कराड:-मानसिक आरोग्यासाठी रोटरीचा मोठा पुढाकार; मलकापुरात ‘समुपदेशन केंद्रा’ चे भव्य लोकार्पण! गरजूंसाठी मोफत मार्गदर्शन; शिक्षण, व्यसनमुक्ती व कौटुंबिक समस्यांवर तज्ज्ञांची साथ.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

मानसिक आरोग्यासाठी रोटरीचा मोठा पुढाकार; मलकापुरात ‘समुपदेशन केंद्रा’ चे भव्य लोकार्पण!
गरजूंसाठी मोफत मार्गदर्शन; शिक्षण, व्यसनमुक्ती व कौटुंबिक समस्यांवर तज्ज्ञांची साथ.

सातारा प्रतिनिधी सारिका गवते
कराड, दि. २१ : समाजातील वाढत्या मानसिक ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर मलकापूर येथे रोटरी क्लब ऑफ मलकापूरच्या वतीने एक महत्त्वपूर्ण आणि समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात आला आहे. रोटरी डिस्ट्रीक्ट गव्हर्नर रो. सुधीर लातूरे यांच्या हस्ते नूतन ‘समुपदेशन केंद्रा’चे लोकार्पण उत्साहात पार पडले.
प्रसाद नागरी सहकारी बँकेच्या इमारतीत, गरुड हॉस्पिटल शेजारी सुरू करण्यात आलेले हे केंद्र नागरिकांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. या केंद्रामध्ये मानसिक आरोग्य, शैक्षणिक मार्गदर्शन, व्यसनमुक्ती तसेच कौटुंबिक समस्यांवर तज्ज्ञांमार्फत मोफत व सवलतीच्या दरात समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
यावेळी बोलताना डिस्ट्रीक्ट गव्हर्नर रो. सुधीर लातूरे यांनी मलकापूर रोटरी क्लबच्या कार्याचे कौतुक करत, “समुपदेशन केंद्रासारखे उपक्रम हे थेट समाजाच्या गरजांवर उपाय देणारे आहेत. रोटरीचा सेवायज्ञ अशा उपक्रमांमुळे अधिक व्यापक होत आहे,” असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमात समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. ‘रोटरी सक्षम पुरस्कार’ श्री. मधुकर निवास जाधव यांना, तर ‘रोटरी आत्मनिर्भर पुरस्कार’ सौ. प्राजक्ता नंदकुमार हुकेरी-जोशी यांना प्रदान करण्यात आला. तसेच अटके हायस्कूलला सामाजिक बांधिलकी जपत ‘सॅनिटरी डिस्पोजर मशीन’ भेट देण्यात आले.
क्लबचे अध्यक्ष रो. राहुल जामदार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आगामी योजनांचा आढावा घेत अधिक प्रभावी सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. सेक्रेटरी रो. विजय दुर्गावळे यांनी वर्षभरातील कामकाजाचा सविस्तर अहवाल सादर केला.
या कार्यक्रमाला रोटरी डिस्ट्रीक्ट ३१३२ चे सेक्रेटरी राजगोपाल तापडिया, फर्स्ट लेडी सौ. संगीता लातूरे, असिस्टंट गव्हर्नर जगदीश वाघ यांच्यासह रोटरीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. विनोद आमले व रो. शुभांगी शेलार यांनी प्रभावीपणे केले, तर रो. राजन वेळापुरे यांनी आभार प्रदर्शन केले. ‘वंदे मातरम्’च्या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.
🟦 चौकट:
“समुपदेशन केंद्रासारखे उपक्रम समाजाच्या ज्वलंत प्रश्नांवर थेट उपाय देतात. रोटरीचे कार्य खऱ्या अर्थाने लोकसेवेचे उदाहरण आहे.”
— रो. सुधीर लातूरे, डिस्ट्रीक्ट गव्हर्नर




