मुंबई:-क्रीडामंत्री कोकाटेंची आमदारकी व मंत्रीपद धोक्यात?
पत्रकार प्रमोद काळे हवेली तालुका उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

क्रीडामंत्री कोकाटेंची आमदारकी व मंत्रीपद धोक्यात?

मुंबई:-
मा. नामदार क्रीडामंत्री कोकाटे यांना ३० वर्षांपूर्वीच्या घोटाळ्याने ओढवली नामुष्की असून कोर्टाने फेटाळली मुदत, अटकेचे वॉरंट जारी केली आहे.
नाशिक जिल्ह्याच्या राजकारणातील एक मोठे नाव आणि सिन्नरचे विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत धक्कादायक ठरला आहे. सुमारे तीन दशकांपूर्वीच्या सदनिका घोटाळा प्रकरणात नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने कोकाटे यांची दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवली असून, त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश (Arrest Warrant) दिले आहेत. या निर्णयामुळे कोकाटे यांची आमदारकी आता टांगत्या तलवारीवर असून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
हे प्रकरण १९९५ सालचे आहे. तत्कालीन मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यातून (१०% कोटा) सदनिका मिळवण्यासाठी माणिकराव कोकाटे यांनी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप होता. ‘अल्प उत्पन्न गटा’त बसत नसतानाही खोटी माहिती देऊन त्यांनी नाशिकच्या कॅनडा कॉर्नर भागात सदनिका लाटल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी दीर्घकाळ चाललेल्या कायदेशीर लढाईनंतर न्यायालयाने हा ऐतिहासिक निकाल दिला आहे.
न्यायालयाने फटकारले, मुदत नाकारली:
कनिष्ठ न्यायालयाने यापूर्वीच कोकाटे यांना दोन वर्षांची सक्तमजुरी आणि दंड सुनावला होता. या शिक्षेविरोधात कोकाटे यांनी सत्र न्यायालयात अपील केले होते. मात्र, सत्र न्यायालयाने आज ते अपील फेटाळून लावत कनिष्ठ न्यायालयाची शिक्षा कायम ठेवली. कोकाटे यांच्या वकिलांनी प्रकृतीचे कारण देत न्यायालयात हजर राहण्यासाठी ४ दिवसांची सवलत मागितली होती, परंतु न्यायालयाने ती विनंती फेटाळून लावत कडक शब्दांत ताशेरे ओढले आणि पोलिसांना अटकेचे आदेश दिले.
यावरती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार मंत्री पदाबद्दल काय निर्णय घेतात याची वाट पहावी लागेल.




