कलेढोण:-(खटाव)-“एकीचा संदेश, शांततेत यात्रा – कलेढोणचा आदर्श उपक्रम”
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) कलेढोण:-(खटाव)-“एकीचा संदेश, शांततेत यात्रा – कलेढोणचा आदर्श उपक्रम”

कलेढोण (ता.खटाव) : पुढारी वृत्तसेवा
वडूज पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी गावकऱ्यांना एकीचे महत्त्व पटवून दिल्यामुळे कलेढोण येथील हनुमान यात्रा यंदा प्रथमच एकत्रित व शांततेत पार पडली.
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्याच्या पूर्वेला वसलेले कलेढोण हे गाव सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या समृद्ध म्हणून ओळखले जाते. द्राक्ष बागायती, सोने-चांदीचा व्यवसाय आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नागरिकांमुळे गावाची ओळख राज्यभर आहे. मात्र, या प्रगतीसोबतच काहीवेळा राजकारण व लहानसहान वादही उद्भवत असत.
विशेषतः हनुमान जयंती यात्रेदरम्यान विविध कार्यक्रमांमधील स्पर्धेमुळे मतभेद निर्माण होण्याची परंपरा होती. यावर उपाय म्हणून पोलिस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी पुढाकार घेत गावकऱ्यांशी संवाद साधला आणि एकी व सलोखा राखण्याचे महत्त्व पटवून दिले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा सर्वांनी एकत्र येत यात्रा साजरी करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, पूर्वी वेगवेगळे होणारे कार्यक्रम यंदा एकत्रितपणे पार पडले. विशेष आकर्षण ठरलेला कुस्तीचा फडही सर्वांनी मिळून आयोजित केला, ज्यामुळे गावातील एकजूट अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
गावातील ज्येष्ठ मंडळी व पोलीस प्रशासन यांच्या समन्वयातून हा उपक्रम यशस्वी झाला. कलेढोणकरांनी एकीचा आदर्श घालून देत शांततेत उत्सव साजरा करत सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.
2) मायणी:-“अखंड नामजपातून भक्तीचा जागर – मायणी येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह”

मायणी (ता.खटाव) : प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त मायणी येथे दि. ९ ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत अखंड नाम-जप-यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, दिंडोरी प्रणित शाखा मायणी यांच्या वतीने आयोजित या धार्मिक सोहळ्यात विविध आध्यात्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. सप्ताहादरम्यान वीणा वादन, नामजप, स्वामी चरित्र वाचन, गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण, श्रीमद् भागवत पारायण, श्रीपाद श्रीवल्लभ पारायण तसेच विविध यागांचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाच्या सांगतेला श्री सत्यदत्त पूजन व मांदियाळी होणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे –
दि. ८ रोजी ग्रामदैवत सन्मान व मंडळ मांडणी, दि. ९ रोजी मंडळ स्थापना, अग्नी स्थापना व हवन, दि. १० रोजी श्री गणेश याग व मनोबल याग, दि. ११ रोजी चंडी याग, दि. १२ रोजी श्री स्वामी याग, दि. १३ रोजी श्री गीताई याग, दि. १४ रोजी रुद्र याग व मल्हारी याग, तर दि. १५ रोजी बली पूर्णाहुती, सत्यदत्त पूजन व अखंड नामजप-यज्ञाची सांगता होणार आहे. याच दिवशी सकाळी १० वाजता श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळा संपन्न होईल.
दैनंदिन कार्यक्रमात सकाळी ८ वाजता भूपाळी आरती, त्यानंतर नित्य स्वाहाकार, गुरुचरित्र वाचन, महानैवेद्य आरती, विशेष याग, दुपारनंतर दुर्गा सप्तशती व स्वामी चरित्र पाठ, सायंकाळी औदुंबर प्रदक्षिणा, आरती, मार्गदर्शन व नित्यसेवा असे कार्यक्रम होणार आहेत.
या पवित्र धार्मिक सोहळ्यात नागरिकांनी व श्री स्वामी समर्थ भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




