मायणी:-(खटाव)-“लाल मातीतील हिरा हरपला… महाराष्ट्र केसरीचे स्वप्न अपूर्णच राहिले!”
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

“लाल मातीतील हिरा हरपला… महाराष्ट्र केसरीचे स्वप्न अपूर्णच राहिले!”

📰 मायणी प्रतिनिधी
मायणी परिसरासाठी आणि संपूर्ण कुस्ती जगतासाठी अतिशय दुःखद बातमी समोर आली आहे. कुस्ती क्षेत्रात नावाजलेला आणि महाराष्ट्र चॅम्पियन म्हणून ओळख असलेला युवा पैलवान राहुल दशरथ कोरडे (वय 21) याचे मेंदूतील रक्तस्रावामुळे आकस्मिक निधन झाले. त्याच्या निधनाने मायणी परिसरावर शोककळा पसरली असून कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.
राहुल कोरडे हा लाल मातीतील खरा हिरा मानला जात होता. मायणी व परिसरात तो 50 हजार ते 1 लाख रुपयांच्या कुस्त्या खेळत असे. त्याची पकड अत्यंत मजबूत होती आणि ‘दिसा डाव’ या त्याच्या खास डावावर तो अनेकदा प्रतिस्पर्ध्यांना नमवत असे.
त्याचे एकच मोठे स्वप्न होते — “महाराष्ट्र केसरी” बनण्याचे. मात्र नियतीने त्याचे हे स्वप्न अधुरेच ठेवले. घरची अत्यंत गरिबीची परिस्थिती असतानाही राहुलने आपल्या मेहनतीच्या जोरावर कुस्तीमध्ये आपली ओळख निर्माण केली होती.
त्याचा थोरला भाऊ रोहित हाही कुस्तीपटू आहे. लहान भावाला महाराष्ट्र केसरी बनवण्याचे स्वप्न पूर्ण व्हावे म्हणून त्याने स्वतःची कुस्ती बाजूला ठेवून घरच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याचा निर्णय घेतला होता. दोघांनाही उपजीविकेसाठी मोलमजुरी करावी लागत होती.
स्थानिक जय बजरंग बली मित्र मंडळाच्या आर्थिक मदतीमुळे राहुलच्या कारकिर्दीला बळ मिळाले होते आणि तो नक्कीच महाराष्ट्र केसरी बनेल, अशी सर्वांना आशा होती. मात्र त्याच्या अकाली निधनामुळे त्या सर्व आशा धुळीस मिळाल्या.
मायणी येथील विठोबा यात्रेदरम्यान आयोजित कुस्त्यांमध्ये राहुलने “विठोबा केसरी” किताब जिंकत 1 लाख रुपयांचे बक्षीस मिळवले होते, ही त्याच्या कारकिर्दीतील मोठी कामगिरी ठरली होती.
त्याच्या जाण्याने मायणी परिसरात शोककळा पसरली असून कुस्ती प्रेमींमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
एक उमदा, जिद्दी आणि भविष्यातील मोठा पैलवान आज काळाच्या पडद्याआड गेला…




