पारनेर:-माजी आमदार विजय औटींच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

माजी आमदार विजय औटींच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी.

सेनापती बापट पतसंस्थेच्या संचालकांविरोधात पारनेरमध्ये संतापाचा उद्रेक!
पोलीस प्रशासन व तहसील प्रशासन यांना ठेवीदारांचे निवेदन.
पारनेर/सुपा; (राजकुमार इकडे)
आपल्या आयुष्याची पुंजी आणि घामाचा पैसा सेनापती बापट मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये अडकल्याने संतप्त झालेल्या शेकडो ठेवीदारांनी पारनेर शहरात आक्रमक पवित्रा घेतला. गुरुवार, २३ एप्रिल रोजी सकाळी १० वाजेपासूनच तालुक्यातील विविध भागांतून ५०० ते ८०० ठेवीदार पारनेरच्या बाजार तळावर एकत्र जमले होते. या ठिकाणी सर्वांनी एकत्रित येत संस्थेचे संस्थापक व माजी आमदार विजयराव औटी यांच्या विरोधात एल्गार पुकारला.
बाजार तळावरून या आंदोलकांनी पारनेरच्या मुख्य बाजारपेठेतून एक भव्य रॅली काढली. या रॅलीदरम्यान आमचे पैसे आम्हाला मिळालेच पाहिजेत विजय औटी चोर आहे त्यांना अटक करा आणि संचालक मंडळाचा निषेध असो अशा घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले होते. ही रॅली थेट माजी आमदार विजयराव औटी यांच्या बंगल्यासमोर पोहोचली. तेथे संतप्त ठेवीदारांनी जोरदार निदर्शने केली. संस्थापक विजय औटी, अनिकेत औटी, संस्थेचे अध्यक्ष रामदास भोसले, मुख्य कार्यकारी व्यवस्थापक रामदास झंजाड यांच्यासह संपूर्ण संचालक मंडळाला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी लावून धरली.
यावेळी ठेवीदार आंदोलक एकनाथ औटी, हरिभाऊ औटी, सिताराम दुधाडे, राजेश येवले, रवींद्र येवले, भीमसेन येवले, विश्वनाथ शिंदे, काकासाहेब काळे, प्रवीण आदमाने, ऍड. ऋषिकेश शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.
पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करूनही आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याबद्दल ठेवीदारांनी तीव्र संताप व्यक्त केला. अनेकांच्या मुलांचे शिक्षण, मुलींची लग्ने आणि वृद्धांच्या औषधोपचाराचा पैसा या संस्थेत अडकल्याने ठेवीदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती मांडत असताना अनेक ठेवीदारांना अश्रू अनावर झाले होते. केवळ आश्वासने नको तर प्रत्यक्ष कारवाई करा, असा पवित्रा घेत ठेवीदारांनी पारनेर तहसील कार्यालय आणि पोलीस प्रशासनाकडे धाव घेतली.
प्रशासनाला सादर केलेल्या निवेदनात ठेवीदारांनी मागणी केली आहे की, या घोटाळ्याचे तात्काळ फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे आणि संस्थेसह सर्व माजी व विद्यमान संचालकांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त कराव्यात. या मालमत्तांच्या लिलावातून ठेवीदारांची देणी परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची विनंती त्यांनी केली. तसेच गृह विभागाने या संस्थेवर प्रशासकाची नियुक्ती करावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.
सकाळपासून सुरू झालेले हे आंदोलन दुपारपर्यंत सुरू होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पारनेर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. तहसीलदारांनी ठेवीदारांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारून त्यावर योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, जर येत्या काही दिवसांत दोषींना अटक झाली नाही आणि पैसे मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली नाही, तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संतप्त ठेवीदारांनी दिला आहे. विधानसभेचे माजी उपाध्यक्ष व माजी आमदार विजय औटी यांच्या विरोधात पुकारलेल्या या आंदोलनामुळे पारनेर नगर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
चौकट :
आमच्या रक्ताचे पाणी करून आणि पोटाला चिमटा काढून जमा केलेला कष्टाचा पैसा या संस्थेने हडप केला आहे. आज आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून, पोलीस प्रशासन मात्र आरोपींना उजळ माथ्याने फिरू देत आहे. आता केवळ कागदी घोडे नकोत, तर संस्थापक विजय औटींसह सर्व दोषींना तात्काळ अटक करून आमच्या मालमत्तांच्या लिलावातून आमचा एक-एक रुपया व्याजासह परत मिळालाच पाहिजे.
— राजेश येवले (पीडित ठेवीदार)
चौकट :
सेनापती बापट पतसंस्थेमध्ये बोगस कर्ज वितरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे सूर्यतारा इंडस्ट्रीजला 13 कोटी रुपये दिले सेनापती बापट पतसंस्था संचालक व सूर्यतारा इंडस्ट्रीजचे सभासद हे जवळपास एकच आहेत असे कर्ज वितरण करता येत नाही इतरही अनेक लोकांना बोगस कर्ज प्रकरणे संस्थेने केली असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे.
ऍड. ऋषिकेश शिंदे (पीडित ठेवीदारांचे वकील)




