसात वाईचा मुख्य रस्ता जलमय.

सातारा |
वाई, दि. २८ : शहरात रविवारी झालेल्या पहिल्याच दमदार पावसाने वाई नगरपालिकेच्या विकासकामांच्या नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ग्रामीण रुग्णालय ते किसनवीर चौक (गुलाबराव खामकर पथ) हा शहरातील प्रमुख रस्ता काही मिनिटांतच जलमय झाल्याने पादचारी, दुचाकीस्वार आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
उन्हाच्या तीव्र झळांनंतर झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला, तरी शहरातील पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याच्या व्यवस्थेतील त्रुटी पहिल्याच पावसात उघड झाल्या. कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते आणि बंदिस्त गटारे उभारण्यात आली; मात्र पावसाचे पाणी सुरळीत वाहून जाण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले नसल्याचे स्पष्ट दिसून आले.
मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अनेक ठिकाणी रस्ता आणि गटारे पाण्याखाली गेल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला, तर नागरिकांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागला.
या प्रकारामुळे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “कोट्यवधी रुपये खर्च करूनही पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण होत असेल, तर विकासकामांच्या गुणवत्तेची चौकशी होणे गरजेचे आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली.
अधिक पाऊस झाल्यास शहरातील अनेक भागांमध्ये पाणी घरांमध्ये शिरण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली असून, पाणी निचऱ्याच्या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी नगरपालिकेच्या सभेत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये झालेल्या वादानंतर आता प्रत्यक्ष परिस्थितीने विकासकामांच्या दर्जाबाबत नवे प्रश्न निर्माण केले आहेत. नागरिकांनी केवळ कागदोपत्री विकास न दाखवता प्रत्यक्ष समस्या सोडविण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे.




