वाई:-भगवा कट्टा परिसरातील जुनी इमारत हटवली; नगरसेविका केतकी पाटणे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

भगवा कट्टा परिसरातील जुनी इमारत हटवली; नगरसेविका केतकी पाटणे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश.

वाई प्रतिनिधी :
वाई दि. ०४ : नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक ७ च्या निर्भिड नगरसेविका केतकी पाटणे यांनी आपल्या धडाकेबाज कार्यपद्धतीने प्रशासनाला कामाला लावले आहे. केवळ घोषणा न करता प्रत्यक्ष जमिनीवर उतरून काम करण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे वाई शहरातील विकासाला मोठी गती मिळाली असून, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
मधली आळी येथील भगवा कट्टा परिसरात ग्रामीण रुग्णालयाची एक जुनी इमारत गेल्या ५० वर्षांपासून बंद आणि अत्यंत मोडकळीस आलेल्या अवस्थेत होती. ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात होती. नगरसेविका केतकी पाटणे यांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून तातडीने हालचाली केल्या. प्रशासनाकडे पाठपुरावा करून ग्रामीण रुग्णालयाला रीतसर नोटिसा बजावण्यास लावून ही धोकादायक इमारत अखेर रिकामी करून पाडण्यात आली आहे.
इमारत पाडल्यानंतर त्या जागेचा वापर कशासाठी होणार, याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता होती. यावेळी बोलताना केतकी पाटणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या की, “या मोकळ्या जागेत प्रभागातील लहान मुलांसाठी सुसज्ज क्रीडांगण उभारले जाईल. तसेच, ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी आणि विरंगुळ्यासाठी एक प्रशस्त विरंगुळा केंद्र तयार करण्याचा आमचा मानस आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि सोयीला आमचे प्रथम प्राधान्य असेल.”
घोषणांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष कृती सुरू झाल्यामुळे वाईच्या विकासाचा वेग वाढला आहे. “घोषणांची धूळ झटकली असून आता प्रत्यक्ष कामाचा धडाका सुरू झाला आहे,” अशा शब्दांत स्थानिकांनी पाटणे यांच्या कामाचे कौतुक केले आहे. नव्या उमेदीच्या नेतृत्वामुळे प्रभागाचा चेहरामोहरा बदलत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.




