वाईत २१ मे रोजी तुकाराम मुंढेंची तोफ धडाडणार! वसंत व्याख्यानमालेच्या समारोपाकडे सर्वांचे लक्ष.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाईत २१ मे रोजी तुकाराम मुंढेंची तोफ धडाडणार! वसंत व्याख्यानमालेच्या समारोपाकडे सर्वांचे लक्ष.

सातारा प्रतिनिधी:
वाई दि. १९ : वाई येथील प्रतिष्ठित लोकमान्य टिळक स्मारक संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वसंत व्याख्यानमाले’चा भव्य समारोप येत्या २१ मे रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून, यावेळी महाराष्ट्रातील धडाकेबाज आणि कर्तव्यदक्ष वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे हे मुख्य वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
हे बहुचर्चित व्याख्यान नेहमीप्रमाणे वाई येथील ऐतिहासिक व निसर्गरम्य महागणपती घाट येथे पार पडणार आहे. व्याख्यानावेळी पाऊस झाल्यास कार्यक्रम रमेश गरवारे सभागृह येथे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.
आपल्या कडक शिस्तीच्या कार्यपद्धतीसाठी आणि पारदर्शक प्रशासनासाठी ओळख असलेले तुकाराम मुंढे आजच्या सामाजिक, प्रशासकीय आणि नैतिक परिस्थितीवर कोणते परखड विचार मांडणार, याबाबत वाईकरांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळे या समारोप सोहळ्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
या व्याख्यानाचा लाभ घेण्यासाठी वाई व परिसरातील जास्तीत जास्त नागरिक, युवक-युवती, विद्यार्थी आणि बुद्धिजीवींनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष दत्ता मर्ढेकर, सचिव भद्रेश भाटे आणि वसंत व्याख्यानमालेच्या कार्याध्यक्षा तनुजा इनामदार यांनी केले आहे.
2) वाई:-उज्ज्वल भविष्य असणाऱ्या अस्मिताचा दुर्दैवी अंत; कॅनॉलमधील मृत्यूने वाई तालुका सुन्न.

सातारा प्रतिनिधी |
वाई दि. १९ : पसरणी (ता. वाई) येथील एक अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. बेपत्ता असलेल्या अस्मिता योगेश शिर्के (वय अंदाजे १९) या तरुण विद्यार्थिनीचा मृतदेह शेंदुरजने गावच्या हद्दीतील कॅनॉलमध्ये आढळून आला. या घटनेमुळे पसरणी परिसरासह संपूर्ण वाई तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अस्मिता शिर्के ही सातारा येथील नामांकित ‘यशोदा टेक्निकल इन्स्टिट्यूट’मध्ये इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होती. अभ्यासू आणि होतकरू विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख होती. उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या अस्मिताच्या अकाली निधनाने तिच्या मित्रपरिवारासह शिक्षकांनाही मोठा धक्का बसला आहे.
अस्मिता बेपत्ता झाल्यानंतर तिचा शोध सुरू होता. दरम्यान, वाई येथील मोतीबाग परिसरातील कॅनॉलजवळ तिची ‘एमएच ११ बीजी ०३८८’ क्रमांकाची लाल रंगाची हिरो प्लेझर दुचाकी संशयास्पद स्थितीत आढळून आली. यानंतर तातडीने कॅनॉल परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. पुढे शेंदुरजने गावच्या हद्दीत तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.
घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, वाई पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
अस्मिताचे वडील योगेश शिर्के हे कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दुबई येथे नोकरीनिमित्त वास्तव्यास आहेत. लेकीच्या निधनाची बातमी समजताच शिर्के कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पसरणी गावावर शोककळा पसरली आहे.
3) वेलंग:-(वाई)-“चोर मोकाट, जनता त्रस्त!” वाईच्या पश्चिम भागात मोटार-केबल चोऱ्यांचा सुळसुळाट; ग्रामस्थ संतप्त.

सातारा प्रतिनिधी |
वाई दि. १९ : वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील वेलंगसह धरणालगतच्या अनेक गावांमध्ये सध्या केबल आणि मोटार चोरांनी अक्षरशः हैदोस घातला असून, ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनाच धोक्यात आल्या आहेत. वारंवार होणाऱ्या मोटार व केबल चोरीमुळे ऐन उन्हाळ्यात गावांवर तीव्र पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे. मुंबई-पुण्याहून सुट्टीसाठी आलेल्या चाकरमान्यांसह स्थानिक नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः वणवण भटकावे लागत असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये पोलिसांना चोरांचा माग काढता आला नव्हता. अखेर ग्रामस्थांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून चोर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला होता. मात्र संबंधित आरोपी काही दिवसांतच जामिनावर सुटल्याने चोरट्यांचे मनोबल वाढल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. “आम्ही जीव धोक्यात घालून चोर पकडायचा आणि पोलिसांनी त्याला पुन्हा मोकळे सोडायचे, हा प्रकार किती दिवस चालणार?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
आधीच दुष्काळ, अवकाळी आणि कर्जाच्या संकटाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना आता या चोऱ्यांनी आणखी आर्थिक खाईत ढकलले आहे. चोरट्यांनी लाखो रुपयांच्या केबल आणि विहिरीवरील मोटारी लंपास केल्याने शेतीचे पाणी बंद पडले असून, पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. सततच्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून, प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
“ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत असताना पोलीस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. मोटार व केबल चोरी करणाऱ्या टोळ्यांवर पोलिस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून तातडीने कडक कारवाई करावी. अन्यथा पश्चिम भागातील ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र जनआंदोलन छेडतील,” असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
4) वाई:-गोरक्षणासाठी कायद्याची ढाल हवी, बेकायदेशीर कृती नव्हे! — मिलिंद एकबोटे यांचे गोरक्षकांना स्पष्ट मार्गदर्शन – ‘सर्व संघटना समभाव’चा मंत्र देत गोहत्यामुक्त वाई- महाबळेश्वर परिसरासाठी संघटित होण्याचे आवाहन.

वाई दि. १९ : “गोरक्षण करताना प्रत्येकाने कायद्याच्या चौकटीत राहूनच कार्य केले पाहिजे. आपण सर्व प्रभू श्रीरामांचे भक्त आहोत. त्यामुळे संघटनांमधील मतभेद विसरून ‘सर्वधर्मसमभाव’ ऐवजी ‘सर्व संघटना समभाव’ या विचाराने एकत्र येऊन धर्मकार्य करणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन हिंदुत्ववादी विचारवंत मिलिंद एकबोटे यांनी केले.
वाई येथे हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने प्रथमच विशेष ‘गोरक्षक वर्ग’ (मेळावा) आयोजित करण्यात आला होता. यावेळी गोरक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमास प्राणि कल्याण अधिकारी अंकुश गोडसे, मानद प्राणि कल्याण अधिकारी वैभव जाधव आणि अवधूत धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वर्गामध्ये मिलिंद एकबोटे यांनी हिंदू धर्मातील गोमातेचे महत्त्व अधोरेखित करत ‘महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा १९७६’ अंतर्गत असलेल्या विविध कायदेशीर तरतुदींची सविस्तर माहिती दिली. गोरक्षण करताना कोणती काळजी घ्यावी, पोलिसांचे सहकार्य कसे घ्यावे आणि कायदेशीर मार्गानेच कारवाई कशी करावी, याबाबत त्यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले.
वाई आणि महाबळेश्वर परिसराला ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभला असून, या भागात होणाऱ्या गोहत्येच्या घटना रोखण्यासाठी सर्वांनी संघटितपणे प्रयत्न करून गोहत्येचे प्रमाण शून्यावर आणावे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्राणि कल्याण अधिकारी अंकुश गोडसे यांनी गोरक्षकांना कायदेशीर प्रक्रिया समजावून सांगताना पोलीस ठाण्यात तक्रार कशी दाखल करावी, अर्ज कसे लिहावेत याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. समाजातील काही घटकांकडून कसायांसोबत होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवरही त्यांनी भाष्य केले.
या नाविन्यपूर्ण उपक्रमाला वाई शहर व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी वकील दिनेश धुमाळ, ऋषिकेश सकुंडे, अथर्व पाटील, प्रथमेश बनकर, तेजस जमदाडे तसेच संतोष काळे, काशिनाथ मामा शेलार, आप्पासाहेब मालुसरे, सिद्धार्थ लाखे, अभय शिंदे, अभिषेक यादव, वीरेंद्र शिंदे, अमित सोहोनी, रंगा दिवेकर, नितीन सोनवणे, ओम जंगम आणि निमेश सदाफुले यांच्यासह अनेक गोरक्षक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
5) मेनवली-(वाई)-हरपले मेणवलीचे मायाळू व्यक्तिमत्त्व; द्वारकाबाई (नानी) चौधरी यांचे दुःखद निधन.

सातारा प्रतिनिधी |
वाई दि. १९ : मेणवली येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती द्वारकाबाई उर्फ नानी चौधरी (वय ८०) यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मेणवलीसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्या सामाजिक कार्यकर्ते भगवान चौधरी व राजेंद्र चौधरी यांच्या मातोश्री होत. तसेच मेणवली विकास सोसायटीच्या संचालिका स्वाती चौधरी यांच्या त्या सासूबाई होत. समाजकार्य, आपुलकी आणि प्रेमळ स्वभावामुळे नानी चौधरी यांना परिसरात विशेष मान होता.
त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी मेणवली येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. त्यानंतर कृष्णाकाठच्या स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, सहकार क्षेत्रातील मान्यवर, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी चौधरी कुटुंबियांचे सांत्वन करत नानींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
नानी चौधरी या अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि सर्वांना आपलेसे करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या होत्या. त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.




