वाई:-रक्तदानातून जीवनदानाचा संदेश; दिशा ज्युनिअर कॉलेजतर्फे १५ जून रोजी भव्य रक्तदान शिबिर.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई:-रक्तदानातून जीवनदानाचा संदेश; दिशा ज्युनिअर कॉलेजतर्फे १५ जून रोजी भव्य रक्तदान शिबिर.

वाई दी १४: जागतिक रक्तदान दिनानिमित्त दिशा ज्युनिअर कॉलेज, वाई यांच्या वतीने सोमवार, १५ जून रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार पेठ येथील कल्पतरू ऑडिटोरियम हॉलमध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत हे शिबिर पार पडणार असून सातारा येथील बालाजी ब्लड बँकेचे सहकार्य लाभणार आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सेवाभाव आणि समाजाप्रती उत्तरदायित्वाची जाणीव निर्माण करण्यासाठी दिशा अकॅडमी विविध उपक्रम राबवत असते. संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. नितीन कदम यांच्या संकल्पनेतून तसेच संचालिका प्रा. रूपाली कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दिशा ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य ताजुद्दिन सय्यद, ॲडमिनिस्ट्रेटर सारिका चव्हाण तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने शिबिराची तयारी पूर्ण झाली आहे. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, रक्तदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावे आणि युवकांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना वाढीस लागावी हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
रक्तदान हे सर्वोत्तम दान मानले जाते. एका रक्तदात्यामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते. अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेले रुग्ण, थॅलेसेमिया व इतर गंभीर आजारांनी ग्रस्त व्यक्तींसाठी रक्ताची गरज भासत असते. अशा वेळी रक्तदात्यांचे योगदान अमूल्य ठरते.
त्यामुळे वाई शहर व परिसरातील नागरिक, युवक-युवती, पालक, माजी विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदानाच्या माध्यमातून मानवतेच्या या सेवायज्ञात सहभागी व्हावे, असे आवाहन दिशा ज्युनिअर कॉलेजच्या वतीने करण्यात आले आहे.




