“वाईत अवतरली ‘दक्षिण काशी’! महाआरतीच्या तेजात कृष्णाकाठ उजळला; नागा साधू, शाही स्नान अन् लाखोंच्या साक्षीने लघुकुंभ मेळ्याची दणदणीत सांगता!”
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“वाईत अवतरली ‘दक्षिण काशी’!
महाआरतीच्या तेजात कृष्णाकाठ उजळला; नागा साधू, शाही स्नान अन् लाखोंच्या साक्षीने लघुकुंभ मेळ्याची दणदणीत सांगता!”

वाई दि. २५ : “दक्षिण काशी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक वाई नगरीतील पाच दिवस चाललेल्या भव्य लघुकुंभ मेळ्याची सोमवारी महाआरती, शाही स्नान आणि भव्य मिरवणुकीने दिमाखदार सांगता झाली. कृष्णामाईच्या पवित्र तीरावर भरलेल्या या सोहळ्याने संपूर्ण वाई नगरी भक्ती, अध्यात्म आणि उत्साहाने भारून गेली होती. लाखो भाविकांच्या उपस्थितीत गणपती घाट परिसर दिव्य रोषणाई आणि जयघोषांनी उजळून निघाला.
दररोज सायंकाळी सात वाजता होणारी कृष्णामाईची भव्य महाआरती हा या लघुकुंभ मेळ्याचा मुख्य आकर्षणबिंदू ठरला. हजारो भाविकांनी हातात आरतीची ताटे घेऊन सहभाग घेतला आणि संपूर्ण कृष्णाकाठ भक्तीच्या प्रकाशाने न्हाऊन निघाला. घाटावरील दिव्यांची रोषणाई, घंटानाद आणि “हर हर महादेव”च्या जयघोषांनी वातावरण अक्षरशः काशीच्या गंगाघाटाची अनुभूती देत होते.
देशभरातील नागा साधू, महंत आणि विविध राज्यांतून आलेल्या संतांनी वाईची भूमी पावन केली. सोमवारी सकाळी महागणपतीची आरती करून साधूंना रथ, घोडे आणि वाहनांतून शहरातून भव्य मिरवणुकीने नेण्यात आले. गणपती घाट, शाहीर चौक, नगरपालिका, भाजी मंडई, जैन मंदिर, किसनवीर चौक, पोलीस स्टेशन आणि शिवाजी चौक या प्रमुख मार्गांवरून मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि भक्तांच्या जयघोषांनी संपूर्ण शहरात उत्सचावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिरवणुकीनंतर गणपती घाटावर शाही स्नानाचा सोहळा पार पडला. मात्र कृष्णा नदीतील पाण्याच्या स्वच्छतेबाबत काही साधूंनी नाराजी व्यक्त केली. नदीच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने काही नागा साधूंनी स्नानात सहभागी होण्याचे टाळल्याचेही सांगण्यात आले. त्यामुळे प्रशासनाच्या नियोजनावर काहींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या लघुकुंभ मेळ्यास विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थिती लावत आयोजनास पाठिंबा दर्शविला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रियाताई शिंदे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, राज्याचे शिक्षण मंत्री ना. पंकज भोईर, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच जैन समाजातील मान्यवरांनी सहभाग घेतला. वाई नगरपालिकेचे नगराध्यक्ष अनिल सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नियोजनामुळे हा मेळा यशस्वी झाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
महाआरतीनंतर देशभरातून आलेल्या महंत, नागा साधू आणि संतांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. अनेकांनी मनोभावे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले. पाच दिवसांत अंदाजे पाच ते सहा लाख भाविकांनी या लघुकुंभ मेळ्याला भेट दिल्याचा दावा आयोजकांनी केला.
या सोहळ्यासाठी अनेक दानशूर संस्था आणि व्यक्तींनी साधुसंतांच्या नाश्ता, भोजन आणि प्रसादाची व्यवस्था केली. लघुकुंभ मेळा यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्ष अनिल सावंत, श्रीधर भाडळकर, विजय ढेकणे, काशिनाथ शेलार, सचिन घाटगे, दीपक ननावरे, प्रदीप जायगुडे, योगेंद्रगिरी महाराज, अरुणादेवी पिसाळ, ॲड. दीप्ती पिसाळ, सरिता सावंत, जितेंद्र पिसाळ,उपनगराध्यक्ष चक्के, पाडळे, पाटणे, सावंत,निलेश मोरे, अजीत घोडके, गजानन भोसले, संतोष जमदाडे, डॉ. पोरे, सुशांत गोळे, सचिन गांधी यांच्यासह स्वयंसेवक, नगरसेवक, नगरपालिका कर्मचारी आणि वाईकर नागरिकांनी विशेष परिश्रम घेतले.
भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन लघुकुंभ मेळा सेवा समिती आणि पोलीस प्रशासनाने चोख नियोजन आणि कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार न घडता संपूर्ण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.




