आरोग्य व शिक्षणकृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-पहाटेच्या आगीत ‘मधू फुटवेअर’ खाक! वाईतील प्रसिद्ध शोरूम जळाले; ४० लाखांचे नुकसान.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-पहाटेच्या आगीत ‘मधू फुटवेअर’ खाक! वाईतील प्रसिद्ध शोरूम जळाले; ४० लाखांचे नुकसान.

वाई शहरातील गजबजलेल्या चित्रा टॉकीज परिसरात बुधवारी पहाटे भीषण आग लागून प्रसिद्ध ‘मधू फुटवेअर’ हे चप्पल-बूट शोरूम पूर्णतः जळून खाक झाले. या दुर्घटनेत सुमारे ४० लाख रुपयांचे अतोनात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, पहाटेच्या शांततेत घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, गणपती आळी येथील मधू फुटवेअर दुकानातून पहाटे पाचच्या सुमारास अचानक धूर आणि आगीच्या प्रचंड ज्वाळा बाहेर पडू लागल्या. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण दुकानाला आपल्या विळख्यात घेतले. आगीची तीव्रता एवढी होती की शेजारील टपरीलाही तिचा फटका बसला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याचवेळी वाई नगरपालिका अग्निशमन विभाग आणि वाई पोलिसांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचा बंब आणि पोलीस अधिकारी-कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या सुमारे तासभर चाललेल्या अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत दुकानातील चप्पल, बूट तसेच अन्य मौल्यवान साहित्य पूर्णतः जळून खाक झाले होते.
हे शोरूम मनोजकुमार चंदेस्वर राम यांच्या मालकीचे असून, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पहाटेची वेळ असल्याने दुकानात कोणीही नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली, हीच या दुर्घटनेतील दिलासादायक बाब ठरली.
दरम्यान, आगीचे कारण शोधण्यासाठी वाई पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठानांच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

2) वाई:-श्रेयवादाच्या राजकारणात वाईकरांची कोंडी; सार्वजनिक शौचालये बनली रोगराईची केंद्रे!

“विकासाच्या गप्पा भरपूर, पण स्वच्छतेचा बोजवारा”; पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींवर नागरिकांचा संताप.

वाई, दि. ०४ : तीर्थक्षेत्र म्हणून राज्यभर ओळख असलेल्या वाई शहरात सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला असून, पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहरातील सार्वजनिक शौचालयांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. भगवा कट्टा आणि रविवार पेठ परिसरातील स्वच्छतागृहांमधून दुर्गंधी, सांडपाणी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
शहराच्या मध्यवर्ती असलेल्या भगवा कट्टा परिसरातील सार्वजनिक शौचालयातून सांडपाणी थेट मुख्य रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना नाक दाबून या मार्गाने प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे याच परिसरात नगरपालिका शाळा क्रमांक ५ असून, दररोज शेकडो विद्यार्थी या दूषित वातावरणातून शाळेत ये-जा करत आहेत. त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढला असून पालिका प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
रविवार पेठेतील चावडी चौक परिसरातही परिस्थिती काही वेगळी नाही. तलाठी कार्यालयाशेजारी असलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहात दारूच्या रिकाम्या बाटल्या, विटा, दगड आणि कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. नियमित स्वच्छता आणि देखभाल नसल्याने हे स्वच्छतागृह नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. शासकीय कार्यालयालगत असलेल्या या सुविधेची झालेली दुरवस्था प्रशासनाच्या नाकर्तेपणावर बोट ठेवणारी आहे.
दरम्यान, शहरातील मूलभूत सुविधा कोलमडलेल्या असताना स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र सुरू असलेल्या कामांचे श्रेय घेण्याच्या राजकारणात व्यस्त असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. “निवडणुकीत विकासाच्या घोषणा करणारे नेते आता नागरिकांच्या दु:खाकडे पाठ फिरवत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.
वाईकरांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न तातडीने सोडवून सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता व दुरुस्ती युद्धपातळीवर करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. अन्यथा नागरिकांना रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
“श्रेय कोणाचे?” यावरून राजकारण तापले; पण शहरातील दुर्गंधी आणि घाणीची जबाबदारी कोण घेणार?
वाईकरांचा हा सवाल आता थेट पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींसमोर उभा ठाकला आहे. विकासाच्या दाव्यांपेक्षा स्वच्छता आणि नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याची वेळ आली असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

3) वाई:-पत्रावळीवर जेवण, जमिनीवर मुक्काम; जिल्हाधिकाऱ्यांनी जिंकली ऊळुंबकरांची मने!
प्रशासन थेट दारी; दुर्गम ऊळुंबमध्ये लोकदरबारातून प्रश्नांवर जागेवर तोडगा.

वाई तालुक्यातील अतिदुर्गम ऊळुंब गावाने गुरुवारी एका वेगळ्याच प्रशासकीय संस्कृतीचा अनुभव घेतला. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केवळ दौरा न करता गावात मुक्काम ठोकत, व्हीआयपी थाटाला फाटा देत ग्रामस्थांमध्ये मिसळून प्रशासन खऱ्या अर्थाने जनतेच्या दारी आणले.
मुख्य सचिवांच्या निर्देशानुसार आयोजित या विशेष ग्रामदौऱ्यात जिल्हाधिकाऱ्यांनी सायंकाळी भरविण्यात आलेल्या लोकदरबारात ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. महसूल, कृषी, आरोग्य, शिक्षण, पाणीपुरवठा आदी विभागांशी संबंधित तक्रारी आणि मागण्या ऐकून अनेक प्रश्नांचा जागेवरच निपटारा करण्यात आला. त्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या समस्या मांडण्याची संधी मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
दौऱ्यातील सर्वात चर्चेचा विषय ठरला तो जिल्हाधिकाऱ्यांचा साधेपणा. रात्री गावकऱ्यांसोबत जमिनीवर बसून पत्रावळीवर भोजन करत त्यांनी प्रशासन आणि जनतेतील दुरावा कमी करण्याचा संदेश दिला. एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा हा साधा आणि आत्मीयतेचा दृष्टिकोन पाहून उळुंबकर भारावून गेले.
लोकदरबारात ग्रामस्थांनी स्वतंत्र ग्रामपंचायत, कृषी पर्यटनासाठी ब्रँडिंग, होम स्टे व ॲग्रो टुरिझमला प्रोत्साहन, धरणग्रस्तांसाठी बोट क्लब व मासेमारी परवानगी, कृषी कार्यालय, वन्य प्राण्यांपासून संरक्षण, विद्यार्थ्यांसाठी वाढीव एसटी फेऱ्या, पुनर्वसनाच्या प्रलंबित कामांसाठी विशेष शिबीर अशा विविध मागण्या मांडल्या.
यावर जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. बांबू व फळबाग लागवडीस प्रोत्साहन, महिला बचत गटांची स्थापना, सातबारा दुरुस्तीसाठी लोकअदालती, पुनर्वसितांना जमीन व दाखल्यांचे वितरण, पॅडल बोट व जेट्टी उभारणी, अतिक्रमण नियमितीकरण, रेशन कार्ड व ॲग्रीस्टॅक योजनेसाठी विशेष कॅम्प तसेच मालतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.
दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रास्त धान्य दुकानाची पाहणी करून सेवा सुविधांचा आढावा घेतला. प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे, तहसीलदार सोनाली मेटकरी, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि विविध विभागांचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
“दूरच्या उळुंबपर्यंत प्रशासन पोहोचलेच नाही, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या साधेपणाने ग्रामस्थांच्या मनातही घर केले,” अशी भावना यावेळी अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली.

4) वाई:-एकसरचा विकासमार्ग खुला! शेतकऱ्यांच्या एकजुटीतून ६०० मीटरचा प्रलंबित रस्ता अखेर साकार.

वाई, दि. ०४ : वर्षानुवर्षे रखडलेल्या रस्त्याच्या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला असून, वाई तालुक्यातील एकसर गावात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पानंद रस्ता’ योजनेअंतर्गत ६०० मीटर लांबीचा महत्त्वपूर्ण रस्ता पूर्णत्वास गेला आहे. प्रशासनाची साथ आणि शेतकऱ्यांची अभूतपूर्व एकजूट यामुळे एकसरच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे.
बुवासाहेब मंदिर रस्ता ते आनंदा लडकत यांच्या शेतापर्यंतचा सुमारे ६०० मीटर लांबीचा व ३ मीटर रुंदीचा हा रस्ता अनेक वर्षे दुर्लक्षित अवस्थेत होता. रस्त्याच्या मार्गात येणारे ओढे आणि नाले हे मोठे अडथळे ठरत होते. मात्र, शेतकऱ्यांनी पुढाकार घेत स्वतःच्या खर्चातून आवश्यक मशिनरी उपलब्ध करून दिली. ओढे-नाल्यांमध्ये सिमेंट पाईप टाकून त्यावर मजबूत रस्ता उभारण्यात आला.
या रस्त्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी एकत्र येत पंचायत समिती सदस्य स्वप्निल गायकवाड यांच्याकडे पाठपुरावा केला. गायकवाड यांनी तहसीलदार सोनाली मिटकरी यांच्या माध्यमातून आवश्यक प्रशासकीय मंजुरी मिळवून दिली. प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली हे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
नुकत्याच झालेल्या उद्घाटन सोहळ्यास विद्यमान सरपंच सुमन मालुसरे, शरद घाडगे, हनुमंत पवार, आनंद तरडे, विष्णू लडकत व परिवार, संतोष तात्या गायकवाड, महेश घाडगे, रुपेश पार्टे यांच्यासह ग्रामस्थ आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या रस्त्यामुळे शेतमालाची वाहतूक, शेतीकामांसाठी यंत्रसामग्री ने-आण आणि दैनंदिन दळणवळण अधिक सुलभ होणार असून, एकसरच्या ग्रामीण विकासात हा रस्ता महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

5) महाबळेश्वर-पाचगणीत बेकायदेशीर ‘जंगल सफारी’वर आरटीओचा धडक अॅक्शन प्लॅन; रोहित कटके यांच्या लढ्याला मोठे यश!

वनसंपत्तीची लूट, पर्यटकांच्या जीवाशी खेळ आणि नियमांची पायमल्ली; दोषी वाहनांवर कारवाईचे आदेश.

महाबळेश्वर, पाचगणी आणि भिलार परिसरातील संवेदनशील वनक्षेत्रात ‘जंगल सफारी’च्या नावाखाली सुरू असलेल्या बेकायदेशीर वाहन व्यवसायावर अखेर प्रशासनाचा हातोडा पडला आहे. शिवसेना सातारा तालुका प्रमुख रोहित परशुराम कटके यांनी या गंभीर प्रकाराविरोधात वन विभाग आणि आरटीओकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर प्रादेशिक परिवहन विभागाने कठोर कारवाईचे आदेश जारी केले आहेत. पर्यावरणाची हानी, वन्यजीवांच्या अधिवासावर होणारे आक्रमण आणि पर्यटकांच्या सुरक्षेशी सुरू असलेला खेळ याविरोधात आता प्रशासनाने थेट मोहीम उघडल्याने बेकायदेशीर सफारी चालकांचे धाबे दणाणले आहेत.
कटके यांनी केलेल्या तक्रारीत परवाना नसलेल्या खाजगी वाहनांद्वारे जंगलात व्यावसायिक वाहतूक केली जात असल्याचे नमूद केले होते. यामुळे वनक्षेत्राचे नुकसान, मातीची धूप, प्लास्टिक प्रदूषण आणि अपघातांचा धोका वाढत असल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता. या तक्रारीची दखल घेत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप म्हेत्रे यांनी महाबळेश्वर व भिलार परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत.
आता वाहनांचे परवाने, फिटनेस प्रमाणपत्र, चालकांचे ट्रान्सपोर्ट लायसन्स, विमा संरक्षण तसेच खाजगी (पांढऱ्या नंबर प्लेट) वाहनांचा व्यावसायिक वापर याची कसून तपासणी केली जाणार असून, नियमभंग करणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
स्थानिक नागरिक, पर्यावरणप्रेमी आणि जबाबदार पर्यटनाचे समर्थक यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, रोहित कटके यांच्या आक्रमक पाठपुराव्यामुळे वनसंपत्ती आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button