पाचगणी:-“माजी विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध जपणारा प्रेरणादायी उपक्रम; 45 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप”
पत्रकार अमोल चोरगे महाबळेश्वर तालुका उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पाचगणी:-“माजी विद्यार्थ्यांचे ऋणानुबंध जपणारा प्रेरणादायी उपक्रम; 45 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप”

पांचगणी | प्रतिनिधी | दि. 27 जून 2026
भारती विद्यापीठ हायस्कूल, पांचगणी येथे शैक्षणिक वर्ष 2001–02 च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत 45 गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी 6 वह्यांचे वाटप करून प्रेरणादायी उपक्रम राबविला. हा उपक्रम ज्येष्ठ शिक्षक श्री. एस. एन. सावंत यांच्या सेवानिवृत्ती निमित्त आयोजित करण्यात आला.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या अभावामुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडावे लागू नये, या उदात्त हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये माजी विद्यार्थी विकास पवार, मालुसरे, अंब्राळे तसेच इतर सहाध्यायांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव जपली.
यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की, “भारती विद्यापीठ हायस्कूल आणि येथील शिक्षकांनी दिलेले संस्कार, शिस्त व शिक्षण यामुळेच आम्ही आज समाजात सुसंस्कृत व यशस्वी व्यक्ती म्हणून उभे आहोत. सावंत सर, अबदर सर आणि मुख्याध्यापक कदम सर यांनी घडविलेल्या व्यक्तिमत्त्वाचे हेच ऋण फेडण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे.”
कार्यक्रमात सर्व माजी विद्यार्थ्यांचे श्री. सावंत सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. ज्या शाळेत शिक्षण घेतले, त्याच शाळेत पुन्हा सन्मान मिळाल्याने सर्व माजी विद्यार्थी भावूक झाले.
यावेळी 45 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 6 वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच भविष्यात शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी व प्रवेशवाढीसाठी कायम सहकार्य करण्याचा निर्धार माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, समाजाप्रती कर्तव्याची जाणीव जपणारा आदर्श उपक्रम म्हणून परिसरात त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.




