शिरूर:-“उपचाराअभावी रस्त्यावरच प्रसूती; मानवतेचा हात पुढे आल्याने आई-बाळ सुखरूप”
पत्रकार गणेश बोऱ्हाडे शिरूर तालुका अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“उपचाराअभावी रस्त्यावरच प्रसूती; मानवतेचा हात पुढे आल्याने आई-बाळ सुखरूप”

शिरूर | प्रतिनिधी
शिरूर शहरात एक धक्कादायक आणि हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. प्रसूतीकळा असह्य झालेल्या एका तरुण मातेला भररस्त्यातच आपल्या बाळाला जन्म द्यावा लागला. सरकारी रुग्णालयात उपचार न मिळाल्याचा आरोप करत, ही प्रसूती पदपथावरच पार पडली. मात्र, उपस्थित नागरिक, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि महिलांच्या तत्परतेमुळे आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत.
सुप्रिया नीतेश काळे (वय २३, रा. जोशीवाडी, शिरूर) असे या महिलेचे नाव आहे. सकाळी सुमारे १० वाजण्याच्या सुमारास त्या पती आणि सासूसह प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयात गेल्या होत्या. मात्र, तेथे त्यांना खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळे नाईलाजास्तव त्या रुग्णालयाबाहेर पडल्या.
यानंतर शहरातील निर्माण प्लाझा परिसरातून दुचाकीवरून जात असताना त्यांना तीव्र प्रसूतीकळा सुरू झाली. वेदना असह्य झाल्याने त्यांनी रस्त्याच्या कडेला पदपथावर बसताच तिथेच प्रसूती झाली. उन्हाचा तडाखा वाढत असताना त्या बेशुद्धावस्थेत गेल्या, तर नवजात बाळाची हालचालही मंदावली होती.
ही घटना पाहून परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. त्याचवेळी पत्रकार सुदर्शन दरेकर आणि मुकुंद ढोबळे यांनी प्रसंगाचे गांभीर्य ओळखून नगरसेविका व प्रसूतीतज्ज्ञ डॉ. सुनिता पोटे यांच्याशी संपर्क साधला. त्या नगरसेविका पूजा पोटावळे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा चिपाडे यांच्यासह घटनास्थळी पोहोचल्या.
डॉ. पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित महिलांनी ओढणी व स्टोलच्या सहाय्याने बाळंतिणीभोवती संरक्षण कवच तयार केले. नाळ कापून प्राथमिक उपचार करण्यात आले. पोलिसांनी वाहतूक वळवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली. काही वेळाने बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकताच उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडत टाळ्यांचा कडकडाट केला.
त्यानंतर रिक्षाचालकांच्या मदतीने आई आणि बाळाला मीरा नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले. सुखायू हॉस्पिटलचे डॉ. संकेत घोडे यांनी बाळाची तपासणी केली. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. पोटे यांनी सांगितले.
दरम्यान, “वेळेत उपचार न मिळाल्याने आम्हाला रस्त्यावरच प्रसूती करावी लागली. डॉ. पोटे देवदूतासारख्या धावून आल्याने माझे बाळ वाचले,” अशी भावना सुप्रिया काळे यांनी व्यक्त केली.
मात्र, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तुषार पाटील यांनी ही महिला रुग्णालयात आली नसल्याचा दावा केला आहे.
या घटनेमुळे शासकीय आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, योग्य वेळी उपचार मिळाले असते तर ही वेळ टळली असती, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.




