साताऱ्यात महाबळेश्वरच्या महिलांचा गौरव; वैशाली भिलारे यांना ‘आंतरराष्ट्रीय प्रगतशील शेतकरी’ पुरस्कार.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) साताऱ्यात महाबळेश्वरच्या महिलांचा गौरव; वैशाली भिलारे यांना ‘आंतरराष्ट्रीय प्रगतशील शेतकरी’ पुरस्कार.

सातारा प्रतिनिधी सारिका गवते
महिला दिनानिमित्त कृषी क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान; महाबळेश्वर तालुक्याची जिल्ह्यात छाप.
सातारा दि. १० : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे सातारा येथे आयोजित भव्य समारंभात महाबळेश्वर तालुक्यातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. यामध्ये भिलार (पुस्तकांचे गाव) येथील सौ. वैशाली बिपीन भिलारे यांना ‘आंतरराष्ट्रीय महिला प्रगतशील शेतकरी पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
शनिवार, ७ मार्च रोजी सातारा येथील पोलीस कवायत मैदान, पारंगे चौक येथे हा दिमाखदार सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि जिल्हा कृषी अधिकारी सौ. भाग्यश्री फरांदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ निमित्त कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांची निवड करण्यात आली होती. या निवडीत महाबळेश्वर तालुक्याने आपली ठळक छाप उमटवली.
भिलार येथील सौ. वैशाली बिपीन भिलारे यांना आंतरराष्ट्रीय महिला प्रगतशील शेतकरी पुरस्कार, सौ. ज्योती चैतन्य जंगम (पर्वत वाघावळे) यांना कृषी सखी सन्मान पुरस्कार तर सौ. नम्रता संजय (केळगणे, भेकवली) यांना महिला उद्योजक गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या यशामागे महाबळेश्वर कृषी विभागाचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. तालुका कृषी अधिकारी सौ. माया लेंडे, कृषी सहाय्यक संतोष जगताप आणि श्रीमती मोनिका शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलांनी आधुनिक शेती आणि पूरक व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सदस्य तसेच मोठ्या संख्येने महिला शेतकरी उपस्थित होत्या.
“महिलांनी आधुनिक शेतीकडे वळल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी गती मिळेल,” असा विश्वास जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भिलारच्या स्ट्रॉबेरीपासून ते कृषी पर्यटनापर्यंत महिलांनी घेतलेली झेप अभिमानास्पद असून हा पुरस्कार त्यांच्या मेहनतीचा सन्मान आहे, अशी भावना महाबळेश्वर कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आली.
2) लोणंद:-लोणंदमध्ये कर्तृत्ववान महिलांचा गौरव; ‘सुजन फाउंडेशन’चा प्रेरणादायी उपक्रम – जागतिक महिला दिनानिमित्त कर्तबगार महिला सन्मान सोहळा उत्साहात संपन्न.

लोणंद, दि. १० : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सुजन फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित ‘कर्तबगार महिला सन्मान सोहळा’ उत्साहात व आनंदात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा या वेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले यांच्या पनतूसून श्रीमती नीताताई होले उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. जयश्री यादव, डॉ. दिपाली क्षीरसागर, खंडाळा पंचायत समिती सदस्या सौ. छायाताई जाधव, सौ. शलाका कणसे-ननावरे (संचालक, आरोग्य कर्मचारी सहकारी पतसंस्था सातारा) तसेच लोणंद पोलीस स्टेशनच्या महिला प्रतिनिधी अमृता चौधरी व संतोष होळकर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. स्वागताध्यक्ष सौ. शितल शेळके-पाटील (संस्थापक अध्यक्ष, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले हरितक्रांती सहकारी महिला पतसंस्था लोणंद) यांनी मान्यवर व उपस्थित महिला भगिनींचे स्वागत केले.
यावेळी समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांना ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये प्राचार्य शर्मिला नेवसे, सौ. विद्या सुनील शिंदे (योग शिक्षिका, फलटण), श्रीमती लीला वाघमारे (सुखेड), सौ. अरुणा कुरपड (विस्तार अधिकारी, शिक्षण विभाग, कोरेगाव), सौ. स्नेहल काळे, श्रीमती नजमा पठाण, सौ. संगीता गोरड (सेवानिवृत्त मुख्याध्यापिका) आणि श्रीमती रजनी शिंदे (वनस्थळी व्यवस्थापिका, लोणंद) यांचा समावेश होता.
तसेच विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या महिलांना कर्तबगार महिला सन्मान देऊन गौरवण्यात आले. यामध्ये सौ. आसावरी नेवसे (उद्योजिका), सौ. हिंदु धायगुडे (ग्रामसेविका), माधुरी भोसले (पत्रकार), समीना शेख (कार्यकर्त्या), सुनिता जाधव (LIC प्रतिनिधी), अनुराधा गारळे (फोटोग्राफर), सुनिता घनवट, सुप्रिया पवार, रूपाली गोरे (सचिव, मयुरेश्वर पतसंस्था), सौ. भोसले मॅडम (मराठा पतसंस्था), स्मिता क्षीरसागर (फार्मासिस्ट) आणि सौ. नीता खोमणे (असेन्ट इंग्लिश मीडियम स्कूल) आदींचा समावेश होता.
कार्यक्रमात सौ. विद्या शिंदे (योग प्रशिक्षक) यांनी महिलांना योग व आहाराविषयी मार्गदर्शन केले. डॉ. जयश्री यादव यांनी आरोग्य विषयक माहिती दिली, तर लोणंद पोलीस स्टेशनच्या महिला प्रतिनिधी अमृता चौधरी यांनी महिला व मुलींचे कायदेशीर हक्क व कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात नीताताई होले यांनी फुले दांपत्यांनी स्त्री शिक्षण, समानता व बंधुता यासाठी केलेले कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्मिता क्षीरसागर, गीतांजली शिंदे, अर्चना शिंदे, अश्विनी जाधव, शुभदा झणझणे, प्रशांत शिंदे, सुनील रासकर आणि बबलू पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच शुभम नेवसे, वैभव क्षीरसागर, प्रवीण क्षीरसागर, निखिल राऊत, महादेव क्षीरसागर (अध्यक्ष, संत सावता महाराज सेवाभावी संस्था लोणंद), संजय जाधव (अध्यक्ष, राष्ट्रीय परिवर्तन संघ), राजेश भाटिया व किरण जाधव (अध्यक्ष, साथी फाउंडेशन) यांचे सहकार्य लाभले.
या कर्तबगार महिला सन्मान समारंभासाठी लोणंद व परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुजन फाउंडेशनचे अध्यक्ष अजित जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन रघुनाथ शेळके यांनी केले.
3) कराड:-कष्टकरी माऊलींचा सन्मान; यशोधन अपार्टमेंटमध्ये महिला दिन उत्साहात – स्वच्छता व घरकाम करणाऱ्या महिलांचा सन्मान; कृतज्ञतेचा अनोखा उपक्रम.

कराड दि. १० : जागतिक महिला दिनानिमित्त कराड येथील यशोधन अपार्टमेंटमध्ये ८ मार्च रोजी महिला दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. केवळ उत्सव साजरा करण्यापेक्षा समाजातील कष्टकरी महिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत या उपक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमाला कराड नगर परिषदेचे नगरसेवक शिवाजी पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी, माजी नगरसेविका सौ. पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ज्येष्ठ पत्रकार सौ. विजया माने यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे यशोधन अपार्टमेंटमधील सर्व पुरुष सभासदांनी एकत्र येऊन घेतलेला पुढाकार. अपार्टमेंटमध्ये दिवसरात्र मेहनत करणाऱ्या, स्वच्छता व साफसफाई तसेच धुनी-भांडी करणाऱ्या कष्टकरी महिलांचा संसारोपयोगी साहित्य देऊन सन्मान करण्यात आला. समाजाच्या मुख्य प्रवाहाबरोबरच पडद्यामागे राहून घराघरांसाठी झटणाऱ्या या महिलांचा गौरव करण्याचा हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरला. यावेळी अपार्टमेंटमधील सर्व महिलांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी सौ. अर्चना देशपांडे, तृप्ती कळेकर, डॉ. सौ. सोनाली थोरात आणि सौ. रेखा संसदी यांनी मनोगत व्यक्त करत स्त्रीशक्तीच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. “महिला दिन म्हणजे केवळ सत्कार नव्हे, तर एकमेकींच्या पाठीशी उभे राहण्याची शक्ती आहे,” असा सूर या वेळी उमटला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत अपार्टमेंटचे अध्यक्ष प्रा. दिलीप संकपाळ यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात महिला दिनाचे महत्त्व आणि आजच्या काळातील स्त्रीची भूमिका विशद केली. प्रमुख पाहुणे शिवाजी पवार यांनी महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करत सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उमेश यादव यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अपार्टमेंटमधील सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
4) कराड:-महिला हक्कांसाठी कायद्याचा जागर; कराडमध्ये ‘स्वराज्य फाउंडेशन’चा स्तुत्य उपक्रम.

अॅड. शहनाझ शेख यांचे महिला हक्क व अत्याचारविरोधी कायद्यावर प्रभावी मार्गदर्शन
कराड, दि. १० : महिलांनी अन्याय सहन करत बसण्यापेक्षा आपल्या हक्कांबाबत सजग राहून अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहिले पाहिजे. प्रत्येक महिलेला कायद्याचे ज्ञान असणे ही आजच्या काळाची अत्यंत गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध वकील व सामाजिक कार्यकर्त्या अॅड. शहनाझ शेख यांनी केले.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून स्वराज्य सोशल वेलफेयर फाउंडेशन (आगाशिवनगर) यांच्या वतीने ‘महिला अत्याचार विरोधी कायदे व आपली जबाबदारी’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. मलकापूर येथील श्री गणेश कॉलनी परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सामाजिक कार्यकर्त्या विजया साळुंखे यांनी महिलांनी स्वावलंबी बनून समाजात आत्मविश्वासाने वावरण्याचे आवाहन केले. यावेळी व्यासपीठावर प्रा. शिला पाटील (प्राचार्या, आनंदराव चव्हाण उच्च माध्यमिक विद्यालय, मलकापूर), राधिका मुकुंद पन्हाळे (कै. सिंधूताई सपकाळ यांच्या मानसकन्या) व विजया माने (प्रतिनिधी, प्रगती टाईम्स) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सोमनाथ पाटील होते. त्यांनी आपल्या भाषणात महिला सन्मान व सुरक्षिततेसाठी समाजाने सामूहिक जबाबदारी उचलणे आवश्यक असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी स्वराज्य फाउंडेशनच्या सचिव रंजना यादव, खजिनदार सुजाता वाडकर, महिला संघटक रेखा भुर्के, सदस्य सचिन पाटील व केतन स्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच जगन्नाथ यादव, श्रद्धा ढेरे व श्रद्धा सूर्यवंशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
संस्थेचे उपाध्यक्ष अरुण राडे व कार्याध्यक्ष हेरंब यादव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. विशेष म्हणजे, या कार्यक्रमासाठी मुंबई येथील राठोड इंफ्रा या कंपनीने प्रायोजकत्व दिले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मेघा वाडकर यांनी ओघवत्या शैलीत केले. महिला सक्षमीकरण व कायद्याची जनजागृती घराघरांत पोहोचवण्याच्या उद्देशाने राबवलेला हा उपक्रम यशस्वी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




