वाई:-प्रामाणिकपणा हीच ओळख असावी : मा.शेखर गायकवाड – संस्थेच्या हीरकमहोत्सवानिमित्त गुंफले दुसरे पुष्प.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला संघटक

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

वाई : दि. 14
प्रामाणिकपणा हीच ओळख असावी : मा.शेखर गायकवाड – संस्थेच्या हीरकमहोत्सवानिमित्त गुंफले दुसरे पुष्प.

विद्यार्थ्यांनी अकरावी बारावीत असतानाच आपले ध्येय निश्चित करावे. आपल्याला कंपनी कशी चालू करता येईल का याचा त्यांनी विचार करावा. स्वतःशी व समाजाशी प्रामाणिक राहून हे काम करावे आपली ओळख प्रामाणिकपणातून दिसावी. असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी, महाराष्ट्र राज्याचे माजी साखर आयुक्त व यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी केले.
येथील जनता शिक्षण संस्थेच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमातील विशेष व्याख्यानाचे दुसरे पुष्प गुंफताना ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष मदनदादा भोसले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. याप्रसंगी सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार नारायण चौधरी, संचालक सुनील शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे तसेच संस्थेचे इतर सन्माननीय पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांची प्रमुख उपस्थिती होती.
मा. शेखर गायकवाड म्हणाले, जनता शिक्षण संस्थेचे भूतपूर्व अध्यक्ष स्वर्गीय प्रतापराव भोसले भाऊ हे एक अभ्यासू नेतृत्व होते. आज-काल आपल्या देशात नव्हे तर जगातील सर्व शिक्षण संस्थांमध्ये मुलींची संख्या वाढलेली आहे. एग्रीकल्चर विभागात ६० टक्के मुली शिक्षण घेत आहेत. जगातील अशा कित्येक कंपन्या आहेत की, त्यांना पात्र उमेदवार न मिळाल्याने त्या जागा रिक्त आहेत. आपल्या पुणे शहरात तीस विद्यापीठे आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यापीठे असणारे पुणे हे जगातील एकमेव शहर असावे. इथून पुढच्या काळात प्राध्यापकांनी अपडेट राहणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी करिअरची निवड लवकर केल्यास जीवनात लवकर यश मिळू शकते. अकरावीपासूनच स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात करावी. दुसऱ्याची कॉपी करण्यापेक्षा आपण आपले व्यक्तिमत्व घडवावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमधील कला, संगीत यांची आवड ओळखायला हवी. बर्नार्ड शॉ यांच्याकडे असणारा आत्मविश्वास आपल्या विद्यार्थ्यांमध्ये यायला पाहिजे. आजच्या विद्यार्थ्यांवर सोशल मीडियाचा प्रभाव आहे. व्यवस्थापनामध्ये ई लर्निंग चा वापर व्हायला पाहिजे. वाईतील विद्यार्थी ब्रँड बनायला पाहिजे त्यासाठी संस्थेतील सर्व घटकांनी प्रयत्न करायला पाहिजेत. चीनने ज्या पद्धतीने तंत्रज्ञानात प्रगती केली तशी प्रगती आपल्याला साधायला हवी. इंग्लंड देशाने छोट्या छोट्या परंपरा निर्माण केल्या, तशा आपल्याला करता येतील का? यावर विचार व्हायला हवा. विद्यार्थ्यांनी शिकतानाच कौशल्य आत्मसात करायला हवे. त्यांनी स्किल बेस्ड शिक्षण घेतल्यास भविष्यात संधी आहेत. प्रॅक्टिकल ट्रेनिंग त्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आपल्या ग्रंथालयातील सर्व पुस्तके ई लर्निंग च्या माध्यमातून मोबाईल मध्ये यायला हवीत. आपली स्पर्धा इतरांशी नसून आपल्या स्वतःशीच आहे हे ओळखून प्रत्येकाने आपला विकास साधावा.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात मदनदादा भोसले म्हणाले, आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समोर कर्तव्यदक्ष प्रशासकाचे व्याख्यान ठेवावे असे ज्यावेळी माझ्या मनात आले त्यावेळी एकच चेहरा डोळ्यासमोर आला तो म्हणजे मा. शेखर गायकवाड यांचा. त्यांनी सहज गप्पा मारत विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनाही डोळसपणे मार्गदर्शन केले. या व्याख्यानाचा लाभ सर्वांना होईल असे मी त्यांना आश्वासन देतो.
शेखर गायकवाड यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.
संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. उपप्राचार्य प्रो. डॉ. विनोद वीर यांची पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. शिवाजी ताटे यांनी आभार मानले. रेश्माबानो मुलानी यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रमास आजी-माजी प्राध्यापक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयातील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, एन. सी. सी. छात्र व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.




