पाचवड:-भिलारच्या मातीत वाईचा दमदार डंका! राज्यस्तरीय कबड्डीत वाई जिमखाना ७ संघाचा दैदिप्यमान तृतीय क्रमांक.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

पाचवड:-भिलारच्या मातीत वाईचा दमदार डंका! राज्यस्तरीय कबड्डीत वाई जिमखाना ७ संघाचा दैदिप्यमान तृतीय क्रमांक.

सातारा |
पाचवड दि. २४ : ग्रामस्थ मंडळ व ‘पुस्तकांचे गाव’ भिलार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य हौशी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत वाई जिमखाना ७ कबड्डी संघाने उल्लेखनीय आणि दमदार कामगिरी करत तृतीय क्रमांकाचे मानाचे पारितोषिक पटकावले. राज्यभरातील अनेक बलाढ्य आणि नामांकित संघांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत वाईच्या शिलेदारांनी आपल्या आक्रमक खेळ, भक्कम बचाव आणि अफलातून सांघिक समन्वयाच्या जोरावर उपांत्य फेरीपर्यंत धडक मारत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच वाई जिमखाना ७ संघाने आत्मविश्वासपूर्ण आणि झुंजार खेळाचे प्रदर्शन केले. प्रत्येक सामन्यात खेळाडूंनी दाखवलेली जिद्द, चपळाई आणि विजयासाठीची आक्रमक धडपड यामुळे संघाने प्रतिस्पर्ध्यांना चांगलेच घाम फोडले. अटीतटीच्या लढतींमध्येही संघाने संयम राखत उत्कृष्ट खेळ साकारला आणि अखेर राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावत वाईच्या क्रीडा क्षेत्राचा झेंडा उंचावला.
या यशामागे संघमालक तथा वाई जिमखान्याचे अध्यक्ष आणि उत्कर्ष पतसंस्थेचे संचालक अमर कोल्हापुरे यांचे विशेष योगदान लाभले. ग्रामीण भागातील होतकरू खेळाडूंना व्यासपीठ मिळावे आणि कबड्डीसारख्या मातीतल्या खेळाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने त्यांनी सातत्याने संघाला पाठबळ दिले आहे. तसेच टीम मॅनेजर कुणाल तांबोळी यांनी स्पर्धेदरम्यान संघाचे अचूक नियोजन, खेळाडूंचे मनोबल उंचावणे आणि योग्य व्यवस्थापन यासाठी विशेष मेहनत घेतली.
स्पर्धेत संघातील प्रतीक कोंडलकर, रोहित मोहिते, समीर शेख, अनिकेत वाघ, जयंत अर्जुन, कुणाल जाधव, प्रतीक पवार, अभि मगर, रोहन बिल्ले, विजय गायकवाड आणि माऊली डोंबाळे यांनी अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
संघाच्या या यशाबद्दल वाई जिमखान्याचे उपाध्यक्ष सुनील शिंदे तसेच संचालक रमेश यादव, मंगला अहिवळे, वैभव फुले, अमीर बागुल, शैलेन्द्र देवकुळे, प्रीती कोल्हापुरे, नितीन वाघचौडे, प्रशांत मांढरे आणि आनंद डुबल यांनी संघाचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वाई जिमखान्याच्या माध्यमातून ग्रामीण भागातील खेळाडूंना मिळत असलेल्या व्यासपीठाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, भविष्यातही हा संघ राज्यस्तरावर अधिक मोठे यश संपादन करेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.




