सातारा:-मराठी पत्रकार परिषदेचा झेंडा अजिंक्य ठेवू हरीश पाटणे : साताऱ्यात 87 वा वर्धापन दिन साजरा.
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

मराठी पत्रकार परिषदेचा झेंडा अजिंक्य ठेवू हरीश पाटणे : साताऱ्यात 87 वा वर्धापन दिन साजरा.

सातारा :
पत्रकार संघटनांची मातृसंस्था असलेल्या मराठी पत्रकार परिषदेला गौरवशाली इतिहास आहे. हा इतिहास सातारा जिल्ह्यात अबाधित असून मराठी पत्रकार परिषदेचा झेंडा अजिंक्य ठेवू, असे गौरवोद्गार महाराष्ट्र शासनाच्या पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांनी काढले. दरम्यान, हरीश पाटणेंच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पत्रकारांची संघटना आणखी मजबूत करु, अशी ग्वाही पत्रकार संघाचे मार्गदर्शक विनोद कुलकर्णी यांनी दिली.
मराठी पत्रकार परिषदेचा ८७ वा वर्धापन दिन सातारा जिल्हा पत्रकार भवनात साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. सातारा पत्रकार संघ, सातारा तालुका पत्रकार संघ, डिजिटल मीडिया परिषदेच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार जीवनधर चव्हाण, हणमंत पाटील, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे सदस्य चंद्रसेन जाधव, सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, सातारा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अजय कदम, डिजिटल मीडियाचे शहराध्यक्ष प्रतीक भद्रे उपस्थित होते.
हरीश पाटणे म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मराठी पत्रकार परिषदेच्या झेंड्याखाली पत्रकारांची मोट बांधली आहे. यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. सातारा जिल्ह्यात तालुकानिहाय पत्रकारांचे भक्कम संघटन करण्यात आले आहे. कोरोना काळात राज्यातील पहिले पत्रकारांसाठी कोरोना सेंटर साताऱ्यात उभारण्यात आले. अधिस्वीकृती समितीच्या माध्यमातून गरजू पत्रकारांना सर्वाधिक अधिस्वीकृती कार्ड देण्याची किमया करता आली. तसेच सातारा शहरात जिल्हा पत्रकार भवनाची देखणी इमारत उभारण्यात आली. भविष्यात आणखी चांगल्या पध्दतीने जिल्ह्यात पत्रकारांसाठी काम करत राहू व मराठी पत्रकार परिषदेचा झेंडा अजिंक्य ठेवू, असे गौरवोद्गार हरीश पाटणे यांनी काढले.
विनोद कुलकर्णी म्हणाले, जिल्हा पत्रकार भवन समितीच्या माध्यमातून लवकरच पत्रकारांसाठी व संघटनेसाठी अधिक भरीव काम करण्याची योजना आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन काही दिवसांवर आले आहे. यामध्ये भरगच्च व दर्जेदार कार्यक्रम आहेत. सातारा शहरासह जिल्हावासीयांनी याचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन विनोद कुलकर्णी यांनी केले.
ज्येष्ठ पत्रकार हणमंत पाटील म्हणाले, साताऱ्यातील पत्रकार संघटनेचे सुरु असलेले काम मोलाचे आहे. पत्रकार व संघटना अधिक व्यापक करण्यासाठी जिल्हा पत्रकार भवनाच्या इमारतीचा प्रभावी वापर केला जावू शकतो. त्यासाठी लागेल ती मदत करण्यास आपण तयार आहोत.
मान्यवरांच्या मनोगतानंतर मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त केक कापून आंनद साजरा करण्यात आला. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचा विजय असो, अशा घोषणा देण्यात आल्या. प्रास्तविक व सूत्रसंचलन विठ्ठल हेंद्रे यांनी केले. आभार सातारा पत्रकार संघाचे सचिव गजानन चेणगे यांनी मानले. यावेळी ज्ञानेश्वर भोईटे, उमेश बांबरे, अजित जगताप, अमित वाघमारे, विजय जाधव, गौरी आवळे, गुरुनाथ जाधव, रिजवान सय्यद, सचिन काकडे, शिवाजी कदम तसेच सातारा पत्रकार संघ, सातारा तालुका पत्रकार संघ, डिजिटल मीडियाचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते.




