सोलापूर:-“लाडक्या बहिणींच्या सन्मानासाठी नवा प्रस्ताव; ‘लाडकी बहीण’ योजनेला अजितदादांचे नाव द्या!”
पत्रकार संगीता फाळके

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

सोलापूर:-“लाडक्या बहिणींच्या सन्मानासाठी नवा प्रस्ताव; ‘लाडकी बहीण’ योजनेला अजितदादांचे नाव द्या!”

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मोठी मागणी; उपमुख्यमंत्री सुनैत्रा पवार यांच्याकडे निवेदन सादर.
सोलापूर
राज्यातील लाखो महिलांसाठी आधारवड ठरलेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेला स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी भावनिक आणि ठाम मागणी ‘वूमन ऑफ वूमन’ (WOW) संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री सुनैत्रा पवार यांची भेट घेऊन संस्थेच्या महिला प्रतिनिधींनी लेखी निवेदन सादर केले.
संस्थेच्या अध्यक्षा विद्या लोळगे यांच्या नेतृत्वाखाली महिला शिष्टमंडळाने ही भेट घेतली. यावेळी महिलांनी सांगितले की, जून २०२४ मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री स्व. अजितदादा पवार यांनी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा विचार करून ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली होती. या योजनेमुळे राज्यातील लाखो महिलांना आर्थिक आधार मिळाला असून अनेक कुटुंबांना नवसंजीवनी मिळाली आहे.
महिला प्रतिनिधींनी आपल्या निवेदनात नमूद केले की, “महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या या योजनेला अजितदादांचे नाव देणे म्हणजे त्यांच्या कार्याला खरी श्रद्धांजली ठरेल.” या मागणीला उपस्थित महिलांनी जोरदार पाठिंबा दर्शविला.
याचवेळी संजय गांधी निराधार योजने अंतर्गत विधवा, घटस्फोटित आणि एकल महिलांना मिळणारे मानधन सध्याच्या १५०० रुपयांवरून ३००० रुपये करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर महिलांना सन्मानाने जगण्यासाठी आर्थिक मदतीत वाढ आवश्यक असल्याचे महिलांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री सुनैत्रा पवार यांनी महिलांचे निवेदन शांतपणे ऐकून घेत सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या भूमिकेमुळे उपस्थित महिलांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
या भेटीदरम्यान विविध सामाजिक प्रश्न, महिलांच्या अडचणी आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाबाबतही चर्चा करण्यात आली. महिला सक्षमीकरणासाठी शासनाने आणखी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.




