पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात; _प्रशासनाला जाग कधी येणार?
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पुसेसावळी पाठोपाठ आता गोरेगाव-वांगीलाही जुगार अड्ड्याचा कलंक लागण्यास सुरुवात; _प्रशासनाला जाग कधी येणार?

गोरेगाव-वांगी, ता. खटाव | प्रतिनिधी
खटाव तालुक्यातील पुसेसावळी परिसराची जुगार अड्ड्यांमुळे झालेली नकारात्मक चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच आता गोरेगाव-वांगी गावाचे नावही अशाच कारणांमुळे चर्चेत येऊ लागल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. गावात सुरू असलेल्या जुगार अड्ड्याबाबत परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा रंगत असून या प्रकारामुळे गावाच्या प्रतिमेला धक्का बसत असल्याची भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गोरेगाव-वांगी येथे सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर केवळ गावातीलच नव्हे तर परिसरातील विविध गावांमधूनही लोक येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गावातील सामाजिक वातावरण बिघडत असून युवक वर्गावर चुकीचा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, या प्रकाराबाबत गावात उघडपणे चर्चा होत असताना संबंधित यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे “नेमके कोणाच्या आशीर्वादाने हा प्रकार सुरू आहे?” असा प्रश्न नागरिकांमध्ये चर्चिला जात आहे. गावातील सुजाण नागरिकांनी अनेकदा नाराजी व्यक्त करूनही परिस्थितीत कोणताही बदल होत नसल्याने संताप वाढत आहे.
गावाची ओळख विकास, शिक्षण आणि सामाजिक एकोप्यासाठी व्हावी अशी अपेक्षा असताना जुगार अड्ड्यांमुळे नाव चर्चेत येणे ही दुर्दैवी बाब असल्याचे मत अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे. अशा प्रकारांमुळे गावाची प्रतिमा मलिन होत असून भविष्यात गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नागरिकांचे म्हणणे आहे की, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी या प्रकाराची तातडीने दखल घेऊन चौकशी करावी आणि आवश्यक ती कारवाई करावी. अन्यथा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे.
पुसेसावळी पाठोपाठ गोरेगाव-वांगीचे नावही जुगार अड्ड्यांमुळे चर्चेत येत असताना, संबंधित यंत्रणा याकडे गांभीर्याने पाहणार का? की नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्षच सुरू राहणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, प्रशासनाला जाग कधी येणार?
— आरपीएस स्टार न्यूज
विशेष प्रतिनिधी | खटाव तालुका




