वाई:-प्रयत्नाचे सातत्य व परिश्रम यामुळे ध्येयप्राप्ती होऊ शकते – डॉ.जयवंत चौधरी.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

प्रयत्नाचे सातत्य व परिश्रम यामुळे ध्येयप्राप्ती होऊ शकते – डॉ.जयवंत चौधरी.

पुणे जिल्हा प्रतिनिधी वैष्णवी शिंदे
वाई : प्रयत्नाचे सातत्य व परिश्रम यामुळे ध्येय प्राप्ती होऊ शकते असे प्रतिपादन जनता शिक्षण संस्थेचे विद्यमान सचिव व किसन वीर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. जयवंत चौधरी यांनी केले. महाविद्यालयातील इंग्रजी विभागाने आयोजित केलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. याप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. मदनदादा भोसले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, संस्थेचे सदस्य तथा महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य रमेश डुबल आदी मान्यवर उपस्थित होते.
मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध निर्माते, कलाकार, लेखक व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री. तेजपाल वाघ यांनी आपल्या खास शैलीत डॉ. जयवंत चौधरी यांची मुलाखत घेतली. मुलाखतीदरम्यान शिक्षण, सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करण्यात आला.
डॉ. जयवंत चौधरी मुलाखतीदरम्यान म्हणाले की, शिक्षकाने सतत ज्ञान मिळविले पाहिजे. विद्यार्थ्यांना नेहमी प्रोत्साहन दिले पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण केली पाहिजे. आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहोत त्या क्षेत्रात निष्ठेने काम केले पाहिजे.
डॉ. जयवंत चौधरी पुढे म्हणाले की, ते गेल्या ६० वर्षांपासून जनता शिक्षण संस्थेशी व महाविद्यालयाशी जोडलेले आहेत. संस्थेत माजी विद्यार्थी, प्राध्यापक, विभागप्रमुख, प्राचार्य व विद्यमान सचिव असा प्रदीर्घ कार्यकाल अविरतपणे चालू असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. परंतु सततचे प्रयत्न व प्रामाणिकपणे कार्य करत राहिल्याने सदर पदे भूषवता आली याचा अभिमान वाटतो असेही चौधरी सरांनी सांगितले.
जनता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, देशभक्त किसन तथा आबासाहेब वीर, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, आदरणीय प्रतापराव भोसले उर्फ भाऊ, लक्ष्मणराव पाटील उर्फ तात्या, विठ्ठलरावअण्णा जगताप आदींबरोबरचे अनेक महत्त्वाचे प्रसंग सांगितले. जनता शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष श्री. मदनदादा भोसले हे संस्थेच्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलत असून त्यांच्या नेतृत्वात संस्था प्रगती करत आहे. त्यांच्याकडे दूरदृष्टी असून त्यांची कामावर प्रचंड निष्ठा असल्याचेही चौधरी सरांनी आवर्जून सांगितले.
केंजळ ते अमेरिका विमान प्रवासाबद्दल सांगताना डॉ. जयवंत चौधरी म्हणाले की, मुलगा अभिजीतच्या अमेरिकेतील पदवीदान समारंभासाठी पालक म्हणून उपस्थित राहणे हा एक अविस्मरणीय क्षण आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. आनंद घोरपडे, डॉ. सुमित कोरडे, संतोष मुळीक, सुलभा घोरपडे, राहुल तायडे, जितेंद्र चव्हाण कु. वैष्णवी मदने आदींनी विशेष परिश्रम घेतले.
प्रास्ताविक करताना प्रा. डॉ. अंबादास सकट यांनी कार्यक्रमाचा उद्देश विशद केला. डॉ. बाळकृष्ण मागाडे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. सूत्रसंचालन सौ. रेश्माबानो मुलानी यांनी केले तर श्री. जयवंत खोत यांनी आभार प्रदर्शन केले.




