ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
ब्रेक फेल… मृत्यू जवळ! वाईत रोड रोलरचा धुडगूस; काळाच्या तोंडातून नागरिकांची थरारक सुटका.
पत्रकार सारिका गवते वाई तालुका महिला अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वाई:-ब्रेक फेल… मृत्यू जवळ!
वाईत रोड रोलरचा धुडगूस; काळाच्या तोंडातून नागरिकांची थरारक सुटका.

वाई | दि. १७ :
सातारा जिल्ह्यातील वाई शहर आज एका भीषण दुर्घटनेपासून थोडक्यात वाचले. विष्णूमंदिर ते किसनवीर चौक या तीव्र उतारावरून जात असताना एका अवजड रोड रोलरचा अचानक ब्रेक फेल झाला आणि क्षणातच हा रोलर भरधाव वेगात रस्त्याकडील दुकानात घुसला. काही सेकंद उशीर झाला असता मोठी जीवितहानी अटळ होती.
ब्रेक फेल होताच प्रसंगावधान राखत रोड रोलर चालकाने जोरजोरात आरडाओरडा केला. त्याच वेळी परिसरातील नागरिकांनीही सतर्कता दाखवत स्वतःसह इतरांना वेळीच बाजूला हटवले. त्यामुळे मृत्यू डोळ्यांसमोर उभा असतानाही कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही बाब सुदैवाची ठरली.
किसनवीर चौक येथील सिद्धिविनायक स्नॅक्स सेंटर शेजारील जठार यांच्या पानाच्या दुकानात हा रोड रोलर घुसला. अपघातात दुकानासमोर उभी असलेली एक दुचाकी रोड रोलरखाली चिरडली गेली. तसेच या धडकेत रोड रोलर चालकाला मुका मार लागला असून त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
या भीषण घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. काही काळ संपूर्ण परिसरात वाहतूक ठप्प झाली होती. पोलिस व संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
शहरातील उतारावरील रस्त्यांवरून धावणाऱ्या अवजड वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नियमित तपासणीचा अभाव, निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष यामुळेच असे अपघात घडत आहेत का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
काळ समोर उभा होता… पण नियतीने वाईला वाचवले!




