कराड:-(कालगाव)-भारनियमनाचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांचा डाव; शेतकऱ्यांच्या पिकांवर संकट.
पत्रकार सुशीलकुमार पुजारी कराड तालुका उपाध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 828717483

भारनियमनाचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांचा डाव; शेतकऱ्यांच्या पिकांवर संकट.

कराड (प्रतिनिधी):
कराड तालुक्यातील कालगाव गावाच्या उत्तरेला असलेल्या खडक शिवारात कृष्णा नदी पात्रातून पाणी उपसा करण्यासाठी बसवण्यात आलेल्या सुमारे चौदा शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या केबल्स अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. 8 एप्रिल 2026) रात्री 9 ते 12 वाजण्याच्या दरम्यान घडली. चोरीनंतर केबलवरील आवरण जाळून त्यातील तांब्याची तार चोरून नेण्यात आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
सध्या एप्रिल महिन्यातील कडक उन्हामुळे पिकांना पाण्याची अत्यंत गरज असताना ही घटना घडल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. आधीच कवठे ते भुयाची वाडी दरम्यानचा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा वाहून गेल्याने कृष्णा नदीचे पाणी पात्रात कमी झाले आहे. त्यातच कृषी पंपासाठी बसवलेल्या अंदाजे 200 ते 300 फूट लांबीच्या केबल चोरीला गेल्याने पाणी उपसा पूर्णपणे ठप्प झाला आहे.
महावितरणच्या भारनियमनाचा फायदा घेत चोरट्यांनी ही चोरी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित ठिकाणी बसवलेल्या कृषी पंपांची तोडफोड करून केबलवरील कव्हर जाळून त्यातील मौल्यवान तांब्याची तार चोरून नेण्यात आली.
या घटनेत दत्तात्रय माळी, संजय चव्हाण, राजेंद्र तावरे, अमरेश चव्हाण, रामचंद्र चव्हाण, युसुफ मुल्ला, अरविंद कुलकर्णी, अमोल चव्हाण, संपतराव पाटील, सुधाकर पुजारी, किरण शिंदे, लक्ष्मण पुजारी यांसह अन्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकारामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तातडीने कारवाई करून आरोपींना पकडावे आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.




