आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई – कोट्यवधींची प्रशासकीय इमारत ठरली नागरिकांसाठी ‘यातनागृह’! वाईतील अनागोंदीने संतापाचा उद्रेक.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई – कोट्यवधींची प्रशासकीय इमारत ठरली नागरिकांसाठी ‘यातनागृह’! वाईतील अनागोंदीने संतापाचा उद्रेक.

दिशादर्शक फलक गायब, लिफ्ट बंद, पाण्याचीही वानवा; ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांची फरफट.

सातारा प्रतिनिधी :
वाई दि. २० : कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या वाई येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत सध्या अक्षरशः ‘अंधेर नगरी चौपट राजा’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या सोयीसाठी विविध शासकीय कार्यालये एकत्र आणण्यात आली खरी, मात्र मूलभूत सुविधांचाच बोजवारा उडाल्याने सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

इमारतीच्या प्रवेशद्वारावर तसेच मजल्यांवर कोणते कार्यालय कुठे आहे, याची माहिती देणारे दिशादर्शक फलकच नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. विविध दाखले, अर्ज आणि प्रशासकीय कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर अक्षरशः हेलपाटे मारावे लागत आहेत. माहिती विचारण्यासाठीही कोणती ठोस व्यवस्था नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

त्यातच इमारतीतील लिफ्ट गेल्या तीन ते चार वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तिसऱ्या-चौथ्या मजल्यावर जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांगांना कष्टाने पायऱ्या चढाव्या लागत आहेत. कडाक्याच्या उन्हात नागरिकांची होणारी ही फरफट पाहून प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

“कोट्यवधी खर्च करून इमारत उभारली, पण सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजांचा विचारच केला नाही का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था असणे अपेक्षित असताना, इमारतीत बसवण्यात आलेले पाण्याचे कुलरही बंद अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी बाहेर भटकंती करावी लागत आहे.

विशेष म्हणजे, इमारतीच्या परिसरात शासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांसाठी मोठ्या दिमाखात पार्किंग फलक लावण्यात आला आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांसाठी कोणतीही नियोजनबद्ध पार्किंग व्यवस्था नसल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. “ही इमारत जनतेच्या पैशातून उभी राहिली की फक्त अधिकाऱ्यांसाठी?” असा संतप्त सवाल आता वाईकर विचारू लागले आहेत.

वाईचे प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी या गंभीर प्रश्नांकडे तातडीने लक्ष देऊन प्रवेशद्वारावर व प्रत्येक मजल्यावर दिशादर्शक फलक लावावेत, बंद लिफ्ट त्वरित सुरू करावी, पिण्याच्या पाण्याची सुविधा कार्यान्वित करावी आणि नागरिकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

अन्यथा येत्या काळात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशाराही संतप्त नागरिकांनी दिला आहे.

2) वाई-पैशांच्या वादाने घेतले हिंसक वळण! सख्ख्या भाच्याकडून मावशी-काकांवर चाकू हल्ला; वाई पोलिसांची झटपट कारवाई.

सातारा प्रतिनिधी |
वाई दि. २० : वाई शहरातील रविवार पेठ परिसरात कौटुंबिक वाद आणि पैशांच्या कारणावरून एका तरुणाने स्वतःच्या मावशी, काका आणि आईवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. या हल्ल्यात काका गंभीर जखमी झाले असून, आरोपीला वाई पोलिसांनी काही तासांतच अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनिता श्रीनिवास शेलार (वय ४२, रा. गजेंद्र अपार्टमेंट, भिमकुंड आळी, रविवार पेठ, वाई) यांच्या घरी त्यांची बहीण आली होती. त्यावेळी बहिणीचा मुलगा प्रशांत भगवान राजपुरे (वय २५, रा. कणूर, ता. वाई) याने आपल्या आईला फोन करून गाडी घेण्यासाठी पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास “तू जिथे कामाला जातेस तिथे येऊन चाकूने मारून टाकीन,” अशी धमकी त्याने दिली होती.
दरम्यान, मावशी अनिता शेलार यांनी मध्यस्थी करत प्रशांतला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र याचाच राग मनात धरून आरोपी प्रशांत अवघ्या अर्ध्या तासात थेट मावशीच्या घरी पोहोचला. “आमच्या दोघांमध्ये बोलणारी तू कोण?” असे म्हणत त्याने अनिता शेलार यांना मारहाण सुरू केली.
पत्नीला वाचवण्यासाठी पती श्रीनिवास वामन शेलार मध्ये पडताच आरोपी अधिक संतापला. “मध्ये का बोलता? आता तुला जिवंत सोडत नाही,” असे म्हणत त्याने जवळील चाकू काढून श्रीनिवास शेलार यांच्या पोटावर आणि पाठीवर सपासप वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. तसेच भांडण सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मावशी आणि स्वतःच्या आईवरही आरोपीने चाकूने हल्ला केला.
घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपी प्रशांत भगवान राजपुरे याला १९ मे रोजी पहाटे १:४७ वाजता अटक केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाळुंज करत असून, पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळत आहे.

3) वाई वकील संघाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांचे जल्लोषात अभिनंदन!

सातारा प्रतिनिधी :
वाई २०:वाई वकील संघाच्या सन २०२६-२७ वर्षाकरिता निवडून आलेले अध्यक्ष ॲड. जयंत गायकवाड सर, उपाध्यक्ष ॲड. सागर मोरे सर, खजिनदार ॲड. अविनाश गजरे सर तसेच पुरुष सदस्य ॲड. कमलेश लोखंडे, ॲड. शिवदत्त दाहोत्रे व ॲड. स्वप्नील आवळे या सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा!
न्यायव्यवस्थेतील पारदर्शकता, संघटित नेतृत्व आणि वकिली क्षेत्राच्या प्रगतीसाठी आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी घडो, हीच सदिच्छा.
तसेच मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. सागर शंकर मोरे सर, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. अमित देशमाने sir व ॲड. बजरंग गायकवाड सर, तसेच त्यांना सहकार्य करणारे ॲड. शरद गाढवे सर व ॲड. प्रमोद गोळे सर यांनी अत्यंत शांत, निःपक्षपाती व प्रामाणिकपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडल्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन व मनःपूर्वक आभार.

4) वाई – ‘एका फोटोमध्ये हजार शब्दांचा भाव’; वाई वसंत व्याख्यानमालेत सतीश पाकणीकरांनी उलगडली ‘चेहऱ्यांची भाषा’

जगप्रसिद्ध व्यक्तींच्या छायाचित्रांमागचे रंजक अनुभव; प्रकाशचित्रांच्या संवेदनशील दुनियेची रसिकांना अनोखी सफर

सातारा प्रतिनिधी |
वाई दि. २० : “आपल्या डोळ्यांसमोरून दररोज हजारो चेहरे जातात; पण छायाचित्रकार जेव्हा एखादा क्षण टिपतो, तेव्हा तो काळाचा एक तुकडाच जतन करत असतो. हजार शब्दांत व्यक्त न होणारा भाव एका चित्रातून सहज पोहोचतो,” असे प्रतिपादन ज्येष्ठ छायाचित्रकार सतीश पाकणीकर यांनी केले. वाई वसंत व्याख्यानमालेच्या सतराव्या पुष्पात “चेहऱ्यांची भाषा” या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनील शिंदे होते.
आपल्या अनुभवसमृद्ध आणि भावस्पर्शी व्याख्यानातून पाकणीकर यांनी छायाचित्रण कलेचा प्रवास, त्यामागील संवेदनशीलता, बदलते तंत्रज्ञान आणि व्यक्तिचित्रणातील सूक्ष्म भावविश्व उलगडले. “फोटोग्राफी” हा शब्द ‘फोटोस’ (प्रकाश) आणि ‘ग्राफी’ (चित्र) या शब्दांपासून तयार झाला असून, फोटोग्राफीला ‘छायाचित्र’ नव्हे तर ‘प्रकाशचित्र’ म्हणणे अधिक योग्य ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
संगीत आणि चित्रकलेला हजारो वर्षांची परंपरा असताना फोटोग्राफीचा इतिहास अवघा १८२ वर्षांचा असल्याचे सांगत त्यांनी गेल्या २५ वर्षांतील तांत्रिक क्रांतीचाही आढावा घेतला. “कॅमेरे आणि तंत्रज्ञान बदलले, पण कॅमेऱ्यामागील माणसाच्या भावना मात्र आजही चिरंतन आहेत,” असे ते म्हणाले. लेखक आणि प्रकाशकांनी छायाचित्रकारांना योग्य श्रेय देऊन त्यांच्या स्वामित्व हक्कांचा आदर करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आपल्या कारकिर्दीतील अनेक हृदयस्पर्शी अनुभव त्यांनी रसिकांसमोर मांडले. जैन धर्मातील ‘संथारा’ स्वीकारलेल्या वृद्ध व्यक्तीच्या डोळ्यांतील मावळणारी प्राणज्योत टिपतानाचा अनुभव सांगताना सभागृह क्षणभर स्तब्ध झाले. जपानी नागरिकांचे किमोनोमधील छायाचित्रण आणि पॅरिसमधील फ्रेंच जोडप्याचे फोटो टिपतानाचे अनुभवही त्यांनी रंगतदार शैलीत मांडले.
“माझ्या पहिल्या प्रदर्शनानंतर पु. ल. देशपांडे यांनी ‘या छायाचित्रांतून स्वर ऐकू येतात’ अशी दिलेली प्रतिक्रिया माझ्यासाठी मोठा सन्मान होता,” असे सांगताना ते भावूक झाले. तसेच त्यांच्या तीन छायाचित्रांवर भारतीय टपाल विभागाने टपाल तिकिटे प्रकाशित केल्याचा अभिमानही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, पं. भीमसेन जोशी, उस्ताद झाकीर हुसेन, गुलजार, माधुरी दीक्षित आणि डॉ. विजय भटकर यांसारख्या दिग्गजांचे फोटो टिपतानाचे पडद्यामागील अनेक रंजक किस्से उलगडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्येष्ठ पत्रकार भद्रेश भाटे यांनी केले, तर डॉ. सायली मर्ढेकर यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. व्याख्यानमालेचे संचालक विशाल कानडे यांनी प्रमुख वक्ते व अध्यक्षांचा सत्कार केला. प्रायोजक शिवाजीराव देशमुख आणि डॉ. विनय रामचंद्र लोखंडे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
या व्याख्यानातून वाईतील रसिकांना छायाचित्रण कलेमागील संवेदनशील दृष्टी, मानवी भावविश्व आणि प्रकाशचित्रांच्या जिवंत भाषेचा अनोखा अनुभव मिळाला.

5) कराड-शेतकरी चळवळीचा संघर्षमय इतिहास उजागर! कराडात ‘लोकशाहीतील स्वातंत्र्यसैनिक पंजाबराव पाटील’ पुस्तकाचे दमदार प्रकाशन.

सातारा प्रतिनिधी :
कराड दि. २० : शेतकरी आंदोलनातील संघर्ष, त्याग आणि नेतृत्वाचा प्रेरणादायी प्रवास उलगडणाऱ्या ‘लोकशाहीतील स्वातंत्र्यसैनिक पंजाबराव पाटील’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा सोमवारी कराड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. शेतकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते पंजाबराव पाटील यांच्या कार्याचा वेध घेणाऱ्या या पुस्तकाला उपस्थित मान्यवरांनी भरभरून दाद दिली.
पंजाबराव पाटील यांनी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रभावी आंदोलने उभारून अनेक लढे यशस्वी केले. त्यांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा, शेतकरी चळवळीतील योगदानाचा आणि सामाजिक बांिलकीचा सविस्तर आढावा या पुस्तकातून मांडण्यात आला आहे.
या कार्यक्रमास रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील, दलित महासंघाचे प्रा. मच्छिन्द्र सकटे, बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक सदस्य बी. जी. काका पाटील, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील तसेच रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक गुजर होते.
मान्यवरांनी आपल्या भाषणातून पंजाबराव पाटील यांच्या शेतकरी आंदोलनातील योगदानाचा गौरव करत, त्यांच्या संघर्षातून नव्या पिढीने प्रेरणा घेण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमास शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बळीराजा शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गणेश शेवाळे, महिला संघटनेच्या संजीवनी पवार, बळीराजा कामगार संघटनेचे संपतराव जगताप, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहाजीबापू पाटील, अशोक सलगर, हासन मुल्ला, हौसेराव शेवाळे, श्रीरंग देशमुख, नामदेव कारंडे, ऊस वाहतूकदार शेतकरी संघटनेचे राजू पाटील, निवास गायकवाड, रुक्मिणी जगताप, प्रवीण फल्ले यांच्यासह महाराष्ट्रातील विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार गणेश शेवाळे यांनी मानले.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button