वाई:-विचारांचे दीपस्तंभ: फुले-आंबेडकरांच्या क्रांतिकारी वारशाला उजाळा”.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण- 8208717483

वाई:-विचारांचे दीपस्तंभ: फुले-आंबेडकरांच्या क्रांतिकारी वारशाला उजाळा”.

वाई | दि. १३ एप्रिल २०२६ (प्रतिनिधी)
सर्व सामाजिक चळवळींचे उगमस्थान म्हणजे महात्मा फुले यांचे विचार असून, त्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले, असे प्रतिपादन प्रा. रमेश डुबल यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात मराठी व राज्यशास्त्र विभाग तसेच स्थायी समिती विशेष कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते.
यावेळी प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, डॉ. अर्जुन जाधव, श्रावण पवार, सहा. प्रा. राजेंद्र जायकर, डॉ. संग्राम थोरात आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. डुबल यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महात्मा जोतिराव फुले यांनी सामाजिक व मानसिक गुलामगिरीविरुद्ध लढा देत समाजातील अनिष्ट प्रथांविरोधात बंड पुकारले. त्यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाज या चळवळीमुळे समाजप्रबोधनाला चालना मिळाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फुले यांना गुरु मानत त्यांच्या विचारांचा व्यापक प्रसार केला.
ते पुढे म्हणाले की, जनता शिक्षण संस्था ही फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारी असून, संस्थेचे माजी अध्यक्ष कै. प्रतापराव भोसले (भाऊ) यांनी शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारून समाजहिताचे कार्य केले. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत सुविधा देऊन त्यांनी शिक्षणाची नवी दिशा दिली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. फगरे यांनी सामाजिक व आर्थिक विषमता दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. “वैचारिक गुलामगिरीविरुद्ध लढा देणे ही काळाची गरज आहे,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्रास्ताविकात प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह’ उपक्रमाची माहिती देत महापुरुषांचे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले.
सहा. प्राध्यापक राजेंद्र जायकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर डॉ. संग्राम थोरात यांनी आभार मानले. सूत्रसंचालन सहा. प्राध्यापक राहुल तायडे यांनी केले.
कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




