सातारा:-(वाई)-!! वाऱ्यावरची वरात!! जि.प.,पं.स.निवडणूक (वाई-खंडाळा-महाबळेश्वर)
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

1) !! वाऱ्यावरची वरात!!जि.प.,पं.स.निवडणूक (वाई-खंडाळा-महाबळेश्वर)

लांबणार म्हणता, म्हणता जिल्हापरिषद पंचायतसमितीची निवडणूक जाहीर झाली साधारण २०-२५ दिवसांचा कालावधी सर्वच पातळ्यांवर गोंधळ, लगबग. स्थानिक स्वराज्यसंस्थांच्या निवडणूका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणूका मानल्या जातात, ग्रामीण भागातल्या तरुण, होतकरू कार्यकर्त्यांना संधी मिळते त्यांच्या समाजकार्याला न्याय मिळतो. इच्छुक उमेदवारांची जरी भाऊगर्दी असली तरी विजय एकच्याच पारड्यात जाणार त्यामुळे यंदाची संक्रांत कोणा कोणावर येणार हे लवकरच कळेल.
प्रस्थापित नेत्यांची ग्रामीण राजकारणावर भारी पकड असते, प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या राजकीय खुंटीला बांधलेला असतो. अलीकडच्या काळात वाई मतदारसंघात प्रामुख्याने दोन गटांचा प्रभाव आहे, पूर्वीच्या राजकारणात ग्रामीण भागातील नेतृत्व सर्वच पातळ्यांवर जाणीवपूर्वक पुढं आणलं जायचं, त्यापद्धतीचं सहकार्य नेत्यांकडून त्यांना लाभायचं, तितकीशी नैतिकता राजकारणात होती. सध्याच्या राजकारणाचा पोत बदललेला आहे ग्रामीण भागातला कुठलाही कार्यकर्ता राजकारणात स्थिरावणार नाही याची पूरेपूर काळजी नेतेमंडळी घेतात त्यामुळे दुसऱ्या, तिसऱ्या फळीतल्या कार्यकर्त्यांची सामाजिक प्रतिष्ठा लयाला गेली तसा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला, प्रत्येकाला नेत्याच्या दरबारात हजेरी लावणं क्रमप्राप्त झालं. आमदार गटाचे तर अनेक गावात दोन-दोन, तीन-तीन गट आहेत, घरटी पुढारी झाले तसे कार्यकर्तेही हुशार झाले तेही सर्वपक्षीय संबंध राखून स्वतःचा स्वार्थ साधायला लागले, पक्षनिष्ठा, विचार, नितिमत्ता सगळ्याची माती झाली, प्रत्येक निवडणूकीत गावच्या कार्यकर्त्याची किंमत ठरु लागली त्याला पॅकेजचं स्वरूप आलं हे उघड गुपित आहे. कार्यकर्ता दिवसेंदिवस लाचार झाला समाजातील स्वतःचं अस्तित्व, किंमत हरवून बसला आता तर सहा पक्षांमुळे कार्यकर्त्यांची आगाऊ सोय झाली आहे, कोणी कुणाला बांधील नाही कार्यकर्त्याच्या ओटीभरणात उणेपणा आला की चालला दुसरीकडे अशी साधारण परिस्थिती आहे.
राजकीय वातावरण कमालीचे गढूळ आहे, कोण कुठे जाईल याचा नेम नाही पक्षश्रेष्ठीही हतबल आहेत. भाजपाप्रणित महायुतीतील तिन्ही पक्ष विशेष अर्थानं सक्षम आहेत तिथं कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात प्रलोभनं मिळतात त्यामुळे भाजपकडे पक्षप्रवेशाचा ओढा अधिक आहे. महानगरपालिका निवडणुकीत पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने वाई मतदारसंघात शरद पवार गटाची ताकद दखलपात्र असतानाही कार्यकर्ते मात्र सैरभैर आहेत त्यांना भाजपाप्रवेशाचे डोहाळे लागले आहेत, पक्षप्रवेश करणाऱ्या संभाव्य कार्यकर्त्यांपैकी अनेकजण पूर्वीच्या माजी आमदारांसोबत होते असे असताना त्यांना अनेकवेळा पराभव स्वीकारावा लागला होता ही वस्तुस्थिती आहे. वाई विधानसभेला एका दिवसात पक्ष बदलून शरद पवार गटाकडून मानाचं पान मिळालेली मंडळीही भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जातं.
कुठल्याही निवडणुकीत आरक्षणाचं महत्त्व अधिक आहे, प्रत्येक कॅटेगिरीला साधारण १५-२० वर्षानंतर संधी येते त्यात ढवळाढवळ झाली तर सामाजिक तुष्टिकरणाचा धोका संभवतो त्यामुळे प्रत्येकठिकाणी ज्या कॅटेगिरीचं आरक्षण आहे त्याच कॅटेगिरीचा उमेदवार देण्याचा प्रत्येक पक्षाचा कटाक्ष राहिलेला आहे ते पथ्य प्रत्येक पक्षाने अजूनतरी पाळलेलं आहे परंतु वाई मतदारसंघातील राजकीय साठमारीत आरक्षणावर अतिक्रमण होण्याचा संभव आहे तसं घडलंतर त्या पक्षाला त्याची जबर किंमत मोजावी लागेल हेही तितकंच खरं आहे. देशभक्त स्व. आबासाहेब वीर व स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या कार्यकर्तृत्वाने दुमदुमलेला हा मतदारसंघ आहे इथं कधीही जाती-पातीच्या राजकारणाला थारा मिळाला नाही, सर्वसमावेशक राजकारणाची परंपरा आजतागायत जोपासली गेली, जातीय राजकारणाला कुठल्याही नेतृत्वानी खतपाणी घातलं नाही, गुंडा-पुंडांना थारा दिला नाही ही गोष्ट खरी आहे परंतु अतिरेकी महत्वकांक्षेपोटी वाई मतदारसंघातील राजकारण जाती-पातीच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न दिसतो असं सातत्यानं बोललं जातं तसे ठोस संकेत मिळतात ही वाई विधानसभेच्या दृष्टीने अतिशय चिंतेची बाब आहे ह्या गोष्टीची जनतेत जागृती करणं हे प्रसारमाध्यमांच काम आहे परंतु तीही पुढार्यांच्या पॅकेजचाच भाग बनले आहेत, नेत्यांचे अनुयायी झाले आहेत. हात ओला तर पक्ष भला, नेता भला हा त्यांचा कार्यकारण भाव राहिला आहे.
सध्यातरी तिन्ही तालुक्यात आमदार गटाचा प्रभाव चांगला आहे प्रत्येक गटात मेळावे दणक्यात चालू आहेत, कार्यकर्त्यांची भाषणं चर्चेचा विषय ठरत आहेत, गणा-गटातील समस्या,अडचणी, संभाव्य विकासकामांपेक्षा नेत्यांच्या कौतुकांवर जास्त भर आहे त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत ही प्यारवाली लव्हस्टोरी ठरण्याची शक्यता अधिक आहे. काहीजणांचा राजकीय पटलावरील होत असणारा अस्त म्हणजे नियतीने घेतलेला सूडंच मानावा लागेल, बंटी और बबलीच्या राजकारणाचे दिवस आता लयाला गेले आहेत त्यामुळे लादलेल्या उमेदवारांच्या पदरी निराशा येण्याची शक्यता जास्त आहे. वाई विधानसभेत व्यक्तिशः शरद पवारांना मानणारा, त्यांच्यावर प्रेम करणारा वर्ग लक्षणीय आहे, कार्यकर्ते रफूचक्कर झालेतरी मतदार ठाम आहेत, इथं काँग्रेस विचारांचा मतदारही दखलपात्र आहे, बऱ्याचशा गावात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा प्रभाव अजूनही चांगला आहे. महाविकास आघाडीने संघटितपणे लढा दिला तर जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत रंगत वाढेल. सध्यातरी जिल्ह्यातील राजकीय विश्लेषकांना,अभ्यासकांना संभ्रमात टाकणारी वाई विधानसभेची परिस्थिती आहे.
मतदार संघातील सध्याची चालूअसलेली राजकीय घुसळण, उलथापालथ म्हणजे बेपर्वाई, बेफिकिरी किंवा कुठलाही विचार न करता केलेली कृती अर्थात वाऱ्यावरची वरातच आहे.
✍🏻 कल्याण पिसाळ देशमुख, ओझर्डे.
सरचिटणीस- सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी.
फोन- ९८५०४१२९०९.
2) !! मला लगीन कराव वाटतयं !!

जि.प.,पं.स.निवडणूक(वाई-खंडाळा-महाबळेश्वर)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी नामांकन दाखल करवयाच्या शेवटच्या दिवशी सालाबादप्रमाने निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल करण्यासाठी भली थोरली गर्दी झाली, दुसऱ्या बाजूला चार दिवसांपासून दलबदलूंच्या कवायतींना जोर चढला होता. मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा प्रभाव आहे,सर्व सत्तास्थाने त्यांच्या अधिपत्याखाली आहेत पूर्वी काही दिवसांपर्यंत प्रभावहीन वाटणारी भारतीय जनता पार्टी वाई नगरपरिषद निवडणूकीनंतर अचानक तूल्यबळ वाटायला लागली त्याला कारणंही तशीच आहेत वाई शहरात भाजपाकडून मोठ्या प्रमाणात दौलतजादा केली गेली, लाभार्थी कार्यकर्ते मालामाल झाले, मतदारांच्या पदरात अपेक्षेपेक्षा चांगलं दान पडलं, विकत जाणाऱ्यांची संख्या वाढली वाई तालुक्यात आतापर्यंत कार्यकर्त्यांची बोली लावली जायची त्यांचं निवडणूकमूल्य फिक्स केलं जात असे परंतु बीजेपीने हे तंत्र मतदारांपर्यंत शिस्तबद्धरित्या आणि प्रभावीपणे पोहचवलं त्याची काटेकोर अंमलबजावणी केली. काही नगरपालिका वार्डातील मतदारांपर्यंत पोहोचलेल्या रकमा ऐकल्यावर डोळे पांढरे व्हायची वेळ येऊ शकते.पूर्वी मतदारसंघात इच्छुक उमेदवारांकडून पार्टी फंड गोळा केला जात असे असं म्हणतात जो जास्तीत जास्त रक्कम नेतृत्वाकडे पोहोचवेल त्याला उमेदवारी परंतु भाजपा हा दानशूर पक्ष, निवडणूक लढणाऱ्या उमेदवारास पार्टीकडून दिल्या जाणाऱ्या रकमांच्या अनेक सुरस कहाण्या आहेत. तसं प्रत्येक पक्षाकडून काही प्रमाणात निवडणूक खर्च दिला जातो परंतु प्रचंड मोठ्या प्रमाणात पार्टीकडून मदत मिळते म्हटल्यावर भाजपकडून लढण्यास अनेकजण इच्छुक असणं स्वाभाविक आहे, मदतीचं आमिष दाखवून नेते, कार्यकर्ते, मतदार फोडण्यात पारंगत असणारा हा पक्ष.
वाई मतदारसंघात सध्यातरी राष्ट्रवादी व भाजपा हे दोन प्रबळ पक्ष आहेत, नगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही मंत्री महोदयांनी चढाओढीनं दानधर्म केल्यासारखं मतदार,कार्यकर्त्यांचे लाड पुरवले, माणदेशी मंत्र्यांची जशी सरशी झाली त्या धसक्यानं तथाकथित जननायकांचा संयम सुटला, निवडणूक तंत्रात भाजपा उघडी झाली म्हणून मतदारसंघातील मंत्री महोदयांनीही कमरेचं सोडून डोईला बांधण्याची घाट घातला त्यांनीतर थेट पारंपारिक विरोधकांशी अर्थपूर्ण सलगी करत त्यांना पक्षात घेऊन उमेदवाऱ्या दिल्या. कधीकाळी एकमेकांची कापडं फाडणारी, डोकी फोडणारी मंडळी एकमेकांच्या गळ्यात पडलेले बघून मतदार मात्र कोमात गेलाय हे खरं आहे. या सगळ्या गदारोळात सत्ताधारी गटातला निष्ठावंत, अर्थात लाभार्थी कार्यकर्ता कान पाडून निर्विकारपणे चाललेला तमाशा बघण्यापलीकडे काही करू शकला नाही हे वास्तव आहे.
या निवडणूक पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रमुख समजल्या जाणाऱ्या उमेदवाराकडे निश्चित धोरण, विकास, सामान्यांच्या अडचणी, समाजाप्रती तळमळ यापैकी कशाचाही लवलेश नाही. उमेदवारीसाठी नेत्यांकडे पायघड्या, लाचारी, चर्चा फक्त आर्थिक गणितं जुळवाजुळवीची, आयात व लादलेल्या उमेदवारांचा भरणा अधिक आहे. काँग्रेसच्या उबीतं निसावलेल्या काहीजणांची ठिसूळ पक्षनिष्ठा, मतलबी विचार, संधीसाधू राजकारण ह्या निवडणूकीत प्रकर्षानं पुढे आलं. वाईच्या पश्चिम भागासह सर्व गटात उलथापालथ झाली राष्ट्रवादी (श. प.) गटातील अनेकजणांनी आपापल्या सोयीची खुराडी जवळ केली. भुईज गटात तर कुबेर(श्रीमंत)कुणबी नावाचा नवीनच प्रवर्ग तयार झाल्याचे दिसते भाजपा व राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांनी कुणबी दाखल्याच्या आधारावर ओबीसी आरक्षणात उमेदवारीसाठी घूसखोरी केली आहे हा ओबीसी बांधवांवरचा अन्याय आहे, कुणबी दाखल्याच्या आधारावर राजकीय लाभ घेण्याचा करंटेपणा करणारे गटातील सर्व समाजाला कसा काय देऊ शकतील? या गटात पर्यायी उमेदवार आहे त्यामुळे मतदारांनी ह्या दोघांनाही सन्मानाने घरी बसवावे, तर आणि तरच असल्या प्रवृत्ती सरळ होतील.
या निवडणूकीत महिला उमेदवारांचा भरणा अधिकचा दिसतो, सावित्रीच्या लेकी, रणरागिनी पदर खोचून समाजसेवेसाठी मैदानात आहेत त्यांचाही इथे नशीब आजमावण्याचा प्रयत्न दिसतो, त्यांच्या बाबतीत समाजिक बांधिलकी, लोककल्याण हे संशोधनाचे विषय ठरू शकतात. मात्र काहीजनींचा समाजातला वावर, लोकांसाठी काम करण्याची तळमळ, काम करण्याची जिद्ध प्रामाणिक आहे. वाई विधानसभा मतदारसंघात काँग्रेससह अन्य पक्षांनी व अपक्षांनी आपापल्या बळानुसार उमेदवार देण्याचा प्रयत्न केला आहे, येत्या २७ तारखेनंतर चित्र स्पष्ट होईल उमेदवार कोण चांगला, कोण कामाचा हा खरोखरच मतदारांसमोरचा मोठा प्रश्न आहे. निवडनूकीदरम्यान देवाण-घेवाण, कुठं वाटायचे, कुणाला द्यायचे, किती द्यायचे हीच निवडणूकीची रणनीती असणार आहे त्यामुळे गटाचा, गणाचा विकास, तिथले प्रश्न, समस्या जशाच्या तशाच राहणार, तालुक्यातल्या पाणी योजना, पर्यटन, औद्योगिक, शैक्षणिक विकास हे विषय फक्त मतदारांची दिशाभूल करण्यासाठीच राहतील. तसं पाहिलंतर करण्यासारखं मतदारांच्या हातात भरपूर आहे त्यांनी मनात आणलं तर आर्थिकदृष्ट्या बलशाली असलेल्या लबाड,स्वार्थी, लादलेल्या व दलबदलूंना त्यांची जागा दाखवण्याची करामत ते करू शकतात. सध्यातरी उमेदवारीच्या रूपाने अनेकजण बोहल्यावर चढलेले आहेत.
✍🏻 कल्याण पिसाळ देशमुख, ओझर्डे.
सरचिटणीस-जिल्हा काँग्रेस कमिटी.
फोन – ९८५०४१२९०९.




