कुडाळ:-सत्तावीस वर्षाने पुन्हा एकदा निवडणुकीवर डोळा ठेवून धरणग्रस्तांच्या खांद्यावर आंदोलन बोजा….
ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
सत्तावीस वर्षाने पुन्हा एकदा निवडणुकीवर डोळा ठेवून धरणग्रस्तांच्या खांद्यावर आंदोलन बोजा….
कुडाळ दि: महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीने कृष्णा खोरे विकास महामंडळाची निर्मिती केली. त्यातून कुडाळी मध्यम प्रकल्प अंतर्गत जावळी तालुक्यातील महू हातगेघर धरणाची उभारणी केली. परंतु, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचले नाही. आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर सत्तावीस वर्षाने प्रश्न सुटू शकला नाही. त्यामुळे येथील धरणग्रस्त त्यांच्या नेत्यांना चुलू भर पाणी मे डूब जा.. असे सांगत असतानाच काहींनी आता जलसमाधीच्या आंदोलनाला पुढाकार घेतला असल्याचे समजते.
त्याबाबत माहिती अशी की, पाचगणीच्या पायथ्याशी असलेल्या जावळी तालुक्यातील महू व हातगेघर धरणाची उभारणी ऑक्टोबर १९९७ रोजी झाली होती. मूळ प्रशासकीय मान्यता ६३.४७ कोटी ते प्रथम प्रशासकीय मान्यता २७१.७९ कोटी आणि सुधारित प्रशासकीय मान्यता ६२५.४६ कोटी रुपये एवढी झाली होती. यापैकी ३२३.४९ कोटी रक्कम खर्च होऊन सुद्धा जावळी तालुक्यातील कुडाळ, सायगाव, रायगाव भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या बांधावर या धरणाचे पाणी पोहोचले नाही. हा नाकर्तेपणा लपवण्यासाठी पुन्हा एकदा धरणग्रस्तांच्या आंदोलनाची आरोळी ठोकली जात आहे. सातारा जिल्हा परिषद व जावळी पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर आंदोलनाचे पीक आता निघणार आहे. त्यामुळे महू – हातगेघर धरणग्रस्त आतापासूनच सावध झालेले आहेत. वाजंत्री व वऱ्हाड तयार असले तरी नवरा नवरीचा पत्ता नाही. अशी अवस्था या धरणाच्या प्रलंबित कामांमुळे झाली आहे. धरणग्रस्तांना पुनर्वसनाचा दाखला मिळणे अवघड झाले असताना धरणाचे पाणी शेतीला मिळावे. म्हणून निषेध सभा, आक्रोश आंदोलन, अन्नत्याग, उपोषण व जलसमाधी आंदोलनाची हाक देण्यात आलेली आहे. या आंदोलनाला किती धरणग्रस्त उपस्थित राहतील? ही आकडेवारी दिसून येईल. परंतु, सत्तावीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीमध्ये यांचाच सत्तेत सहभाग होता. आजही आहे. मग सत्तेचा वापर स्वतःच्या ठेकेदारीसाठी केला का? असा मार्मिक प्रश्न धरणग्रस्त आंदोलन करताना विचारू लागलेले आहेत.
महू- हातगेघर धरण पूर्ण झाल्यानंतर तेराशे हेक्टर क्षेत्रातील जमीन ओलिताखाली येणे क्रमप्राप्त होते. आता धरणातील कचरा काढण्याची वेळ पाटबंधारे विभागावर आलेली आहे. याला जबाबदार असणारी मंडळीच आता पुन्हा एकदा आंदोलनाचे बाळंतपण करत आहेत. अशी टीका होऊ लागलेली आहे.
धरणग्रस्तांच्या प्रश्नासाठी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला असला तरी त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी यासाठी नेमकं काय केलं? हे विचारण्यासाठी धरणग्रस्त आतुर झालेली आहेत.
एक वेळ सर्वांना फसवू शकतो. परंतु सर्वकाळ सर्वांना फसवणे अशक्य आहे.
सध्या करहर, बेलोशी, दापवडी, पिंपळी, वहागाव, रांजणी , महू, हातगेघर, कावडी, विवर, काटवली या भागातील धरणग्रस्त प्रश्न सुटण्याची वाट पाहत आहेत. त्यांची दुसरी पिढी आता पोटापाण्यासाठी गाव सोडून गेले आहेत. धरणग्रस्तांच्या प्रश्नांची जाण असणारे धरणग्रस्त नितीन गोळे, जीवन शिंदे, प्रकाश गोळे, अशोक गोळे, दत्ता गावडे, अर्जुन गावडे, विजय भालेघरे, गोपाळ बेलोशी, रविकांत बेलोशी अशी असंख्य धरणग्रस्त अभ्यासपूर्ण मांडणी करू शकतात. परंतु , राजकीय गॉडफादर नसल्यामुळे ते चर्चेत येऊ शकले नाहीत. या उलट जे सत्तेच्या सावली खाली कायम आहेत. अशीच मंडळी आता आंदोलनाची ठेकेदारी जोमात सुरू करत आहेत. अशा संधी साधून पासून धरणग्रस्तांनी सावध राहावे. अशी आता सांगण्याची वेळ आल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान, धरणग्रस्त लाभदायक कृती समिती स्थापन झाली आहे. धरणग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सुटावे अशी अपेक्षा आहे. परंतु, महू – हातगेघर येथील खरे धरणग्रस्त गावात आणि लाभदायक क्षेत्रातील प्रस्थापित मंडळी फायद्यासाठी आंदोलनात…. अशी अवस्था झाल्याचे प्रथम दर्शनी बोलले जात आहे.