महाबळेश्वर:-“तळदेव शासकीय दवाखान्यात निकृष्ट कामाचा काळाबाजार; अर्धवट कामामुळे रुग्णांचे हाल, जीव धोक्यात”
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“तळदेव शासकीय दवाखान्यात निकृष्ट कामाचा काळाबाजार; अर्धवट कामामुळे रुग्णांचे हाल, जीव धोक्यात”

महाबळेश्वर प्रतिनिधी : उत्तम भालेराव.
महाबळेश्वर तालुक्यातील तळदेव येथील शासकीय दवाखान्याच्या दुरुस्ती कामामध्ये गंभीर अनियमितता, निकृष्ट दर्जाचे साहित्य वापर व संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शासनाचा लाखो रुपयांचा निधी खर्च करून करण्यात आलेल्या कामांमध्ये नियमांची उघडपणे पायमल्ली झाल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून, संबंधित कामांची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर फौजदारी कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दवाखान्याच्या दुरुस्तीमध्ये अत्यंत निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आले असून अनेक ठिकाणी काम अपूर्ण व धोकादायक अवस्थेत आहे. विशेष म्हणजे, पावसाळा तोंडावर आला असतानाही दवाखान्याचे काम आजही अर्धवट अवस्थेत सुरू असल्याने रुग्ण व कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेची कोणतीही प्रभावी व्यवस्था नसल्याने रुग्णांच्या आरोग्याला व जीवाला धोका निर्माण झाला आहे.
सध्या दवाखान्यात रुग्ण तपासणीसाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने अनेक रुग्णांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. जागेअभावी कर्मचारी देखील अडचणीत काम करत असून आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचे चित्र आहे. इमर्जन्सी परिस्थितीत गंभीर रुग्णांना तातडीने महाबळेश्वर येथील दवाखान्यात स्थलांतर करावे लागत असल्याने ग्रामीण भागातील गरीब व गरजू नागरिकांना प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
या संदर्भात जबाबदार व जागृत नागरिक उत्तम भालेराव यांनी संबंधित विभागाकडे लेखी निवेदन सादर करून सविस्तर चौकशीची मागणी केली आहे. “शासनाचा निधी जनतेच्या आरोग्यासाठी असताना काही भ्रष्ट व निष्काळजी घटकांनी तो लाटण्याचे काम केले आहे. निकृष्ट कामामुळे आज रुग्णांचे जीव धोक्यात आले असून हा प्रकार प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जिवंत पुरावा आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
यापूर्वी अनेकदा तक्रारी देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. संबंधित ठेकेदार, अभियंते व कामावर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांनी संगनमताने शासनाची फसवणूक केल्याचा आरोपही स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही तर लोकायुक्त, भ्रष्टाचार प्रतिबंधक विभाग तसेच न्यायालयीन मार्गाचा अवलंब करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
तळदेव येथील शासकीय दवाखान्याची सध्याची अवस्था पाहता शासनाने तात्काळ उच्चस्तरीय चौकशी समिती नेमून निकृष्ट काम करणाऱ्यांवर कठोर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करावी, तसेच अर्धवट काम तातडीने पूर्ण करून रुग्णांना सुरक्षित व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आता नागरिकांतून तीव्र होत आहे.




