नागेवाडी:-(वाई)-“जमिनीच्या लोभात रक्ताचे नातेच संपवलं!” — सख्ख्या भावाकडून वहिनीचा थरारक खून; वाई तालुका हादरला.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“जमिनीच्या लोभात रक्ताचे नातेच संपवलं!” — सख्ख्या भावाकडून वहिनीचा थरारक खून; वाई तालुका हादरला.

वाई दि.२८:
वाई तालुक्यातील नागेवाडी येथे जमिनीच्या वादातून सख्ख्या भावानेच वहिनीचा धारदार शस्त्राने खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपीला वाई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मयत महिलेचे नाव गीताबाई चंद्रकांत यादव (वय ४५, रा. नागेवाडी, ता. वाई) असे असून, याबाबत त्यांचे पती चंद्रकांत विठ्ठल यादव (वय ५०) यांनी वाई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्यांचा मोठा भाऊ भिकू विठ्ठल यादव (वय ५५) यानेच हा खून केल्याचा आरोप करण्यात आला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबातील वडिलोपार्जित शेतीजमीन विक्रीवरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. आरोपी भिकू यादव हा जमीन विकण्यासाठी सातत्याने दबाव टाकत होता. मात्र फिर्यादी व त्यांच्या पत्नीने ठाम नकार दिल्याने आरोपी संतप्त झाला होता.
दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास आरोपी घरात आला. त्यावेळी चंद्रकांत यादव हे शेतीकामासाठी बाहेर पडत असताना त्यांना पत्नीच्या ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी शेजाऱ्यांसह घरात धाव घेतली असता गीताबाई या गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्या.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत होता. उपस्थितांना पाहताच तो घटनास्थळावरून फरार झाला. मात्र, गंभीर जखमांमुळे गीताबाई यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील दीपक बनसोडे यांनी वाई पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गुन्हा दाखल केला आणि काही वेळातच आरोपीला ताब्यात घेतले.
या घटनेमुळे नागेवाडी गावासह वाई तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईक व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.




