वाई:- वेदना आणि प्रेमातून साहित्य फुलते – डॉ. राजेंद्र माने
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
वाई दि:31
वेदना आणि प्रेमातून साहित्य फुलते – डॉ. राजेंद्र माने
उत्कट भावनेतून कवितेची निर्मिती होते. त्यामुळे कविता हा अत्यंत संवेदनशील साहित्यप्रकार आहे. वेदना आणि प्रेम या दोन टोकांच्या भावनांतून खरे साहित्य जन्म घेते. त्यामुळे लेखक किंवा विद्यार्थी यांनी लेखन करताना या भावना जाणून घेऊन वास्तववादी शैलीने साहित्यनिर्मिती करावी”, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजेंद्र माने यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील ‘कृष्णाई’ नियतकालिक प्रकाशन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
याप्रसंगी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, सचिव डॉ. जयवंत चौधरी, प्रसिद्ध वक्ते श्रीधर साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते.
डॉ. माने म्हणाले, साहित्य हे वैविध्यपूर्ण असते. समकालीन, विडंबनात्मक, वैचारिक अशा कोणत्याही साहित्याची निर्मिती करण्यासाठी शब्दभांडार विकसित केले पाहिजे. त्यासाठी साहित्याचे वाचन करायला हवे. अशा वाचनातूनच लेखनाची बीजे रोवली जातात, कार्यशाळेपेक्षा जीवनातील अनुभवातून खऱ्या अर्थाने लेखक घडतात.
प्रसिद्ध वक्ते श्रीधर साळुंखे म्हणाले, लिहिणे नावाची गोष्ट वाचनाशिवाय शक्य नसून वाचनाची साधना केल्याशिवाय लेखनाची प्रसन्नता होत नाही, कागदावर बोट ठेवून वाचले तर ते काळजावर कोरले जाते असे सांगत आजच्या काळात वाचनाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी यांनी कृष्णाई नियतकालिक मागील ५५ वर्षाहून अधिक काळ विद्यार्थ्यांच्या भावनांचे आणि विचारांचे व्यासपीठ ठरत असून, वाई परिसराला कृष्णाईची मोठी देण आहे असे मत मांडले.
अध्यक्षीय मनोगतात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी विद्यार्थ्यांमधून साहित्य घडावे अशी अपेक्षा करताना कृष्णाई ही नेहमीच त्यांच्यासाठी दीपस्तंभ म्हणून उभी असेल असे आश्वासन दिले.
कार्यक्रमाच्या आरंभी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे यांनी प्रास्ताविकामध्ये ‘कृष्णाई’ हा महाविद्यालयाचा महत्त्वाचा दस्तऐवज असून लेखक व कलाकारांची जडणघडण आणि उत्कर्ष यांच्या असंख्य पाऊलखुणा यामध्ये असून यामधून तयार झालेले अनेक नवोदित कलाकार आणि लेखक वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असल्याचे सांगितले.
कु. सायुरी सणस आणि कु. सानिया काझी या विद्यार्थिनींनी ‘कृष्णाई’ मुळे आमच्या कलागुणांना वाव मिळत असल्याचे सांगत आम्ही लेखन करण्यास प्रेरित झाल्याचे सांगितले.
डॉ. मंजुषा इंगवले यांनी वरिष्ठ विभागाचे तर श्री. सुशांत स्वामी यांनी कनिष्ठ विभागाच्या कृष्णाईचे अंतरंग उलगडून सांगितले. पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक श्री. अर्जुन जाधव यांनी करून दिला, श्रीमती दिपाली चव्हाण यांनी आभार मानले तर श्री. सुमित वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
********””******”””****””***********
मदनदादा दातृत्वाचे उत्कृष्ट उदाहरण
आपल्या मनोगतात डॉ. माने यांनी मदनदादा हे एक सुसंस्कृत नेतृत्व असल्याचे नमूद केले, तसेच ते सह्रदयी वाचक असल्याचे सांगितले. श्रीधर साळुंखे म्हणाले, मदन दादा हे दातृत्वाचे उत्कृष्ट उदाहरण आहेत. त्यांनी आपल्या कृतीतून समाजाला घडविण्याचे काम केले आहे.