महाबळेश्वरात संतापाचा उद्रेक: नरसापूर प्रकरणावर आंबेडकरी संघटनांचे तहसीलदारांना धडक निवेदन.
पत्रकार उत्तम भालेराव महाबळेश्वर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

महाबळेश्वरात संतापाचा उद्रेक: नरसापूर प्रकरणावर आंबेडकरी संघटनांचे तहसीलदारांना धडक निवेदन.

महाबळेश्वर (प्रतिनिधी) – भोर तालुक्यातील नरसापूर येथे अल्पवयीन बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेविरोधात महाबळेश्वर तालुक्यात संतापाचा ज्वालामुखी फुटला आहे. या घटनेच्या निषेधार्थ महाबळेश्वर तालुक्यातील विविध आंबेडकरी संघटनांचे कार्यकर्ते एकत्र येत तहसीलदार कार्यालयावर धडकले आणि कडक शब्दांत निषेध नोंदवत निवेदन सादर केले.
या वेळी कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त करत “अशा विकृत नराधमांना कोणतीही दया दाखवू नका, कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” असा इशारा प्रशासनाला दिला. तसेच, प्रशासनाने तत्काळ कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.
या आंदोलनात वंचित बहुजन आघाडी तालुकाध्यक्ष उत्तम भालेराव, आरपीआय तालुका अध्यक्ष जॉन जोशप, कार्याध्यक्ष पप्पू भोसले, महाबळेश्वर शहराध्यक्ष विनायक गायकवाड, डेमोक्रॅटिक पार्टीचे ऋषिकेश वायदंडे तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले की, आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असूनही तो मोकाट फिरत होता, ही यंत्रणेची गंभीर चूक आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे:
सदर प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी.
आरोपीला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये.
तपासात कोणतीही ढिलाई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी.
पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व न्याय मिळवून द्यावा.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र असंतोष निर्माण झाला असून, “आता जर कठोर कारवाई झाली नाही, तर जनतेचा संताप रस्त्यावर उतरेल,” असा थेट इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला आहे.




