अहमदनगर:-न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगरमध्ये सीएचबी शिक्षकांची पिळवणूक; शासनाच्या निधीचा गैरवापर?
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, अहमदनगरमध्ये सीएचबी शिक्षकांची पिळवणूक; शासनाच्या निधीचा गैरवापर?
अहमदनगर (राजकुमार इकडे) अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या अंतर्गत असलेल्या न्यू आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजमध्ये सीएचबी (क्लॉक अवर बेसिस) पद्धतीने कार्यरत असलेल्या शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक होत असल्याचे समोर आले आहे. संबंधित शिक्षकांनी उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.
मुख्य तक्रारी पुढीलप्रमाणे:
1. शिक्षकांचे मानधन वर्षभर थकीत: २०२४–२५ या शैक्षणिक वर्षात संपूर्ण वर्षभर अध्यापन करूनही संबंधित सीएचबी शिक्षकांना महाविद्यालय प्रशासनाने पगार दिला नाही. शासनाकडून निधी कॉलेजच्या खात्यात जमा झाल्यानंतरही, मे २०२५ ते जुलै २०२५ दरम्यान टप्याटप्याने मानधन देण्यात आले, हे अत्यंत अन्यायकारक असल्याचे शिक्षकांनी नमूद केले.
2. अपात्रतेकडे दुर्लक्ष करून नियुक्त्या: काही शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेच्या विरुद्ध विषयात अध्यापन करण्यास भाग पाडले जात आहे. उदाहरणार्थ, रसायनशास्त्र शिकवण्यासाठी अशा शिक्षकांची नियुक्ती झाली असून त्यांचे पदव्युत्तर शिक्षण जैव रसायनशास्त्रात आहे, जे अपात्रता ठरते. शिक्षकांनी यास विरोध केला असता त्यांना नियुक्ती नाकारण्यात आली.
3. बोगस नियुक्त्या व निधी उकळण्याचा प्रयत्न: अनेक शिक्षकांना एका महाविद्यालयात नियुक्ती दिल्याचे कागदोपत्री दाखवले असताना, प्रत्यक्षात ते इतर महाविद्यालयांमध्ये कार्यरत होते. हे प्रकरण केवळ शासनाकडून सीएचबी अनुदान मिळवण्यासाठी असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
4. अनधिकृत व अधिक वेळा काम करून घेणे: शासन नियमानुसार आठवड्यात ९ तास अध्यापन दाखवले जात असले तरी, प्रत्यक्षात २५–३० तास काम करून घेतले जात आहे. याबाबत कोणतीही नोंद नाही व अतिरिक्त कामाचे कोणतेही मोबदले देण्यात आलेले नाहीत.
5. शिक्षकांवर दबाव व धमकी: प्रशासनाकडून शिक्षकांवर दबाव टाकण्यात येत आहे की त्यांनी कुठलाही आक्षेप नोंदवू नये, अन्यथा भविष्यात नियुक्ती नाकारली जाईल. ही बाब अत्यंत गंभीर असून एका भयग्रस्त व अन्यायकारक वातावरणाची निर्मिती होते.
सदरील प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी
या प्रकरणात सरकारने तातडीने हस्तक्षेप करून चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी शिक्षकांची मागणी आहे. त्याचबरोबर सीएचबी शिक्षकांच्या नियुक्त्या, मानधन व कामाच्या तासांची पारदर्शकता सुनिश्चित करावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
राजर्षी शाहू महाराजांचे नाव घेऊन त्यांच्याच मूल्यांचा अपमान!
ही संस्था राजर्षी शाहू महाराज यांच्या निधीतून स्थापन झालेली आहे. सामाजिक न्याय, शिक्षणात पारदर्शकता आणि श्रमिकांचा सन्मान ही राजर्षी शाहू महाराजांची मूल्ये होती. परंतु आज ह्याच संस्थेमध्ये शासनाच्या निधीचा गैरवापर, शिक्षकांची पिळवणूक व अपात्र व्यक्तींच्या नियुक्त्या होत असल्याचे दिसून येते. ही बाब अत्यंत लज्जास्पद व निंदनीय आहे आणि शाहू महाराजांच्या नावाचा अनादर करणारी आहे.