आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
महाबळेश्वर:-‘नमस्कार आंदोलन’चा महाबळेश्वर टोलला फटका; तीन तास वसुली बंद, लाखोंचा महसूल बुडाल्याची चर्चा!
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) महाबळेश्वर:-‘नमस्कार आंदोलन’चा महाबळेश्वर टोलला फटका; तीन तास वसुली बंद, लाखोंचा महसूल बुडाल्याची चर्चा!

महाबळेश्वर, दि. ०८ : महाबळेश्वर येथील वेण्णा लेक परिसरातील टोल नाक्यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने रविवारी छेडण्यात आलेल्या अनोख्या ‘नमस्कार आंदोलनामुळे’ तब्बल तीन तास टोल वसुली पूर्णपणे ठप्प झाली. या आंदोलनामुळे महाबळेश्वर नगरपालिकेच्या महसुलाला लाखो रुपयांचा फटका बसल्याची चर्चा रंगली आहे.
महाबळेश्वरमध्ये पर्यटकांकडून आकारल्या जाणाऱ्या विविध शुल्कांविरोधात रिपाईने आक्रमक भूमिका घेत टोल नाक्यावर आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे हात जोडून स्वागत करत प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त केला. आंदोलनाची ही आगळीवेगळी पद्धत पर्यटकांच्या विशेष आकर्षणाचा विषय ठरली.
महाबळेश्वरमध्ये वाहनांवर, प्रवाशांवर तसेच वनविभागाच्या नावाखाली विविध शुल्क आकारले जात असल्याबाबत रिपाईने तीव्र नाराजी व्यक्त केली. देशभरात फास्टॅग आणि डिजिटल पेमेंट व्यवस्था सर्वत्र लागू असताना महाबळेश्वरच्या टोल नाक्यावर अद्याप ऑनलाइन पेमेंट सुविधा उपलब्ध नसल्याने आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.
“पर्यटन वाढवायचे की पर्यटकांना लुटायचे?” असा सवाल उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासन आणि टोल व्यवस्थापनावर जोरदार टीका केली. अनेक वेळा माहिती मागवूनही समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
या आंदोलनाला पर्यटक, स्थानिक नागरिक, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक आणि उद्योजकांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. महाबळेश्वरच्या पर्यटन विकासासाठी पारदर्शक आणि न्याय्य शुल्क प्रणाली लागू करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने प्रशासनाला इशारा देत पर्यटक आणि स्थानिक नागरिकांवरील कथित अन्याय तात्काळ थांबवावा, अन्यथा भविष्यात अधिक तीव्र आणि व्यापक जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा दिला.
या आंदोलनाचे नेतृत्व युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा वाई पंचायत समिती सदस्य स्वप्नील गायकवाड यांनी केले. रिपाईचे वरिष्ठ नेते अशोक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात जॉन जोसेफ, आतिश भोसले, मिथुन तळवळकर, विनय गायकवाड, फौजिया मुलानी, संतोष गायकवाड, श्रीकांत निकाळजे, एकनाथ रोकडे, अमर वाघमारे, बाजीगर इनामदार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.
“जनतेच्या हक्कासाठी संघर्ष हा आमचा धर्म आहे. महाबळेश्वरसारख्या जागतिक पर्यटनस्थळी पर्यटकांची लूट कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही,” असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी यावेळी व्यक्त केला.
2) पाचगणी:-“रस्ते खड्ड्यात, प्रशासन झोपेत; पर्यटकांची माफी मागत तरुणांचे पाचगणीत अनोखे आंदोलन!”

पाचगणी, दि. ०८ : गेल्या दोन वर्षांपासून वाई-पाचगणी-महाबळेश्वर मार्गावरील रखडलेल्या विकासकामांमुळे आणि उडणाऱ्या धुळीच्या साम्राज्यामुळे संतप्त झालेल्या वाईतील जागरूक तरुणांनी पाचगणी टोल नाक्यावर प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात अनोख्या पद्धतीने आवाज उठवला. राजकीय घोषणाबाजीऐवजी ‘गांधीगिरी’चा मार्ग स्वीकारत त्यांनी पर्यटकांना गुलाबपुष्प आणि कॅडबरी चॉकलेट देऊन रस्त्यांच्या दुरवस्थेबद्दल स्थानिक नागरिक म्हणून जाहीर माफी मागितली.
या अनोख्या आंदोलनाने पर्यटकांचे मन जिंकले, तर प्रशासनाच्या ढिम्म आणि संवेदनाहीन कारभारावर थेट बोट ठेवले. वाई, पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरातील रस्त्यांची कामे गेल्या दोन वर्षांपासून संथ गतीने सुरू असून, परिणामी वाहतूक कोंडी, जीवघेणे खड्डे आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या त्रासातून वाट काढत पाचगणीत पोहोचलेल्या पर्यटकांकडून मात्र विविध टोल नाक्यांवर कराची वसुली सुरूच असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
“कराच्या माध्यमातून लाखो रुपयांची वसुली होते, मग पर्यटकांना दर्जेदार रस्ते आणि मूलभूत सुविधा का मिळत नाहीत?” असा थेट सवाल या आंदोलनाच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला.
या उपक्रमामागे ॲड. अथर्व पाटील, ॲड. ऋषिकेश सकुंडे, ॲड. गणेश इथापे, ॲड. स्वप्नील आवळे, अभय शिंदे, तनय मिठारी, सौरभ सपकाळ आणि श्रवण मावारे या तरुणांचा पुढाकार होता. कोणत्याही राजकीय पक्षाचा किंवा संघटनेचा पाठिंबा न घेता त्यांनी हे आंदोलन उभारले.
टोल नाक्यावर येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करताना या तरुणांनी, “रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे तुम्हाला जो त्रास सहन करावा लागला, त्याबद्दल आम्ही स्थानिक नागरिक म्हणून दिलगिरी व्यक्त करतो,” असे सांगत त्यांची क्षमा मागितली. या संवेदनशील भूमिकेचे अनेक पर्यटकांनी कौतुक केले.
पर्यटन हा पाचगणी-महाबळेश्वरच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. मात्र, खराब रस्ते आणि रखडलेली कामे यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न आता नागरिकांकडून विचारला जात आहे. तरुणांनी केलेल्या या शांततापूर्ण पण परिणामकारक आंदोलनामुळे प्रशासन जागे होईल आणि रखडलेली विकासकामे गती घेतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सध्या या अनोख्या ‘माफीनामा आंदोलनाची’ संपूर्ण जिल्ह्यात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
3) वाई:-पर्यटनाच्या प्रवेशद्वाराची कचराकुंडी! पसरणी घाटात चिकन कचऱ्याचे साम्राज्य; प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिक संतप्त.

वाई, दि. ०८ : महाबळेश्वर-पाचगणीचे प्रवेशद्वार आणि निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पसरणी घाटाचे रूप काही बेजबाबदार चिकन विक्रेत्यांमुळे विद्रूप झाले असून, घाट परिसरात ठिकठिकाणी चिकन कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. या प्रकारामुळे पर्यावरणासह सार्वजनिक आरोग्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, वन विभाग आणि प्रशासनाच्या निष्क्रिय भूमिकेविरोधात वाईकर नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत काही अज्ञात व्यक्तींकडून मेलेल्या कोंबड्या, पिसे, पाय आणि इतर टाकाऊ अवशेष घाटातील विविध वळणांवर फेकून दिले जात आहेत. परिणामी संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून, पर्यटक आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या कचऱ्यामुळे घाट परिसरात भटकी कुत्री, कावळे आणि इतर प्राणी मोठ्या प्रमाणावर जमा होत आहेत. रस्त्यावर ओढला जाणारा हा कचरा अपघातांनाही आमंत्रण देत असून, घाटाचे सौंदर्य पूर्णपणे झाकोळून गेले आहे. सकाळी आरोग्यासाठी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनाही स्वच्छ आणि शुद्ध हवेऐवजी दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने नाराजी वाढत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, वन विभाग किंवा संबंधित प्रशासनाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. रात्रीच्या वेळी घाटात कचरा टाकणाऱ्या टोळीचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
नागरिकांनी घाटातील कुजलेला कचरा तातडीने हटवावा, दोषींवर गुन्हे दाखल करावेत, संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच नियमित गस्त वाढवावी, अशा मागण्या केल्या आहेत.
“निसर्गरम्य पसरणी घाटाची कचराकुंडी करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही, तर पर्यावरणप्रेमी आणि नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील,” असा इशाराही स्थानिकांकडून देण्यात आला आहे. आता प्रशासन या घाणेरड्या प्रकाराला आळा घालण्यासाठी किती तत्परतेने पावले उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
4) वाई:-जेजुरीहून परतताना काळाचा घाला! सुरूरजवळ भाविकांच्या बोलेरोची डिव्हायडरला भीषण धडक; तिघांची प्रकृती चिंताजनक.

वाई, दि. ०८ : जेजुरी येथील खंडोबा मंदिरात दर्शन घेऊन सांगली जिल्ह्यातील विटा परिसराकडे परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरो गाडीला सातारा-पुणे महामार्गावर सुरूर (ता. वाई) येथे भीषण अपघात झाला. महामार्गावरील डिव्हायडरला गाडी जोरात धडकल्याने झालेल्या या अपघातात २ ते ३ जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
हा अपघात रविवारी (दि. ७ जून) रात्री सुमारे ७.४५ वाजण्याच्या सुमारास सुरूर गावच्या हद्दीत हॉटेल साई पार्क इन समोर घडला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की बोलेरो वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
प्राथमिक माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा येथील संदीप संपत शिरतोडे, राजापूर (बोरगाव) येथील महादेव मोहन मदने यांच्यासह ८ ते १० जण जेजुरी येथे देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून परतीच्या प्रवासात असताना सुरूरजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बोलेरो थेट डिव्हायडरवर जाऊन आदळली.
अपघातानंतर स्थानिक नागरिक, महामार्ग पोलीस आणि मदत पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना वाहनातून बाहेर काढले. सर्व जखमींना प्रथम कवठे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी २ ते ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सातारा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली. अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास भुईंज पोलीस करीत आहेत.




