आरोग्य व शिक्षणक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाई:-लाखो भाविकांच्या उपस्थितीत बावधानची ऐतिहासिक बगाड यात्रा दणक्यात – ‘काशिनाथाचं चांगभलं!’च्या जयघोषात ३५० वर्षांची परंपरा पुन्हा जिवंत.

पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

1) वाई:-लाखो भाविकांच्या उपस्थितीत बावधानची ऐतिहासिक बगाड यात्रा दणक्यात – ‘काशिनाथाचं चांगभलं!’च्या जयघोषात ३५० वर्षांची परंपरा पुन्हा जिवंत.

 सातारा प्रतिनिधी सारिका गवते

वाई, दि. १० : वाई तालुक्यातील बावधान येथील पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली ऐतिहासिक बगाड यात्रा यंदाही ‘काशिनाथाचं चांगभलं!’ या जयघोषात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात भक्तिमय वातावरणात पार पडली. सुमारे ३५० वर्षांची परंपरा लाभलेल्या या यात्रेला यंदा लाखो भाविकांनी उपस्थित राहून ग्रामदैवत भैरवनाथाचे दर्शन घेतले, त्यामुळे संपूर्ण बावधान परिसर भक्तिभावाने दुमदुमून गेला.

यंदाच्या यात्रेत बगाड्या होण्याचा मान विठ्ठल सोपान कदम यांना मिळाला. होळी पौर्णिमेच्या दिवशी भैरवनाथ मंदिरात कौल घेऊन बगाड्या निश्चित केला जातो. सोमवारी सकाळी कृष्णातीरावरील सोनेश्वर येथे भैरवनाथ, जोगेश्वरी आणि ग्रामदैवतांची पूजा झाल्यानंतर सकाळी सुमारे ११ वाजता बगाडाला बैलजोड्या जुंपण्यात आल्या आणि यात्रेला सुरुवात झाली.
बावधानचा बगाड हा श्रद्धा आणि परंपरेचा अद्वितीय संगम मानला जातो. दगडी चाके असलेल्या या रथावर सागाच्या लाकडाचा सुमारे २५ ते ३० फूट उंच खांब उभारला जातो. खांबाच्या दोन्ही बाजूंना बांबू व पारंपरिक झाडांच्या साहाय्याने विशाल शीड बांधले जाते. हे भव्य बगाड ओढण्यासाठी १० ते १२ धष्टपुष्ट बैलजोड्या जुंपल्या जातात. मार्गात ठराविक ठिकाणी बैलजोड्या बदलल्या जात असल्याने गावातील सर्व समाजघटकांना बगाड ओढण्याचा मान मिळतो.
दुपारी तीनच्या सुमारास बगाड शेतशिवारातून मुख्य मार्गावर दाखल झाले. सायंकाळी पाचच्या सुमारास वाई–सातारा रस्त्यावर पोहोचलेले बगाड रात्री सातच्या सुमारास बावधान गावात दाखल झाले. बगाडाच्या मागे ग्रामदैवतांच्या पालख्या, ढोल-ताशे आणि पारंपरिक वाद्यांचा ताफा असल्याने वातावरण भक्तिमय झाले होते. यात्रेच्या निमित्ताने रस्त्यांवर ठिकठिकाणी खाऊच्या गल्ल्या व व्यापारी स्टॉल्स उभारले गेले होते.
यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे आणि बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी व दंगाविरोधी पथकाचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, होळी पौर्णिमा ते रंगपंचमी या चार दिवसांच्या धार्मिक उत्सवात देवाचा विवाह, छबिना सोहळा आणि विविध पारंपरिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांच्या उपस्थितीने बावधान नगरी भक्ती, परंपरा आणि उत्साहाने दुमदुमून गेली.

2) वाई मतदारसंघाच्या विकासाला मोठी चालना; रस्ते-पुलांसाठी २९.७७ कोटींची मंजुरी.

मंत्री मकरंद पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामीण दळणवळण होणार अधिक मजबूत

वाई, दि. १० : वाई-खंडाळा-महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातील रस्ते व पुलांच्या विकासासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून २९ कोटी ७७ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. या निधीमुळे ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होणार असून नागरिकांचा प्रवास सुरक्षित व सुलभ होणार आहे. या मंजुरीसाठी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांनी दिली.
भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असलेल्या वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघात ग्रामीण भागातील रस्ते, पूल व दळणवळण सुविधा बळकट करण्याची मागणी दीर्घकाळापासून होत होती. स्थानिक नागरिकांच्या मागण्या तसेच पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मार्गांचा विचार करून हा निधी मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
विशेषतः महाबळेश्वर परिसरातील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या सुधारणेमुळे पर्यटकांचा ओघ वाढण्यास मदत होणार असून त्याचा थेट फायदा स्थानिक व्यावसायिक व पर्यटनाशी संबंधित घटकांना होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांसाठी प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होण्यासही या कामांमुळे मदत मिळणार आहे.
या विकासकामांमुळे मतदारसंघातील दळणवळण व्यवस्था अधिक मजबूत होणार असून ग्रामीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास मंत्री मकरंद पाटील यांनी व्यक्त केला.

3) वाई:-निकृष्ट रस्त्याविरोधात वाईकरांचा एल्गार; सुरूर–पोलादपूर कामावर ‘आरपार’ची लढाई जाहीर.

ठेकेदाराच्या मनमानीवर संताप; धुळीच्या त्रासाने जनता त्रस्त – सर्वपक्षीय बैठकीत आंदोलनाचा निर्णय

वाई, दि. १० : गेल्या दीड वर्षांपासून कासवगतीने सुरू असलेले सुरूर–पोलादपूर रस्त्याचे काम आणि वाई–मांढरदेव मार्गाची दुरवस्था यामुळे वाईकरांचा संयम अखेर सुटला आहे. ठेकेदाराची मनमानी, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि उडणाऱ्या धुळीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, आता निवेदने देण्यापेक्षा प्रत्यक्ष ‘आरपार’ची लढाई छेडण्याचा निर्धार वाईकरांनी केला आहे. सोमवारी वाई नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
बैठकीला नगराध्यक्ष अनिल सावंत, सुरेश कोरडे, प्रशांत डोंगरे, अशोक लोखंडे, दीप्ती पिसाळ, ॲड. विजयसिंह पिसाळ, तेजपाल वाघ, सागर मालुसरे, यशवंत जमदाडे, जितेंद्र पिसाळ, पद्मा जाधव-पाडळे, केतकी पाटणे, अपर्णा जमदाडे, जागृती पोरे, दीपाली सावंत, ज्योती गांधी, नूतन मालुसरे, विजय ढेकाणे, प्रसाद बनकर, सचिन सावंत यांच्यासह व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत ‘NP Infra’ आणि सबलेट घेतलेल्या ‘KLN’ कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले. नियमानुसार अत्याधुनिक पेव्हर मशीनचा वापर करणे आवश्यक असताना, प्रत्यक्षात फावडे आणि लाकडी पट्ट्यांच्या सहाय्याने काँक्रिट पसरवले जात असल्याचा आरोप रोहित वाडकर यांनी केला. साईटवर प्रशिक्षित अभियंते नसल्याने आणि कामाची देखरेख करणारी ‘TPL’ एजन्सी अनुपस्थित असल्याने कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
रस्त्यावर नियमित पाणी मारले जात नसल्याने उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महिला, लहान मुले आणि वृद्धांना श्वसनाचे त्रास वाढले असून जनावरांना चारा खाणेही कठीण झाले आहे. धुळीमुळे शेतीपिकांचे नुकसान होत असून हॉटेल व्यावसायिक आणि टपरीधारकांचे व्यवसायही ठप्प झाले आहेत. एसटी मार्ग बदलल्याने प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
ठेकेदाराविरोधात आवाज उठवल्यास स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी धरून पोलीस प्रशासनामार्फत दबाव आणला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व वाई तालुका व्यापारी तसेच वाई–सुरूर आणि वाई–मांढरदेव मार्गालगतचे व्यावसायिक करणार असून बुधवारी सकाळी ११ वाजता मोर्चा काढून निवेदन देण्यात येणार आहे. याच दिवशी संपूर्ण वाई शहर व तालुका बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आला. प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला.
दरम्यान, या बैठकीत भाजपच्या नगरसेवकांची मोठी उपस्थिती होती. मात्र राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याने आणि व्यापारी महासंघाला विश्वासात न घेता जाहीर केलेल्या ‘वाई बंद’वरून काही काळ सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
चौकट : “दर्जेदार रस्ता हवा, मनमानी नाही!”
“आम्हाला चांगल्या दर्जाचा रस्ता हवा आहे. जर ५० वर्षे टिकेल असा दर्जा राखला जात नसेल, तर हे काम तात्काळ थांबवून दोषींवर गुन्हे दाखल करावे लागतील. आता कृती समितीच्या माध्यमातून ठेकेदार व प्रशासनाला जाब विचारला जाईल.”
— अनिल सावंत, नगराध्यक्ष, वाई
चौकट : वाईकरांच्या प्रमुख मागण्या
दर्जेदार काम: रस्ता किमान ५० वर्षे टिकेल अशा तांत्रिक पद्धतीने (PQC) करावा.
धुळीवर नियंत्रण: नागरिकांच्या आरोग्यासाठी दररोज सकाळ-संध्याकाळ पाणी मारावे.
तांत्रिक देखरेख: ‘TPL’ एजन्सीचे जबाबदार अधिकारी व अभियंते साईटवर कायम ठेवावेत.
देयके रोखा: कामाचा दर्जा सुधारल्याशिवाय ठेकेदाराचे बिल अदा करू नये.
कारवाई करा: नियम मोडणाऱ्या ठेकेदारावर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करावी.

4) वाई:-४२ वर्षांची विश्वासाची परंपरा; श्री कुलस्वामी को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात.

वाई दि. १०:
श्री कुलस्वामी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., नवी मुंबई यांचा ४२ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने संस्थेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या प्रगतीचा आढावा सादर करण्यात आला. सध्या संस्थेची सभासद संख्या तब्बल १,२१,९०१ इतकी असून सभासद ठेव १२,२०० कोटी रुपये असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. संस्थेच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या सभासद, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी व्यवस्थापक नितीन बोलोशे, सहाय्यक अधिकारी लक्ष्मी मालुसरे, सिनियर क्लार्क विशाल गायकवाड, सिनियर क्लार्क प्रतीक्षा कांबळे तसेच पूजा सणस यांनी विशेष पुढाकार घेतला.
यावेळी शाखा सल्लागार तुकाराम शेठ जेधे यांच्यासह विकास जाधव, यशवंत खैरे, शिवाजी जमदाडे, अमोल बांदल, राजाराम शिंदे, गणेश सणस, गणेश जरांडे, प्राजक्ता कदम, दिपाली जाधव, तुषार भोसले, रमेश पवार, विजय भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत वर्धापन दिनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा केला.
छायाचित्र: श्री कुलस्वामी को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., नवी मुंबई यांच्या ४२ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवर.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button