पुणे:-राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताईंचे निधन – नागपूरातील अहिल्या मंदिरात अंत्यदर्शन.
पत्रकार देवेंद्र साठे पुणे शहराध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
राष्ट्र सेविका समितीच्या माजी प्रमुख संचालिका प्रमिलाताईंचे निधन – नागपूरातील अहिल्या मंदिरात अंत्यदर्शन.
पुणे, दिनांक ३१ जुलै २०२५ ः राष्ट्र सेविका समितीच्या चौथ्या प्रमुख संचालिका वंदनीय प्रमिलाताई मेढे (वय ९७) यांचे गुरुवारी, ३१ जुलै २०२५ रोजी निधन झाले. नागपूर येथील समितीच्या धंतोली परिसरातील देवी अहिल्या मंदिर कार्यालयात सकाळी ९:०५ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका चित्राताई जोशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
प्रमिलाताईंच्या अंतिम दर्शनासाठी त्यांचे पार्थिव आज दिवसभर देवी अहिल्या मंदिराच्या तळमजल्यावर ठेवण्यात येईल. त्यांच्या निधनामुळे देशभरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. २००६ ते २०१२ या काळात त्या राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका होत्या. प्रमिलाताईंचे जीवन प्रखर राष्ट्रभक्तीने भारलेले होते. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात जन्मलेल्या प्रमिलाताई, लहान वयातच राष्ट्र सेविका समितीच्या संपर्कात आल्या. समितीच्या संस्थापिका, वंदनीय लक्ष्मीबाई केळकर (मावशी), यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. मावशींच्या सान्निध्यात राहून त्यांनी महिलांच्या सबलीकरणासाठी आणि संघटनात्मक कामासाठी मार्गदर्शन घेतले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी नागपूरमध्ये शिक्षिका म्हणून आणि नंतर सरकारी नोकरीत वरिष्ठ अंकेक्षक (Senior Auditor) म्हणूनही काम केले. मात्र, समितीच्या कार्यासाठी त्यांनी १२ वर्षे आधीच स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि स्वतःला पूर्णपणे संघटनेच्या कार्यासाठी वाहून घेतले. १९५० ते १९६४ पर्यंत त्या विदर्भ प्रांताच्या कार्यवाहिका होत्या. त्यानंतर त्यांनी विविध जबाबदाऱ्यांवर काम केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन अमेरिकेतील न्यू जर्सी शहराच्या महापौरांनी त्यांना ‘मानद नागरिकत्व’ बहाल केले होते.
२००३ मध्ये त्यांना समितीच्या सह प्रमुख संचालिका पदाची जबाबदारी मिळाली. याच काळात मावशीजींच्या जन्मशताब्दीनिमित्त २६६ दिवसांची भारत परिक्रमा केली, ज्यात त्यांनी सुमारे २८ हजार किलोमीटरचा प्रवास करून स्त्रीशक्तीचे संघटन आणि जागरणाचा संदेश दिला. जानेवारी २०२० मध्ये त्यांना ‘श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठा’ने त्यांच्या जीवनकार्याच्या गौरवार्थ डी.लिट. ही मानद पदवी देऊन सन्मानित केले.
प्रमिलाताईंचे मातृहृदयी व्यक्तिमत्व, सतत क्रियाशील असणारे त्यांचे मन आणि नव्या पिढीसाठी त्यांचे मार्गदर्शन कायम प्रेरणादायी ठरले आहे.
फार मोठे व्यक्तिमत्व. प्रवास, बैठका ,व्यवस्था यांमुळे अनेक वेळा त्यांचा सहवास लाभला होता हे माझे भाग्यच .
भावपूर्ण श्रद्धांजली …