वाई:-बेकायदेशीर माती वाहतुकीने घेतला अभिजितचा बळी! मालतपूरमध्ये ‘रास्ता रोको’चा भडका; दोषींना अटक होईपर्यंत आंदोलन कायम.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-बेकायदेशीर माती वाहतुकीने घेतला अभिजितचा बळी! मालतपूरमध्ये ‘रास्ता रोको’चा भडका; दोषींना अटक होईपर्यंत आंदोलन कायम.

वाई, दि. ०५ : वाई तालुक्यातील मालतपूर येथे डंपरच्या भीषण धडकेत अभिजित दत्तात्रय वाडकर या ३३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी मालतपूर ग्रामस्थांनी मालतपूर-वाई मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली.
“जोपर्यंत अपघातास कारणीभूत असलेल्या डंपर चालकाला अटक होत नाही आणि बेकायदेशीर माती उपसा व वाहतुकीशी संबंधित जबाबदारांवर गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही,” असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, मालतपूर परिसरातून धरण क्षेत्रातील मातीचा अनधिकृत उपसा करून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू होती. या माती वाहतुकीसाठी नेमकी परवानगी कोणाकडे आहे, उपशास मान्यता कोणी दिली आणि त्यासंदर्भातील कागदपत्रे सार्वजनिक करावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली. “बेकायदेशीर आणि बेदरकार माती वाहतुकीमुळेच अभिजितचा जीव गेला,” असा आरोप ग्रामस्थांनी केला.
दरम्यान, संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी प्रशासनाला कठोर इशारा देत, “दोषींवर तातडीने कारवाई झाली नाही तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” अशी भूमिका घेतली आहे.
रास्ता रोको आंदोलनामुळे मालतपूर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
घटनेची माहिती मिळताच वाई पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलकांशी चर्चा सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात आणणे आणि वाहतूक पूर्ववत सुरू करणे हे प्रशासनासमोरचे मोठे आव्हान ठरले आहे. मात्र, केवळ आश्वासनांवर न थांबता प्रत्यक्ष कारवाईची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली आहे.
या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते, अपघातातील जबाबदारांवर कोणती कारवाई होते आणि कथित बेकायदेशीर माती उपसा व वाहतुकीच्या साखळीचा पर्दाफाश होतो का, याकडे आता संपूर्ण वाई तालुक्याचे लक्ष लागले आहे.
2) वाई:-चायनीज मांजात अडकलेल्या दुर्मिळ ‘गव्हाणी’ घुबडाला जीवदान; वाईतील रेस्क्यूची सर्वत्र प्रशंसा.

सातारा | प्रतिनिधी
वाई शहरातील भाजीमंडई परिसरात प्रतिबंधित चायनीज पतंगाच्या मांजात अडकलेल्या दुर्मिळ ‘गव्हाणी’ जातीच्या घुबडाला प्राणीमित्र, वनविभाग, अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांतून यशस्वीपणे जीवदान देण्यात आले. या धाडसी बचाव मोहिमेची शहरात सर्वत्र प्रशंसा होत आहे.
४ जून रोजी भाजीमंडई भागातील सातारा जिल्हा बँकेशेजारील झाडावर एक घुबड चायनीज मांजात अडकल्याचे विजय सुतार यांच्या निदर्शनास आले. मांजा त्याच्या पंखात आणि पायात रुतल्याने ते सुटकेसाठी धडपडत होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने सर्पमित्र आणि वनविभागाला माहिती दिली.
माहिती मिळताच प्राणीमित्र अंकुश पवार, प्रशांत डोंगरे, सौरभ कासार, अजीज शेख, नगरसेवक अजित शिंदे, डॉ. प्रशांत सूर्यवंशी, अनिकेत गुजर आणि राहीन शेख यांनी घटनास्थळी धाव घेतली. घुबड उंच झाडावर अडकल्याने बचावकार्य आव्हानात्मक ठरत होते. अखेर वाई वनविभागाचे संग्राम मोरे, अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मांजा कापून घुबडाची सुखरूप सुटका करण्यात आली.
सुटकेनंतर डॉ. प्रशांत सूर्यवंशी आणि प्राणीमित्रांनी घुबडावर आवश्यक प्रथमोपचार केले. सुदैवाने त्याला कोणतीही गंभीर दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वनविभागाच्या उपस्थितीत त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.
दरम्यान, या घटनेमुळे वाई शहरात प्रतिबंधित चायनीज मांजाच्या विक्री आणि वापराबाबत नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पक्षी व इतर प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या अशा मांजाविरोधात प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्राणीमित्रांकडून करण्यात येत आहे.चायनीज मांजात अडकलेल्या ‘गव्हाणी’ घुबडाची सुटका करताना वनविभाग, अग्निशमन दलाचे जवान, प्राणीमित्र आणि स्थानिक नागरिक.
3) पाचवड:- दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खुनाची खोटी माहिती; मद्यपी तरुणाला अटक.

सातारा |
पाचवड, दि. ०६ : दारूच्या नशेत पोलीस हेल्पलाइन ‘डायल ११२’ वर फोन करून एका व्यक्तीचा चाकूने खून झाल्याची खोटी माहिती देणाऱ्या तरुणाला भुईंज पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय नंदकुमार पिसाळ (वय २१, रा. गोवेदिगर, ता. वाई) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. ४ जून) सायंकाळी ५.४३ वाजण्याच्या सुमारास पाचवड येथील ‘कैलास फूड्स’ परिसरात अक्षय पिसाळ हा मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने आपल्या मोबाईलवरून ‘डायल ११२’ या आपत्कालीन हेल्पलाइनवर संपर्क साधत, “येथे एका व्यक्तीला चाकू मारण्यात आला असून त्याचा मृत्यू झाला आहे,” अशी माहिती पोलिसांना दिली.
खुनाची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. मात्र, प्रत्यक्ष पडताळणी केल्यानंतर अशी कोणतीही घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट झाले. आरोपीने जाणीवपूर्वक खोटी माहिती देत आपत्कालीन सेवेचा गैरवापर केल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अमृत बाळकृष्ण शिंदे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. त्यानुसार अक्षय पिसाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महिला पोलीस हवालदार चव्हाण यांनी गुन्ह्याची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस हवालदार ए. जे. सपकाळ करीत आहेत.
दरम्यान, ‘डायल ११२’ ही सेवा नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि आपत्कालीन मदतीसाठी उपलब्ध असून, या क्रमांकावर खोटी माहिती देणे किंवा अफवा पसरवणे हा गंभीर गुन्हा आहे. अशा प्रकारे पोलीस यंत्रणेचा वेळ वाया घालवणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस प्रशासनाने दिला आहे.
4) वाई:-गरवारे टेकनिकल फायबर्समध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात.

१०० वृक्षांचे रोपण, पर्यावरण संवर्धनाचा संदेश; विविध उपक्रमांनी कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
वृक्षारोपण करताना विवेक कुलकर्णी,व्हाईस प्रेसिडेंट अरविंद कुलकर्णी पूनम गुप्ता, प्रबोध कामत, अरविंद कुलकर्णी, युवराज थोरात, विवेक देशपांडे, सचिन कुलकर्णी, संग्राम मोरे व इतर.
वाई, दि. ६ : पर्यावरण संरक्षण ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून भावी पिढ्यांसाठीची अमूल्य गुंतवणूक असल्याची जाणीव करून देत गरवारे टेकनिकल फायबर्स, वाई येथे जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाने उपस्थितांमध्ये पर्यावरणाविषयी जागर निर्माण केली.
कार्यक्रमाचा शुभारंभ कंपनीचे प्रेसिडेंट विवेक कुलकर्णी, मुख्य मानव संसाधन अधिकारी पूनम गुप्ता आणि वरिष्ठ अधिकारी प्रबोध कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. यावेळी युवराज थोरात, विवेक देशपांडे, सचिन कुलकर्णी, महेंद्र रुद्ररूपु, दिनेश अग्रवाल, गिरीश खेर्डेकर, डी. पी. सिंग, ए. व्ही. मांढरे, गजानन जाधव, सहाय्यक वनपाल संग्राम मोरे, वनरक्षक सोनूताई नाईक तसेच कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय म्हस्के व सरचिटणीस अर्जुन सावंत उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना विवेक कुलकर्णी म्हणाले, “पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी केवळ वृक्षारोपण पुरेसे नाही. प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक सवयी अंगीकारून पर्यावरणावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.” त्यांनी कंपनीला पर्यावरण संवर्धनासाठी मिळालेल्या जागतिक सन्मानांचाही उल्लेख केला.
मुख्य मानव संसाधन अधिकारी पूनम गुप्ता यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करत निसर्गाशी सुसंवाद साधण्याचे आवाहन केले.
यावेळी कंपनी परिसरात १०० वृक्षांची लागवड करण्यात आली. यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनाची “हवामान बदल आणि निसर्गाचा ऱ्हास थांबवूया” ही संकल्पना लक्षात घेऊन कर्मचाऱ्यांना जूटच्या पर्यावरणपूरक पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
‘हवामान बदल आणि निसर्गाचा ऱ्हास थांबवणं’ या विषयावरील विशेष कार्यशाळेत प्रा. डॉ. पंकज दास यांनी हवामान बदलाची कारणे, परिणाम आणि उपाययोजना याविषयी मार्गदर्शन केले.
पर्यावरण जनजागृतीसाठी कंपनीत ‘सेल्फी विथ प्लांट पॉईंट’ उभारण्यात आला होता. तसेच चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा आणि ऑनलाईन पर्यावरण क्विझचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमध्ये कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी सर्व उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची सामूहिक प्रतिज्ञा घेत शाश्वत विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला.
कंपनीतील अधिकारी, कर्मचारी आणि कामगार यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम यशस्वी झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गजानन जाधव, कुमार पवार, सुनील पानसे, अविनाश भोसले, अंशुमन जगदाळे, मोहन फडके, महादेव ससे, गुलाब बोरसे, आकाश धनवे, प्राजक्ता कानिटकर तसेच एचआर विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
5) वाई:-इशारे दुर्लक्षित करण्याची किंमत अखेर मोजावीच लागली!; वरखरवाडीत वडाचे झाड कोसळून मुख्य रस्ता बंद.

वृत्तपत्रांनी वेळोवेळी दिला होता इशारा; प्रशासनाच्या दिरंगाईवर ग्रामस्थांचा संताप.
वाई, दि. ०७ : संभाव्य धोका ओळखून वेळेत उपाययोजना करणे ही प्रशासनाची जबाबदारी असते. मात्र इशारे, तक्रारी आणि वृत्तपत्रांमधून वारंवार लक्ष वेधूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात, याचे उदाहरण वरखरवाडी येथे पाहायला मिळाले आहे. बुवा साहेब मंदिराजवळील अवाढव्य वडाचे झाड रविवारी उन्मळून मुख्य रस्त्यावर कोसळल्याने पश्चिम भागाकडे जाणारा महत्त्वाचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे.
विशेष म्हणजे, याच झाडाची एक मोठी फांदी पंधरा दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यात कोसळली होती. त्यावेळी स्थानिक नागरिकांनी झाड धोकादायक झाल्याची सूचना दिली होती. वृत्तपत्रांनीही या संभाव्य संकटाबाबत बातम्या प्रसिद्ध करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घेतली नाही. परिणामी, आज संपूर्ण झाडच रस्त्यावर कोसळले.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे झाडाची मुळे आणखी कमकुवत झाली आणि अखेर हा प्रकार घडला. सुदैवाने झाड कोसळले तेव्हा रस्त्यावर कोणतीही व्यक्ती किंवा वाहन नव्हते. अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता आली नसती.
झाड कोसळल्यामुळे पश्चिम भागातील नागरिकांना पर्यायी मार्गाचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र या मार्गावर कॅनललगत मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे. वाहन घसरण्याच्या घटना वाढण्याची शक्यता असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
“फांदी कोसळल्यानंतरच प्रशासनाने जागे होऊन झाडाची पाहणी केली असती, तर आजचा प्रसंग टाळता आला असता. दुर्घटना घडल्यानंतर हालचाल करण्यापेक्षा संभाव्य धोके वेळेत दूर करणे अधिक महत्त्वाचे आहे,” अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.
या घटनेने केवळ एक रस्ता बंद झालेला नाही, तर प्रशासनाला एक स्पष्ट संदेश दिला आहे—नागरिकांच्या सूचनांकडे आणि माध्यमांनी दिलेल्या इशाऱ्यांकडे वेळेत लक्ष दिल्यास अनेक दुर्घटना टाळता येऊ शकतात. आता तरी अशा धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून तातडीने उपाययोजना करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
6) वाई:-स्वराज्याच्या स्मृतींना वंदन; वाई पंचायत समितीत शिवराज्याभिषेक दिनाचा दिमाखदार सोहळा.
वाई, दि. ०७ : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त वाई पंचायत समितीमध्ये स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाला अभिवादन करत उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवस्वराज्य गुढी उभारून तिचे विधिवत पूजन करण्यात आले, तर पोवाडे, घोषणाबाजी आणि राष्ट्रभक्तीपर कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला.
पंचायत समितीच्या आवारात उभारण्यात आलेल्या शिवस्वराज्य गुढीचे पूजन सभापती विक्रांत डोंगरे, गटविकास अधिकारी नारायण घोलप, सहाय्यक गटविकास अधिकारी बाळासाहेब जाधव आणि पंचायत समिती सदस्या हर्षदा फरांदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषांनी वातावरण भारावून गेले.
कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण विभागातील शिक्षकांनी राष्ट्रगीत आणि राज्यगीताच्या सामूहिक सादरीकरणाने केली. त्यानंतर शिवशाहीर शरद यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेवर आधारित जोशपूर्ण पोवाडा सादर करून उपस्थितांमध्ये स्वराज्याचा अभिमान जागवला.
पोवाडा सादरीकरणाला राजेंद्र नलावडे, तानाजी कुंभार, संतोष चौधरी, सहदेव फणसे, बाबासाहेब वाळेकर आणि विठ्ठल सणस यांनी प्रभावी साथ दिली. तसेच विश्वनाथ कांबळे यांनी ढोलकीच्या दमदार ठेक्यांनी कार्यक्रमात रंगत आणली.
या प्रसंगी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देशपांडे, डॉ. विनय भोईटे, रियाज सय्यद, बाळू भोईर, साईनाथ वाळेकर यांच्यासह पंचायत समितीचे विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उपस्थितांचे आभार साईनाथ वाळेकर यांनी मानले.
7) लोणंद:-पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे वैष्णव ढमाळ राष्ट्रीय नेतृत्वाच्या भूमिकेत!

डिजिप्रेस मीडिया संघटना भारतच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
लोणंद, दि. ०७ : डिजिटल आणि प्रिंट माध्यम क्षेत्रातील पत्रकारांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या ‘डिजिप्रेस मीडिया संघटना भारत’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पत्रकार वैष्णव मनोज ढमाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. पत्रकारिता आणि संघटन क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर ही महत्त्वाची राष्ट्रीय जबाबदारी सोपवली आहे.
वैष्णव ढमाळ यांनी पत्रकारिता क्षेत्रात विविध सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत सर्वसामान्यांच्या समस्या प्रभावीपणे मांडल्या आहेत. पत्रकारांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणारे आणि संघटनात्मक बांधणीमध्ये सक्रिय भूमिका बजावणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्यपद्धती, दूरदृष्टी आणि संघटन कौशल्यामुळेच त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
निवडीनंतर संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. आगामी काळात पत्रकार संरक्षण, डिजिटल माध्यमांचे सक्षमीकरण, पत्रकारांसाठी प्रशिक्षण उपक्रम, तसेच पत्रकार कल्याणाच्या विविध योजनांवर विशेष भर देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष वैष्णव ढमाळ म्हणाले, “पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि निर्भीड पत्रकारितेच्या मूल्यांसाठी संघटनेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करण्याचा माझा प्रयत्न असेल. संघटनेने दाखविलेला विश्वास मी निश्चितच सार्थ ठरवेन.”
दरम्यान, त्यांच्या निवडीचे वृत्त समजताच पत्रकारिता, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
8) भुईंज:-किसनवीर कारखान्यावरून राजकारण तापले! मकरंद पाटलांच्या समर्थनार्थ शिवाजीराव बाबर आक्रमक.

“टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःची उंची पाहावी; चुकीचे आरोप केल्यास खरपूस समाचार घेऊ”
भुईंज, दि. ०७ : किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावरून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर शिवप्रेरणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव बाबर यांनी आक्रमक भूमिका घेत टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले आहे. “जे स्वतः कारखान्याचे संचालक होते त्यांनी त्यावेळी कोणती अक्कल गहाण ठेवली होती? राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांची उंची मोजण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा त्यांचा खरपूस समाचार घेतला जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.
बाबर म्हणाले, शेतकरी सभासदांच्या हितासाठी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ना. मकरंद पाटील व खा. नितीन पाटील यांनी किसनवीर कारखान्याची धुरा स्वीकारली. हजारो कोटींचे कर्ज आणि मागील काळातील अनागोंदी कारभार अशा गंभीर अडचणी असतानाही त्यांनी हे आव्हान पेलले आहे.
कारखान्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये यासाठी मकरंद पाटील व नितीन पाटील व्यवस्थापनाकडून कोणताही भत्ता घेत नाहीत. जेवण, चहा तसेच प्रवासाचा खर्चही स्वतःच्या खिशातून करत असल्याची माहिती बाबर यांनी दिली. कारखान्यावरील बहुतांश बँकांची कर्जे निकाली काढण्यात आली असून उर्वरित कर्जही लवकर फेडले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
टीकाकारांवर निशाणा साधताना बाबर म्हणाले, “कारखान्याचे संचालक असताना तुम्ही काय केले, याचा हिशोब आधी द्या. स्वार्थासाठी गाव-तालुका सोडून साताऱ्यात स्थायिक झालेल्यांनी आता केवळ स्वतःचा फायदा साधण्यासाठी उठाठेव सुरू केली आहे. तुमच्या मागे कामगार किंवा नागरिकांचा पाठिंबा नाही. यापुढे मकरंद पाटील किंवा नितीन पाटील यांच्यावर बिनबुडाचे आरोप केल्यास गाठ आमच्याशी आहे.”
आरोप-प्रत्यारोपांमुळे ‘किसनवीर’चे राजकारण ढवळून निघाले
गेल्या महिन्यात सामाजिक कार्यकर्ते जयवंत निकम व प्रवीण बाबर यांनी किसनवीर कारखान्याला भेट देऊन व्यवस्थापनाशी चर्चा केली होती. त्यानंतर प्रवीण बाबर यांनी “जयवंत निकम यांनी व्यवस्थापनाशी आकडेवारी घेऊन सेटलमेंट केली” असा आरोप केला. या आरोपांचा जयवंत निकम यांनी तीव्र निषेध करत स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे.
“मी वाई तालुक्याच्या हितासाठी काम करतो. मला कुठल्याही आर्थिक लाभाची अपेक्षा नाही. आरोप करणाऱ्यांनी हिंमत असेल तर समोरासमोर येऊन चर्चा करावी,” असे आव्हान निकम यांनी दिले आहे. या वादामुळे किसनवीर कारखान्याभोवतीचे राजकारण पुन्हा एकदा तापले असून तालुक्यात चर्चांना उधाण आले आहे.





