पुसेगाव:-साताऱ्यात जातीय अत्याचाराची धक्कादायक घटना; बहुजन युथ पॅंथरचा तीव्र आंदोलनाचा इशारा.
पत्रकार नित्यानंद मोरे

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

साताऱ्यात जातीय अत्याचाराची धक्कादायक घटना; बहुजन युथ पॅंथरचा तीव्र आंदोलनाचा इशारा.

सातारा | पुसेगाव
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली असली तरी जातीयवादाचे सावट अद्यापही समाजातून पूर्णपणे दूर झालेले नाही, याचे ज्वलंत उदाहरण सातारा जिल्ह्यातील पुसेगाव परिसरात समोर आले आहे. पुसेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात मातंग समाजातील एका कुटुंबावर काही समाजकंटकांनी जातीय द्वेषातून हल्ला करून अमानुष मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच बहुजन युथ पॅंथरचे जिल्हाध्यक्ष अंकित वाघमारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला आणि संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी पुसेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांची भेट घेऊन संबंधित आरोपींना तात्काळ अटक करण्याची ठाम मागणी केली.
जर आरोपींवर त्वरित कारवाई करण्यात आली नाही, तर येत्या काळात बहुजन युथ पॅंथरकडून आक्रमक भूमिका घेत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अंकित वाघमारे यांनी दिला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुशांत तुपे, संघटक चेतन तुपे, सातारा शहर उपाध्यक्ष विशाल यादव, सचिव महेश चव्हाण, शहर संघटक अर्जुन वर्गाटे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.




