कराड:-संशयाचा स्फोट! मध्यरात्रीच्या वादातून प्रियकराचा खून; मलकापूर हादरले – कथित अत्याचार, संशय आणि संतापाचा कळस; महिला पोलीस कोठडीत.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) कराड:-संशयाचा स्फोट! मध्यरात्रीच्या वादातून प्रियकराचा खून; मलकापूर हादरले – कथित अत्याचार, संशय आणि संतापाचा कळस; महिला पोलीस कोठडीत.
प्रतिनिधी सारिका गवते
कराड दि. १८ : प्रेमसंबंधातील संशय, सततचे वाद आणि तणावाचा शेवट थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना मलकापूर येथील आगाशिवनगर परिसरात घडली. मध्यरात्री झालेल्या तीव्र वादानंतर एका महिलेने आपल्या प्रियकराचा जीव घेतल्याची माहिती समोर आली असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
राजेंद्र मरीआप्पा काळे (रा. कराड) असे मृताचे नाव असून, सारिका चंद्रकांत कोळी (रा. मलकापूर) हिला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत आणि संशयित यांचे काही काळापासून प्रेमसंबंध होते. संशयाच्या कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचे समोर आले आहे. सोमवारी रात्री राजेंद्र हा सारिकाच्या श्रीराम कॉलनीतील भाड्याच्या खोलीत गेला असता पुन्हा एकदा वाद पेटला. हा वाद इतका टोकाला गेला की पहाटेच्या सुमारास गंभीर घटना घडली.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक राजश्री पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत.
संशयित महिलेला न्यायालयात हजर केले असता तिला २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या घटनेच्या वेळी तिची अल्पवयीन मुलगी घरात उपस्थित होती, ही बाब अधिकच धक्कादायक ठरत आहे.
प्रेमसंबंधातील संशय आणि टोकाच्या वादाचा हा थरारक शेवट सध्या कराड परिसरात चर्चेचा विषय ठरला असून, पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
2) संत निरंकारी मिशनचा ‘प्रोजेक्ट अमृत’चा जलजागर; साताऱ्यात २४ ठिकाणी महास्वच्छता मोहीम – ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’चा जागर; देशभर १५०० हून अधिक केंद्रांवर एकाच वेळी महास्वच्छता.
पत्रकार प्रतिनिधी सारिका गवते
सातारा दि. १९ : जलसंवर्धनाचा ध्यास आणि समाजप्रबोधनाचा संदेश घेऊन संत निरंकारी मिशनतर्फे ‘प्रोजेक्ट अमृत’च्या चौथ्या टप्प्याला रविवारी, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरुवात होत आहे. सातारा जिल्ह्यातील तब्बल २४ केंद्रांवर नदीपात्रे, तलाव, विहिरी आणि इतर जलस्रोतांची व्यापक स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.
माता सुदीक्षा जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरात १५०० हून अधिक ठिकाणी एकाच वेळी ही महास्वच्छता पार पडणार आहे. सातारा शहरासह कराड, पाटण, वाई, फलटण, कोरेगाव, खंडाळा, भुईंज, शिरवळ, लोणंद, नीरा नरसिंगपूर आदी ठिकाणी रविवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत हजारो स्वयंसेवक श्रमदानातून जलस्रोत स्वच्छ करतील.
हा उपक्रम बाबा हरदेव सिंह यांच्या प्रेरणेतून २०२३ मध्ये सुरू झाला असून भारत सरकार संस्कृती मंत्रालय यांचे सहकार्य लाभले आहे. “पाणी ही ईश्वराची अमूल्य देणगी आहे; तिचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे,” हा संदेश जनमानसात रुजवणे हा मोहिमेचा मुख्य हेतू आहे.
पहिल्या तीन टप्प्यांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर चौथा टप्पा अधिक व्यापक स्वरूपात राबवला जात आहे. स्वच्छतेसोबतच जलसंवर्धनाची सवय समाजात निर्माण व्हावी, यासाठी जनजागृतीवर विशेष भर दिला जाणार आहे.
भावी पिढीसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि समृद्ध जलसंपदा राखण्यासाठी या जनआंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मिशनतर्फे करण्यात आले आहे.




